ऑलिम्पिकसाठी भरारी | पुढारी

ऑलिम्पिकसाठी भरारी

चीनमधील हांगझो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या देदीप्यमान यशामुळे पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणार्‍या ऑलिम्पिकसाठी भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आशियाई स्पर्धेतील आत्मविश्वास घेऊन भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्येही यशाचे नवे विक्रम नोंदवतील, याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. आशियाई स्पर्धेत भारताने 28 सुवर्णपदकांसह एकूण 107 पदके मिळवली. त्यामध्ये 38 रौप्य आणि 41 कास्यपदकांचा समावेश आहे. पदकांचे शतक पार करून भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेतील यश एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

चीन, जपान, दक्षिण कोरियानंतर पदक तक्त्यामध्ये पटकावलेला चौथा क्रमांक ही निश्चितच अभिमानास्पद बाब! विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच पदकांचे शतक पार केले आणि इतक्या मोठ्या संख्येने सुवर्णपदकेही पहिल्यांदाच लुटली. 2018 मध्ये इंडोनेशियामधील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत देशाने 70 पदके जिंकली, ती आजवरची आशियाई स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यावेळच्या पदकांमध्ये सोळा सुवर्ण, तेवीस रौप्य आणि एकतीस कास्य पदकांचा समावेश होता. व्यक्तिगत क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रम नोंदवत पदके मिळवलीच, शिवाय सामूहिक क्रीडा प्रकारांमध्ये मिळवलेले यश विशेष उल्लेखनीयच आहे.

जाकार्ता स्पर्धेतील कबड्डीच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी आपली निराशाजनक कामगिरी मागे टाकून यावेळी सोनेरी कामगिरी केली. क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी सुवर्णपदके, तर हॉकीमध्ये पुरुषांनी सुवर्ण आणि महिलांनी कांस्यपदक मिळवले. हांगझो आशियाई स्पर्धेत भारताने इतिहास घडवला असून अनेक क्षेत्रातील मरगळ झटकून नव्या आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठीची खेळांडूमध्ये प्रेरणा निर्माण केली आहे. स्पर्धेपूर्वी भारतात क्रीडा क्षेत्रातील वातावरण काहीसे गढूळ झाले होते. खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या पुरुष आणि महिला मल्लांनी राजधानीत दीर्घकाळ आंदोलन केले. त्यावरून राजकारणही रंगले. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे कुस्तीतील भारताच्या कामगिरीवर झाला.

ऑलिम्पिक, तसेच राष्ट्रकूल स्पर्धेत पदके मिळवणार्‍या भारताची आशियाई स्पर्धेतील कुस्तीमधील कामगिरी निराशाजनक झाली. अन्यथा पदकांची संख्या आणखी वाढली असती. ऑलिम्पिकखालोखाल एशियाड ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असून दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहुक्रीडा स्पर्धा आहे. आजवर नऊ देशांनी स्पर्धेचे आयोजन केले आणि एकूण 46 देशांनी सहभाग नोंदवला. आशियामधील सर्व देश स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर ज्या स्पर्धा घेतल्या जातात, त्यामध्ये प्रामुख्याने ऑलिम्पिक, राष्ट्रकूल आणि आशियाई या प्रमुख स्पर्धा मानल्या जातात. राष्ट्रकूलमध्ये अधिक देशांचा सहभाग असला, तरी आशियाई स्पर्धा अधिक आव्हानात्मक असते.

आशियाई स्पर्धा आव्हानात्मक असण्याचे कारण म्हणजे चीन, जपान, दक्षिण कोरिया हे क्रीडा क्षेत्रातील तीन बलाढ्य देश या स्पर्धेत असतातच, शिवाय कझाकिस्तान, उझबेकिस्तान आणि इराण हे देशही असतात. विविध क्रीडा प्रकारांमध्ये या देशांनी दबदबा निर्माण केला आहे. चीन, दक्षिण कोरिया, जपान यांच्यानंतर आपण चौथ्या क्रमांकावर असलो, तरी पदक संख्येच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत, हे वास्तवही लक्षात घ्यावयास हवे, जेणेकरून सुधारणा करण्यास वाव राहील. मागच्यापेक्षा चांगली कामगिरी झाली, हे निश्चित समाधानकारक! इतरांच्या तुलनेत आपण मागे आहोत आणि त्यांना गाठण्याचा किंबहुना त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावयास हवा. तिथपर्यंत आपण का पोहोचू शकत नाही, याचा गांभीर्याने विचार करून त्याद़ृष्टीने प्रयत्न करावयास हवेत, हाच संदेश या ताज्या यशाने दिला आहे.

यंदाची काही वैशिष्ट्ये मुद्दाम नमूद करावयास हवीत. त्यापैकी एक म्हणजे आपण घोडेस्वारीसारख्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवले. अ‍ॅथलेटिक्स आणि नेमबाजी या प्रकारांमध्ये भारताची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. यंदाही तेथील पदकांची अपेक्षा पूर्ण झाली. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने 3000 मीटर्स स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याचप्रमाणे ओजस देवतळे याने तिरंदाजीमध्ये सोनेरी कामगिरी केली. या गोष्टी महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला चालना देणार्‍या ठरतील. ऑलिम्पिक विजेत्या आणि जगज्जेत्या नीरज चोप्राचे भालाफेकीतील सुवर्णपदक अपेक्षित होते; परंतु बॅडिमटन दुहेरीमध्ये सात्त्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सुवर्णपदक जिंकून सुखद धक्का दिला. सातार्‍याच्या आदिती स्वामीने महिला तिरंदाजीत (वैयक्तिक कम्पाऊंड) कांस्यपदक पटकावत याच क्रीडा प्रकारात ती विश्वविजेतीही ठरली.

भारताची राजधानी दिल्ली येथे 1951 मध्ये पहिल्या आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारताने पंधरा सुवर्ण, सोळा रौप्य आणि वीस कांस्य अशी पदके जिंकली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत पंधरा सुवर्णपदके जिंकण्याचा भारताचा विक्रम दीर्घकाळ अबाधित राहिला होता. 1982 मध्ये भारताने पुन्हा एकदा आशियाई खेळांचे यजमानपद भूषवले होते, तेव्हाही भारताला आपला सुवर्णपदकांचा आधीचा विक्रम मोडता आला नव्हता. त्यावेळी भारताने 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्य अशी एकूण 57 पदके जिंकली होती. त्यानंतर 2018 मध्ये जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आणि सोळा सुवर्णपदकांसह एकूण 70 पदके जिंकली.

हांगझो ऑलिम्पिकमध्ये भारताने आधीचे सगळे विक्रम मागे टाकून नवे विक्रम प्रस्थापित केले. भारतातील क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांमध्ये जे नियोजनपूर्वक प्रयत्न सुरू आहेत, त्याची फलनिष्पत्ती म्हणून याकडे पाहावे लागते, तरीसुद्धा क्रीडा क्षेत्राबाबतची आपली द़ृष्टी सुधारण्याची आवश्यकता आहे. क्रीडा संघटनांमधील राजकारण हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन क्रीडा संस्कृतीच्या विकासाकडे लक्ष दिले, तर भारत ऑलिम्पिकमध्येही उत्तम कामगिरी करेल. भारतीय खेळाडूंनी त्या दिशेने भरारी घेतली आहे.

Back to top button