क्रिकेटचा कुंभमेळा! | पुढारी

क्रिकेटचा कुंभमेळा!

क्रिकेट हा धर्म मानणार्‍या भारतात, क्रिकेट जगतातील सर्वात मोठा उत्सव मानला जाणार्‍या विश्वचषक स्पर्धेचा पडदा उघडण्याचा क्षण समीप आला असून, 19 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे पुढील दीड महिना स्पर्धा रंगणार आहे. क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा खेळ जगभरातील क्रिकेट रसिकांना पाहावयास मिळणार असून, अनेक नवे विश्वविक्रमही प्रस्थापित होतील. खरे तर विश्वचषकाचा थरार सुरू असतानाच राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागेल. मात्र आपल्या देशात राजकारण कितीही लोकप्रिय असले तरी त्याचा क्रमांक क्रिकेटनंतरच येतो, हे पुन्हा दिसून येईल. किंबहुना राजकीय मैदानात गर्दी खेचण्यासाठी क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी पडदे लावण्याची वेळ आली तरी आश्चर्य वाटायला नको.

विश्वचषकाच्या तेराव्या स्पर्धेचे आयोजन भारतात होत असून, भारताकडून केले जाणारे हे चौथे आयोजन आहे. मात्र संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवली जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तिचे वेगळे महत्त्व आहे. यापूर्वी 1987 मध्ये पाकिस्तानसोबत, 1996 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत, तर 2011 साली श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यासोबत भारताने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. भारतातील दहा शहरांमध्ये स्पर्धा होणार असून, उपांत्य सामने मुंबई आणि कोलकाता, तर अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकाच्या निमित्ताने बीसीसीआयने अनेक मैदानांना आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे, या मैदानांनी कात टाकली आहे. क्रिकेटची अशी मोठी स्पर्धा अलीकडच्या काळात फक्त खेळापुरती मर्यादित राहत नाही. तो एक मोठा इव्हेंट असतो आणि अनेक घटकांचे आर्थिक हितसंबंध त्यामध्ये गुंतलेले असतात.

यजमान देशाच्या क्रिकेट संघटनेला मोठा फायदा होत असतो आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचेही (आयसीसी) उखळ पांढरे होत असते. या स्पर्धेच्या निमित्ताने केलेल्या जाहिरातींपासून ते प्रसारणाच्या हक्कांपर्यंत अनेक पातळ्यांवर कोट्यवधींचे व्यवहार होत असतात. त्याअर्थाने विचार केला, तर ही स्पर्धा म्हणजे आर्थिकद़ृष्ट्यासुद्धा मोठा इव्हेंट असतो. पैसा केंद्रस्थानी असल्यामुळे दरम्यानच्या काळात मॅच फिक्सिंग किंवा तत्सम प्रकारचे गैरप्रकार घडत असतात. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून यंत्रणा काम करीत असतात आणि त्यात कुणी सापडले, तर त्याच्यावर कठोर कारवाईही केली जाते. कोणत्याही गोष्टीचे बाजारीकरण झाल्यानंतर जी स्थिती होते, तशीच अवस्था क्रिकेटचीही झाली आहे. त्यासंदर्भात कितीही नकारात्मक चर्चा केली तरी क्रिकेट रसिक त्याकडे दुर्लक्ष करून मैदानावरील थरारावरच लक्ष केंद्रित करतात, हे इथले वास्तव आहे. वेळोवेळी ते दिसून आले आहे. अनेक वावग्या गोष्टींची हवा झाली तरी मैदानावरील खेळच अंतिमतः वरचढ ठरला आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने पाकिस्तानचा संघ सात वर्षांनी भारत दौर्‍यावर आला आहे. खेळ आणि सांस्कृतिक बाबींमध्ये राजकारण आणावे की आणू नये, याबाबत मतभिन्नता आहे. त्या विषयावर सातत्याने चर्चा झडत असतात. शेवटी या सगळ्याच्या केंद्रस्थानी राजकारण असते आणि त्यातूनच असे प्रश्न उपस्थित करून राजकारण केले जाते. पाकिस्तानसोबत क्रीडा किंवा सांस्कृतिक संबंध ठेवण्यास विरोध करणारे घटक सत्तेत आहेत, त्यामुळे यावेळी पाकिस्तानी संघाला विरोधाचे राजकारण घडले नाही, हेही लक्षात घ्यावयास हवे.

क्रिकेटच्या माध्यमातून जात-धर्म-प्रांताच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय ऐक्य साधण्याचा प्रयत्न तर केला जातोच; परंतु विश्वबंधुत्वाचा आगळा संदेशही दिला जातो. राजकारणासाठी मने तोडण्याचे उद्योग केले जात असले तरी क्रिकेटच्या माध्यमातून मने जोडण्याचे काम केले जाते. याचे भान ठेवूनच अलीकडे भारत-पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर खेळताना दिसतात. हेच भान विश्वचषकांमधील सामन्यांमधून दिसेल, अशी अपेक्षा आहे. यावेळच्या स्पर्धेत भारतीय संघ हाच अनेक जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंच्या नजरेतून संभाव्य विजेता संघ आहे. स्थानिक खेळपट्ट्या आणि दर्शकांचा पाठिंबा या बाबी पोषक आहेतच; परंतु भारतीय संघातील अव्वल दर्जाचे खेळाडू हेही त्याचे कारण आहे. अर्थात, प्रत्यक्षात मैदानावरील कामगिरी अंतिमतः महत्त्वाची ठरत असते.

आजवरच्या बारा विश्वचषकांपैकी दोन विश्वचषक भारताने जिंकले आहेत. स्वतःच्या देशात होणारी स्पर्धा जिंकण्याची किमया करणारा भारत हा एकमेव देश आहे. 1983 च्या कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील विजयानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने भारतात झालेला विश्वचषक जिंकला होता. याव्यतिरिक्त भारताने एकदा 2003 मध्ये अंतिम फेरीत आणि 1987, 1996, 2015 आणि 2019 अशा चार वेळा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतासारख्या देशात आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे खेळाडू प्रचंड संख्येने आहेत, त्यामुळे निवड समितीसमोर संघ निवडीचे मोठे आव्हान असते. एखाद्या खेळाडूची निवड का केली, इथपासून ते अमूक खेळाडूंना का घेतले नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.

स्पर्धा सुरू झाल्यानंतर संघ जिंकत असतो तेव्हा हे प्रश्न गायब होतात; परंतु जेव्हा पराभव होतात, तेव्हा या प्रश्नांची तीव्रता वाढत असते. रविचंद्र अश्विन याच्यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूला संघात स्थान मिळू शकले नव्हते आणि अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर त्याला स्थान मिळाले. यावरून भारतीय संघासाठीची स्पर्धा किती तीव्र आहे, याची कल्पना येऊ शकेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. मात्र अखेरचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियन संघ विजय घेऊन विश्वचषकाकडे निघाला आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. इंग्लंडच्या संघावर नजर टाकली तरी त्यांची गुणवत्ता नजरेत भरल्यावाचून राहत नाही. पाकिस्तानच्या दोन-तीन खेळाडूंना लय सापडली तरी ते कुणाचाही डाव बिघडवू शकतात. अंतिम सामन्यापर्यंतची वाट बिकट आणि आव्हानात्मक आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ हा विश्वचषक जिंकून अमृतकाळात भारतीयांना एक सुंदर भेट देईल, अशी देशवासीयांची अपेक्षा आहे.

Back to top button