लवंगी मिरची : दादा, ढाब्यावर या! | पुढारी

लवंगी मिरची : दादा, ढाब्यावर या!

प्रसिद्ध मराठी अभिनेते निळू फुले यांनी आपल्या आयुष्यात अधिकतर खलनायकाच्या भूमिका केल्या आहेत.निळू फुलेंचा काळ 1960 ते 1985 हा होता. त्या काळात ग्रामीण भागामध्ये खलनायक हा सरपंच असायचा. त्या काळी निळू फुले यांच्या बहुतांश भूमिका सरपंचाच्या असायच्या. सरपंचाचा मोठा वाडा असायचा. आजूबाजूला सेवेला माणसे असायची आणि या काळात त्यांचा एक संवाद फार प्रसिद्ध झाला होता आणि तो म्हणजे, ‘बाई वाड्यावर या!’ यथोचित स्वागत आणि सत्कार करता यावा म्हणून हे वाड्यावर येण्याचे आग्रहाचे निमंत्रण असायचे.

नुकतेच एका मोठ्या पक्षाच्या राज्याध्यक्षांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपले सामाजिक संबंध सलोख्याचे असावेत, यासाठी पत्रकार मंडळींना चहापाणी करण्याच्या आणि ढाब्यावर जेऊ घालण्याच्या सूचना केल्या आहेत. आजकाल शहरातील लोक घरच्यासारखे जेवण मिळावे म्हणून गावाबाहेर जेवायला हॉटेलमध्ये जेवायला जातात. पुणे शहराला हॉटेलिंगची मोठी परंपरा असली, तरी मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्राला ढाब्यांची मोठी परंपरा आहे. ढाबे हे खरे तर मूळ पंजाबी प्रकरण आहे. पत्र्याचे भले मोठे छत, त्याखाली टाकलेल्या पाच-पंचवीस बाजा आणि किचन साईडला ढणढणते तंदूर असे ते द़ृश्य असते. महाराष्ट्राने ती संस्कृती बरोबर उचलली आणि गावाबाहेर ढाबे तयार झाले. ढाब्याबाहेरील भल्या मोठ्या पाट्यांवर बकरा आणि गावरान कोंबडा यांचे छायाचित्र लावलेले असते. तसे पाहता हे दोन अत्यंत निरुपद्रवी प्राणी, म्हणजे एक प्राणी आणि एक पक्षी. अस्सल चवीचे खाणार्‍याला त्यांची चित्रे आकर्षित करतात. परंतु, आपला पीआर म्हणजे जनसंपर्क चांगला असावा यासाठी पत्रकारांचे चित्त आकर्षित करण्यासाठी त्यांना हे चित्र दाखवावे अशी सूचना सदरील राज्याध्यक्ष महोदयांनी केलेली आहे. सदरहु गृहस्थ हे वैदर्भीय असल्यामुळे साहजिकच त्यांना ढाबा संस्कृतीचे आकर्षण असावे यात काही नवल नाही.

ढाब्यावर खालेल्या खमंग चुरचुरीत जेवणाला आणि विशेषत: त्यात असणार्‍या मिठाला जागून पत्रकार बंधूंनी आपल्या पक्षाबद्दल सकारात्मक बातम्या लिहाव्यात अशीच अध्यक्ष महोदयांची इच्छा असणार. शिवाय साजूक तुपात बनवलेले गावरान बकर्‍याचे मटण आणि सोबत बाजरीची कडक भाकरी असेल, तर पत्रकार बंधूंना याची भुरळ पडणार हे नक्की. पत्रकार असला तरी शेवटी तो माणूसच असतो आणि कुणाही माणसाला आपले केलेले कौतुक, सन्मान, आदर, सत्कार हवेहवेसे वाटत असतात. कारण, ही सहज सुलभ मानवी प्रवृत्ती आहे.

संबंधित बातम्या

चहा पाणी घ्या, ढाब्यावर जरूर जा; पण बातम्या मात्र जनतेच्या हिताच्या लिहा. कारण, ते आपले कर्तव्यच आहे. निवडणुकांच्या तोंडावर अशी अद्भूत सूचना करून अध्यक्ष महोदयांनी येणारा काळ हा खमंग वासाचा असणार आहे, याची जणू ग्वाहीच दिली आहे.
सध्या राजकारणाचा भाग म्हणूनही कोणत्याही गोष्टींचा आधार सर्व पक्षांकडून घेतला जात आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी कोणी काय बोलेल याचे भानच नाही. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बोलताना भान राखावेच लागेल. सध्या सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकांची जय्यत तयार केली जात आहे. त्यातून कोणती वक्तव्ये कोणत्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडतील, याचा नियम नाही; पण प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लोकहितकारक योजना आणि गोष्टींवर बोलण्याची गरज आहे, हे मात्र खरे!

                                                                                   – झटका

Back to top button