गाझापट्टीतील युद्धसंघर्षाची मीमांसा | पुढारी

गाझापट्टीतील युद्धसंघर्षाची मीमांसा

अभय कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय अभ्यासक

पॅलेस्टाईनने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर इस्रायलने उघडपणाने युद्धाची घोषणा केली आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला प्रदीर्घ इतिहास आहे. त्यांच्यामध्ये छोट्या-मोठ्या चकमकी या सातत्याने सुरू असतात. पण यावेळी हमासने इस्रायलमध्ये घुसून केलेला हल्ला हा भयावह होता. त्याला आक्रमणच म्हणावे लागेल. त्यामुळेच इस्रायलने शत्रूला याची अशी किंमत मोजावी लागेल, ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल, असा सज्जड इशारा दिला आहे.

जागतिक पटलावर गेल्या दोन-तीन वर्षांत पुन्हा युद्धखोरी वाढताना दिसू लागली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर भडकलेला युद्धाचा वणवा पावणे दोन वर्षे उलटूनही शांत झालेला नाही आहे. दुसरीकडे, अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्यात प्रत्यक्ष युद्ध सुरू असून, तेही शमलेले नाहीये. इकडे आशिया प्रशांत क्षेत्रात उत्तर कोरियाचा उद्दाम हुकूमशहा किम जोंग उन याच्या बेमुर्वतखोरपणामुळे दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनने भारतासह जपान, तैवानबरोबरचा सीमावाद पुन्हा उकरून काढला आहे. पॅलेस्टाईनने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार क्षेपणास्त्रांचा मारा करून या युद्धाला फोडणी दिली आहे.

पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने केवळ इस्रायलवर हल्लाच केला नाही; तर इस्रायलच्या सैनिकांच्या छावण्यांवर हल्ला करून इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवले आहे. तसेच इस्रायलच्या नागरिकांचेही अपहरण केले. यानंतर इस्रायलने उघडपणाने युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी संबोधनात देशवासीयांना देश युद्धात उतरल्याचे सांगितले. इस्रायलने गाजापट्टीत एअरस्ट्राईकही सुरू केला आहे. इस्रायलच्या या प्रत्युत्तरालाही पॅलेस्टाईन समर्थपणाने तोंड देणार असून, लवकरच एक भयंकर हल्ला करण्याची योजना हमासकडून आखली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी हमासकडून झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना इस्रायलला सर्वोतपरी मदतीची घोषणा केली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला प्रदीर्घ इतिहास आहे.

आजवर या दोन्ही देशांत अनेकदा हल्ले-प्रतिहल्ले झालेले आहेत आणि त्यामुळे आखातातील शांतता धोक्यात आली आहे. ऑगस्ट 2014 मध्ये झालेल्या या दोन देशांमधील भीषण संघर्षामध्ये सुमारे दीड हजारांहून अधिक लोक मारले गेले. अशाच स्वरूपाचा संघर्ष 2008 आणि 2012 मध्येही झाला होता. या संघर्षामागचे मूळ कारण म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन ही दोन्हीही राष्ट्रे परस्परांचे अस्तित्व मान्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये छोट्या-मोठ्या चकमकी या सातत्याने सुरू असतात. या दोन राष्ट्रांच्या संघर्षाचा इतिहास जवळपास 100 वर्षांचा आहे. यावेळी हमासने इस्रायलमध्ये घुसून केलेला हल्ला हा भयावह होता. त्यामुळेच इस्राईलने याला युद्ध असे म्हणत, शत्रूला याची अशी किंमत मोजावी लागेल, ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल, असा सज्जड इशारा दिला आहे.

हमास या संघटनेचे दहशतवादी समुद्रमार्गाने आणि जमीन मार्गाने पॅराग्लायडिंग करत इस्रायलच्या सीमेमध्ये घुसण्यात यशस्वी झाले. हजारो क्षेपणास्त्रांचा मारा करतानाच या दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. इतकेच नव्हे, तर इस्रायली सैनिकांच्या महिला आणि मुलांना बंदिस्त बनवून त्यांची हत्या केली. वास्तविक, इस्रायल हा देश युद्धनीतीमध्ये निपुण मानला जातो. तसेच इस्रायलची गुप्तचर यंत्रणाही जगात तरबेज मानली जाते. विशेषतः, हल्ल्यांसाठी, गुप्तवार्तांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये इस्रायल हा जगात नावाजलेला देश आहे. 2016 मध्ये भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जो सर्जिकल स्ट्राईक केला होता, तशा प्रकारच्या हल्ल्यामध्ये इस्रायलचे सैन्य वाकबगार म्हणून ओळखले जात असे. मोसाद या इस्रायलच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे एजंट जगभर पसरलेले आहेत.

शस्त्रांशिवाय यशस्वीपणे लढण्यासाठी ते ओळखले जातात. एक काळ असा होता की, मोसाद म्हणजे मृत्यू! मोसादचे गुप्तहेर शत्रूला जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून शोधून काढत असत. त्यामुळे जगातील सर्वाधिक धोकादायक किंवा खतरनाक गुप्तचर संस्था म्हणून मोसादकडे पाहिले जात असे. इस्रायलमधील तेल अवीव या शहरात मोसादचे मुख्यालय आहे. नाझी जर्मन अधिकार्‍यांनाही मोसादची सर्वाधिक भीती वाटत होती. असे असताना हमासकडून केल्या गेलेल्या या हल्ल्याची भणकही त्यांना लागली नाही, याबाबत जगभरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे हा हल्ला इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असून, त्यांच्यातील उणिवा स्पष्ट करणारा आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला अनेक कंगोरे आणि कोन आहेत. या संघर्षामध्ये रशिया, चीन, अमेरिका सर्वांचेच हितसंंबंध गुंतलेले असल्याने हा प्रश्न प्रदीर्घ काळ चिघळत राहिला आहे. तथापि, आताच्या युद्धसंघर्षामुळे जागतिक समुदायामध्ये विभाजनाची किंवा ध—ुवीकरणाची दरी आणखी व्यापक होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही महिन्यांत मध्य पूर्वतील स्थिती शांततेकडे परतत होती. पण हमासच्या हल्ल्याने आखातात पुन्हा खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर सर्व अरब देशांनी एकमताने इस्रायलचा निषेध केला आहे. सौदी अरेबिया, जॉर्डन, कतार, ओमान, यूएईसह जवळपास सर्व आखाती देश यामध्ये एकत्र दिसले. इराणसह अन्य काही इस्लामिक देशांनी जल्लोष साजरा करत पॅलेस्टाईनचे अभिनंदन केले आहे. हमासच्या हल्ल्यामुळे अलीकडेच जुळून आलेले इस्रायल आणि सौदी अरेबियाचे मैत्रीचे धागेही उसवण्याची शक्यता आहे. मुळात इराणला सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात निर्माण झालेली जवळीक पसंत नव्हती. त्यामुळेच इराणने हमासला इस्रायलवर हल्ला करण्याबाबत प्रोत्साहनवजा चिथावणी दिल्याचा जाणकारांचा कयास आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने हमासने केलेल्या या हल्ल्याची निंदा केली आहे. भारतानेही अशा कठीण आणि बिकट प्रसंगी भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे, असे सांगत भूमिका स्पष्ट केली आहे. याचे एक कारण म्हणजे, हमासने केलेला हल्ला हा मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देणारा होता. त्यामुळे भारताने उघडपणाने याचा निषेध करणे गरजेचे होते. वास्तविक, स्वतंत्र पॅलेस्टाईन निर्मितीला भारताचे समर्थन राहिलेले आहे. किंबहुना, 1990 पर्यंत भारताचे धोरण हे पूर्णतः इस्रायलविरोधी होते. भारताचा तेथे दूतावासही नव्हता. 1994 मध्ये भारताने पहिल्यांदा इस्रायलमध्ये दूतावास सुरू केला. तेव्हापासून भारत-इस्रायलमधील संबंधांची नवी सुरुवात झाली.

कारगिल युद्धाच्या वेळी असेल किंवा काश्मीरच्या प्रश्नावर असेल इस्रायलने नेहमीच मैत्रीचे नाते जोपासले आहे. आज संपूर्ण जग ज्या ऊर्जासुरक्षा आणि अन्नसुरक्षा या संकटांचा सामना करत आहे, हे दोन्हीही प्रश्न या युद्धसंघर्षामुळे बिकट बनणार आहेत. सौदी अरेबिया आणि रशियाने तेल पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक बाजारात कडाडलेले क्रूड ऑईलचे भाव गेल्या आठवड्यात एकाएकी घसरून 85 डॉलर्सपर्यंत खाली आले होते; पण आता इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे क्रूड ऑईल महागणार आहे आणि याची झळ आपल्या गरजेच्या 80 टक्के तेलाची आयात करणार्‍या भारतासह सर्वच गरीब व अविकसित राष्ट्रांना बसणार आहे. याखेरीज आखातात काम करणार्‍या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचाही प्रश्न यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारत ‘हा संघर्ष आणि तणाव लवकरात लवकर निवळावा,’ या भूमिकेत आहे.

Back to top button