

हनुमानाने सूर्य पकडण्याचा प्रयत्न केल्याची पुराणातली कथा लोकप्रिय आहे. तीच पुढे लोकसाहित्यात आणि गाण्यांमध्येही आली. 'अंजनीच्या सुता' या गाजलेल्या गाण्यातील 'दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्याला धराया' या ओळी अनेकांच्या ओठावर आजही आहेत. पुराणातल्या गोष्टी पुराणात राहिल्या तरी आधुनिक युगात त्यांचा संदर्भ येतो तो कसा, ते सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेल्या आदित्य-एल-1 सौर मोहिमेने दाखवून दिले. चांद्रयान-3 च्या देदीप्यमान यशानंतर इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी आणखी एक गगनभरारी घेतली.
सूर्याच्या निरीक्षणासाठी इस्रोची ही पहिली समर्पित मोहीम. मोहिमेतील आदित्य एल-1 अंतराळयान फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या बाह्यतम स्तरांचे (कोरोनाचे) निरीक्षण करेल. यासाठी आदित्य एल-1 अंतराळयानामध्ये सात पेलोड आहेत. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल आणि मॅग्नेटिक फिल्ड डिटेक्टर वापरून पृथ्वीपासून सुमारे पंधरा लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 (सन-अर्थ लॅग्रॅन्जियन पॉईंट) येथे भ्रमण करून त्या स्थितीचे निरीक्षण करेल.
विशेष व्हँटेज पॉईंट एल-1 वापरून, चार पेलोडस् थेट सूर्याकडे पाहतील आणि उर्वरित तीन पेलोडस् लग्रांज पॉईंट एल-1 येथे कण आणि फिल्डचा अभ्यास करतील. मुळात 'आदित्य'ला पृथ्वीपासून आठशे किलोमीटर उंचीवर ठेवण्याची योजना होती. पण नंतर एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार करण्यात आला आणि 'आदित्य'ला लँग्रॅजिअन पॉईंट एल-1 जवळ ठेवण्याची योजना आखण्यात आली. म्हणूनच या मोहिमेला 'आदित्य एल-1' असे नाव देण्यात आले. सोलर कोरोनाचे निरीक्षण हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यापूर्वी नासा, जर्मनी आणि युरोपियन अवकाश संस्थेने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहिमा आखल्या होत्या.
रशिया आणि चीनने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह सोडले होते. आता इस्रोने सूर्याचा सविस्तर अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर ब्रह्मांडाचे कोडे उलगडण्यासाठी या सूर्यमोहिमेचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. ती अखेर वास्तवात आली आहे. विश्वाचा पसारा उलगडण्यासाठी जगभरातील काही प्रमुख देशांनी अवकाश संशोधनात प्रगती केली आहे. त्या पंगतीत भारत आता अभिमानाने जाऊन बसला आहे, हे विशेष.
प्रत्येक देश वेगवेगळ्या क्षेत्रांत कौशल्य गाजवत असतो. जागतिक पातळीवर दिशादर्शक ठरतील अशा गोष्टी जर त्यातून आकाराला येत असतील तर संबंधित देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावत असते. अगदी ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धेपासून ऑस्करसारख्या चित्रपट पुरस्कारांपर्यंत विविध क्षेत्रांतल्या कर्तृत्वाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली जात असते. विज्ञानाचे क्षेत्र तशाच प्रकारचे असून विज्ञानातील कुठलाही शोध हा अखंड मानवजात किंवा सजीवसृष्टीसाठी उपकारक ठरत असतो. त्यामुळे त्याला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा असते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने गेल्या सहा दशकांमध्ये देशाला असे अनेक गौरवाचे क्षण दिले.
चांद्रयान-3 पाठोपाठची ही सूर्याला गवसणी घालणारी मोहीम त्याचे पुढचे पाऊल आहे. आपले विश्व असंख्य तार्यांनी बनलेले असून विश्वाचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. स्वाभाविकपणे आपण ज्या सूर्यमालेत राहतो, ते समजून घेण्यासाठी सूर्याबाबत जाणून घेणेही महत्त्वाचे ठरणार आहे. सूर्य हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असलेला तारा आहे. लाखो अंश सेल्सिअस उष्ण असलेला आणि पृथ्वीच्या आकारापेक्षा लाखो पटींनी मोठा असणारा हा एक आगीचा गोळा. सूर्यापासून मिळणार्या उष्णता आणि ऊर्जेचा अभ्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावरून करता येणार नाही. त्याचमुळे जगभरातील अंतराळ संस्था सूर्याच्या अधिकाधिक जवळ जाऊन सूर्यासंदर्भातील संशोधन करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही दोन खगोलीय वस्तू किंवा ग्रहांमध्ये गुरुत्वाकर्षणाचे बल कार्यरत असते.
गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वी सूर्याभोवती किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. अशा दोन ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षणाचा एकमेकांवर प्रभाव पडू शकतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर भरती-ओहोटी येते. पण काही बिंदू असे असतात, जिथे दोन्ही ग्रहगोलांचे बल समसमान असते. तिथे असणारी वस्तू कुणा एकाच्या बाजूने खेचली न जाता मध्ये तोल सांभाळते. स्वीस गणितज्ज्ञ लिओनार्ड यूलर यांनी या बिंदूंची संकल्पना मांडली आणि इटालियन-फ्रेंच गणितज्ज्ञ जोसेफ लुई लग्रांज यांनी या बिंदूंवर संशोधन केले. जोसेफ लुई यांच्या सन्मानार्थ या बिंदूंना लग्रांज पॉईंट असे नाव देण्यात आले. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असे पाच लग्रांज बिंदू असून त्यांना एल1, एल2, एल3, एल4 आणि एल5 म्हणून ओळखले जाते. पैकी एल1 आणि एल2 हे बिंदू तुलनेने जवळ आहेत. एल2 या बिंदूजवळ यान पृथ्वीमागे झाकले जाऊ शकते.
असा अडथळा न येता सूर्याचे निरीक्षण करता यावे, यासाठीच इस्रोने एल1 बिंदूची निवड केली. तरीसुद्धा एवढ्या लांबवर यान पाठवणे आणि कक्षेत प्रक्षेपित करणे हे इस्रोसाठी मोठे आव्हान होते. परंतु इस्रोकडे चंद्राबरोबरच मंगळापर्यंत यान पाठवण्याचा अनुभव आहे. इतक्या अंतरावर यानाशी संपर्क ठेवणे, त्याची दिशा नियंत्रित करणे ही खूप कठीण कामगिरी असून इस्रोकडून ती यशस्वीपणे पार पाडली जात आहे. पाठोपाठच्या दोन मोहिमांचा देशात वैज्ञानिक जाणिवा विकसित होण्यासाठी उपयोग व्हायला हवा. अनेकदा विज्ञानाचा विचार अज्ञानाच्या अंध:कारामागे झाकोळून गेल्याचे पाहायला मिळते. या दोन्ही यशस्वी मोहिमांनी चंद्र-सूर्यामागचे दडलेले सत्य समोर मांडले. त्यातूनच देश अधिक वैज्ञानिक विचार आणि आचरणाच्या दिशेने चालू लागेल, ही आशा. अवतीभवतीच्या वातावरणात निराशेचे मळभ दाटले असताना गेल्या काही दिवसांमध्ये इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देशवासीयांना ते मळभ झटकून टाकण्याची प्रेरणा आणि ऊर्जा दिली आहे.