पृथ्वी कक्षेबाहेरची झेप! | पुढारी

पृथ्वी कक्षेबाहेरची झेप!

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गेल्या काही महिन्यांमध्ये गाजवलेल्या पराक्रमामुळे जागतिक पातळीवर भारताची मान उंचावली आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगतीचे एकेक पाऊल टाकत असताना अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात इस्रो रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करीत आहे. चांद्रयान-3 मोहिमेचे यश ही जगाने तोंडात बोटे घालावीत, अशी अलीकडची महत्त्वाची कामगिरी. पाठोपाठ इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 मोहिमेच्या माध्यमातून अवकाशात आणखी एक मोठी झेप घेतली.

चांद्रयान-3 मोहिमेत विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे आणि ती अर्थातच सूर्याशी संबंधित मोहिमेबाबतची आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हाती घेतलेल्या आदित्य एल-1 ही मोहिमेअंतर्गत 2 सप्टेंबर रोजी आदित्य एल-1 हे अवकाशयान सूर्याच्या दिशेने पाठवले होते. या अवकाशयानाने त्याच्या प्रवासातील दुसरा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार केला असून भारतासाठी तो चांद्रयान मोहिमेइतकाच अभिमान वाटण्याजोगा आहे. इस्रोने टि्वटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल-1 या अवकाशयानाने आतापर्यंत 9.2 लाख किलोमीटर अंतर पार केले असून आता आपले अवकाशयान एल-1 बिंदूचा शोध घेत आहे. यातील महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे आदित्यने पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर झेप घेतली आहे.

पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर जाणारे भारताचे हे आतापर्यंतचे दुसरे अवकाशयान आहे. यापूर्वी भारताने आपले मंगळयान यशस्वीपणे पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर पाठवले होते. त्यापाठोपाठ आता आदित्य एल-1 या अवकाशयानाने पृथ्वीचे प्रभावक्षेत्र ओलांडले आहे. आदित्य एल-1 ने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत लग्रांज पॉईंट-1 च्या दिशेने प्रवास करण्यास सुरू केल्याची घोषणा इस्रोने 19 सप्टेंबरला केली होती. चार जानेवारीला रोजी हे यान एल-1 बिंदूपाशी स्थिरावेल, असे इस्रोने जाहीर केले आहे. अवकाश संशोधन मोहिमेत प्रत्येक टप्पा नव्हे, तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्याच्या हालचालींचा अखंडपणे अभ्यास सुरू असतो, त्यातून काही नव्या गोष्टी सापडण्यास मदत होत असते. भविष्यातील मोहिमांसाठी तो अनुभव महत्त्वाचा ठरत असतो. आदित्य

एल-1 हे अंतराळयान उड्डाण केल्यानंतर सुरुवातीचे सोळा दिवस पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करीत होते. 19 सप्टेंबरला त्याने चौथ्यांदा पृथ्वीची कक्षा बदलली आणि एल-1 च्या दिशेने प्रवास केला. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणांच्या मदतीने या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. नऊ लाखांहून अधिक किलोमीटरचा प्रवास केलेले हे यान सुमारे 15 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ‘एल-1’ या बिंदूपाशी पोहोचेल. या संपूर्ण प्रक्रियेला 125 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेपावण्याचा यानाचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.

चांद्रयान-3 मोहिमेपाठोपाठ सूर्याच्या अभ्यासाची ही मोहीम भारताच्या एकूण मानसिकतेला नवे वळण देणारी ठरू शकते. ग्रहण लागल्यानंतर त्याच्या शास्त्रीय कारणांना बाजूला ठेवून धार्मिक कर्मकांडामध्ये गुंतलेल्या इथल्या समाजाचे प्रबोधन करण्यासाठी या मोहिमा उपयुक्त ठरू शकतात. आपला देश वर्षातील अनेक महिने संस्कृतीच्या नावाखाली धार्मिक पगड्याखाली वावरत असतो. धार्मिकता आणि श्रद्धा माणसाच्या जगण्यामध्ये अनेकांना आवश्यक वाटत असल्या तरी श्रद्धेच्या आडोशाने अंधश्रद्धाच आपला प्रभाव गाजवत असल्याचे आढळून येते. त्यामुळेच वैज्ञानिक पायावर आधारलेल्या अवकाश संशोधन मोहिमा महत्त्वाच्या ठरतात.

इस्रोच्या सूर्य मोहिमेतील आदित्य एल-1 अंतराळयान फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या बाह्यतम स्तरांचे (कोरोनाचे) निरीक्षण करणार आहे. यासाठी आदित्य एल-1 अंतराळयानामध्ये सात पेलोड आहेत. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल आणि मॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर वापरून पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1(सन-अर्थ लॅग्रॅन्जियन पॉइंट) येथे भ्रमण करून त्या स्थितीचे निरीक्षण करेल. विशेष व्हँटेज पॉइंट एल-1 वापरून, चार पेलोड्स थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन पेलोड्स लग्रांज पॉइंट एल-1 येथे कण आणि फिल्डचा अभ्यास करतील. मुळात आदित्यला पृथ्वीपासून आठशे किलोमीटर उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि आदित्यला लँग्रॅजिअन पॉईंट एल-1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली.

मोहिमेला आदित्य एल-1 असे नाव देण्यामागचे तेच महत्त्वाचे कारण आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी नासा, जर्मनी आणि युरोपियन अवकाश संस्थेने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहिमा आखल्या होत्या. रशिया आणि चीनने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह सोडले होते. इस्रोने सूर्याचा सविस्तर अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे आणि त्या मोहिमेचा एक टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. सूर्य हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असलेला तारा आहे. लाखो अंश सेल्सिअस उष्ण असलेला आणि पृथ्वीच्या आकारापेक्षा लाखो पटींनी मोठा असणारा हा एक आगीचा गोळा आहे.

सूर्यापासून मिळणार्‍या उष्णता आणि ऊर्जेचा अभ्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावरून करता येणार नाही. त्याचमुळे जगभरातील अंतराळ संस्था, सूर्याच्या अधिकाधिक जवळ जाऊन सूर्यासंदर्भातील संशोधन करण्याचा प्रयत्न करतात. अवकाश संशोधन क्षेत्रात आपण जगातील कोणत्याही देशाहून कमी नसल्याचे इस्रोने वेळोवेळी दाखवून दिले आहे. दोन ताज्या मोहिमा ही त्याचीच उदाहरणे आहेत. इतक्या दूरच्या अंतरावर यान पाठवणे आणि कक्षेत प्रक्षेपित करणे हे इस्रोसाठी मोठे आव्हान होते. इतक्या अंतरावर यानाशी संपर्क ठेवणे, त्याची दिशा नियंत्रित करणे ही खूप कठीण कामगिरी असते, परंतु इस्रोने ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे. विश्वाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत, त्यात भारतही आघाडीवर असल्याचेच इस्रोच्या कामगिरीने दाखवून दिले आहे.

Back to top button