लवंगी मिरची : एकच इलेक्शन | पुढारी

लवंगी मिरची : एकच इलेक्शन

काय रे मित्रा, दिसला नाहीस अशात की फिरकला पण नाहीस. कुठे गायब झाला होतास?
अरे, विशेष असे काही नाही. गावाकडे गेलो होतो. सोसायटीची इलेक्शन लागली ना? दोन्ही पार्ट्या सारख्या फोनवर फोन करत होत्या, मतदानाला या म्हणून. एवढेच नाही, तर जाण्यायेण्याचा खर्च म्हणून दोघेही पैसे पाठवायला तयार होते. आता यानंतर डिसेंबरमध्ये ग्रामपंचायत निवडणुका आहेत, त्या पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. माझे मतदान तिकडे असल्यामुळे गावाकडून प्रत्येक इलेक्शनसाठी मतदानाला येण्याचा आग्रह केला जातो. मी पण आवर्जून जात असतो. शिवाय विधानसभा आणि लोकसभेला तर आमच्या इथून ट्रॅव्हल्सच्या गाड्या भरून गावाकडे नेल्या जातात. बर्‍याच लोकांचे मतदान गावात आहे. त्यांना खाणे-पिणे आणि प्रवासाची वातानुकूलित सेवा देऊन वर मानधन म्हणून काही पैसे देऊन; पण गावाकडे बोलवले जाते. हे कधी थांबणार काय माहीत?

होईल होईल.. लवकरच होईल. ‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण देशात घेण्याची चर्चा सुरू आहे. तसे झाले तर बराच खर्च वाचू शकेल, असे मला वाटते.

अरे बाबा, माझे काय म्हणणे आहे की, केवळ विधानसभा, लोकसभाच नाही, तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि गावातल्या सोसायट्या त्याचबरोबर वेगवेगळ्या पतपेढ्या यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या, तर निवडणूक घेणार्‍यांचा आणि लढवणार्‍यांचा दोघांचाही खर्च वाचेल. देशाचे हजारो कोटी रुपये वाचणार असतील, तर माझा मात्र या वन नेशन वन इलेक्शनला माझा सहर्ष पाठिंबा आहे. फक्त त्याबरोबर ग्रामपंचायत आणि सोसायटी यांच्या निवडणुका पण घ्या म्हणावे!

होय तर, अतिशय अटीतटीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या जातात. अमाप पैसा खर्च केला जातो, शेकडोंनी कोंबड्या आणि बकरे कापली जातात, दारूचा तर महापूर असतो. एवढे करून निवडणुका संपल्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत म्हणजे पुढील पाच वर्षे एकमेकांची टाळकी फोडण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असतो. एकाच वेळी सगळ्या निवडणुका घेतल्या, तर पैसेही वाचतील आणि टाळके फोडण्याचे कार्यक्रम पण कमी होतील.

ज्याच्या कुणाच्या डोक्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचार आला त्याला मानले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये मतदार चांगल्यापैकी सुज्ञ झाला आहे. एकाच वेळी निवडणुका घेतल्या, तरी विधानसभेसाठी राज्यपातळीवरील प्रश्नाला कोण न्याय देऊ शकेल आणि त्याचवेळी देशपातळीवरील प्रश्न कोण चांगल्या पद्धतीने हाताळत आहे, हे लक्षात घेऊनच तो मतदान करेल.

जे काय व्हायचे असेल ते होऊ दे; पण प्रचंड परिश्रम घेऊन राबवली जाणारी निवडणूक यंत्रणा आणि त्यात वाया जाणारे हजारो तास आणि करोडो रुपये या सर्वांचा खर्च वाचवला पाहिजे. कुणाला फायदा होवो की कुणाला तोटा होवो, एकाच वेळी निवडणुका घेतल्यामुळे खर्च मात्र नक्कीच वाचणार आहे आणि त्याचा हातभार देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याला होणार आहे, याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही.

Back to top button