लवंगी मिरची : सेल्फ गोल..! | पुढारी

लवंगी मिरची : सेल्फ गोल..!

कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना काय अवदसा आठवली माहीत नाही. चांगले भारतात आले होते, तीन-चार दिवस पाहुणचार घेतला नंतर विमान बिघडले म्हणून आणखी दोन दिवस राहिले आणि कॅनडात गेल्यानंतर त्यांनी आपल्या देशावर आरोप करायला सुरुवात केली. मित्रा, तुझा अभ्यास आहे जागतिक राजकारणाचा. या पंतप्रधानाचे काही चुकले का की तो बरोबर आहे? मला जरा स्पष्ट करून सांग.

चुकले म्हणजे शंभर टक्के चुकले. गल्लीतील लोकल दादाने बोलावे तसे हे बोलायला लागलेत. त्यांचे म्हणणे असे होते की बाबा तुमच्या देशाविरुद्ध कारवाया करणारा एक शत्रू आमच्या देशाचा नागरिक आहे. तो तुमच्या विरुद्ध काहीही करत असेल तरी त्याचे रक्षण करणे हे आमचे परमकर्तव्य आहे म्हणे. आता आपल्या देशाच्या त्या शत्रूला त्याच्या देशामध्ये कोणीतरी मारले. ही सगळी कारवाई भारताने केली असे त्या पंतप्रधानांचे म्हणणे आहे. मी तुला सांगतो अत्यंत होपलेस माणूस आहे हा. दुसर्‍या देशाला भेट देताना ज्याला स्वतःला चांगले विमान नेता येत नाही तो आणखी काय करू शकणार आहे? पंतप्रधानाचे विमान बिघडल्यानंतर तीन दिवस त्यांना दुसर्‍या देशात राहावे लागते ही त्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट नाही तर काय आहे? मी तुला एक गोष्ट सांगतो. हा कॅनडा अमेरिकेच्या आणि भारतीयांच्या जीवावर जगणारा देश आहे.

अमेरिकेच्या जीवावर कसं काय ? यांचा भारतीयांशी काय संबंध आहे? मला नाही समजले.
अरे अमेरिका आणि कॅनडा हे फ्रेंडली कंट्रीज आहेत. ते इतके जवळचे मित्र आहेत की समजा तू अमेरिकेचा व्हिसा काढलास तर तुला कॅनडामध्ये सरळ जाण्याची परवानगी असते. आपल्या साध्या गावरान भाषेत सांगायचं तर धुर्‍याला धुरा लावून असलेले ते दोन सख्खे भाऊ आहेत अमेरिका आणि कॅनडा. भारताचा संबंध म्हणजे भारतीय आणि विशेषत: पंजाबी लोकांनी तेथील अर्थव्यवस्था उचलून धरलेली आहे. कॅनडाच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. याचमुळे पंजाबी मते जिंकण्यासाठी भारत विरोधी विधान करून ट्रुडो यांनी जगभरात खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला आहे.

संबंधित बातम्या

पण आता भारतही काही कच्च्या गुरूचा चेला नाही हे त्याला कळाले नाही. देशविरोधी कारवाया करणारांना दुसर्‍या देशात घुसून मारणारा भारत हा एक बलाढ्य देश आहे. भारताने तत्काळ त्यांना सुनावले की, तुमच्या देशामधून आमच्याविरुद्ध होणार्‍या कारवाया बंद करा. आम्ही मागत आहोत ते वीस पंचवीस अतिरेकी आमच्या ताब्यात दे. तुला सांगतो या कॅनडाची परिस्थिती पाकिस्तान सारखी होणार आहे. ज्या ज्या देशांनी अतिरेकी पाळले तेच अतिरेकी नंतर त्याच देशावर उलटलेले नेहमी पाहायला मिळतात. आज थोडा नरम पडलाय ट्रुडो कारण आपण चुकलो आहोत हे त्यांच्या लक्षात आले आहे.

तुला माहीत आहे का, क्रिकेटमध्ये सेल्फ आऊट असतो. म्हणजे बॅटिंग करताना बॅट्समनच्या स्वतःच्या बॅटने स्टंप उडाले तर तो सेल्फ आऊट होतो. फुटबॉलमध्येही घाई गडबडीत काही खेळाडू स्वतःच्याच गोल पोस्टमध्ये बॉल ढकलतात. तासा ट्रुडो यांनी स्वतःच्याच देशाविरुद्ध गोल केलेला आहे. ट्रुडो यांना कसे कळत नाही, भारत हा वेगाने विकसित होत असलेला देश आहे. खलिस्तानी भारतात विरोधात गरळ ओकत असताना त्यांंना आपल्या जवळ करणे हे भविष्यात कितपत फायदेशीर ठरेल हे त्यांना कसे कळत नाही. भविष्यात हा देश अडचणी येऊ शकतो हे त्यांना विसरून चालणार नाही!

Back to top button