लक्ष्मीपूजन : समृद्धीचे वरदान | पुढारी

लक्ष्मीपूजन : समृद्धीचे वरदान

आश्विन आमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन दिवस. या दिवशी मंगलस्नानाने सुरुवात होते. सकाळी देवांची पूजा, दुपारी पार्वणश्राद्ध आणि संध्याकाळी लक्ष्मी, विष्णू तसेच कुबेर आदी देवतांची पूजा असा क्रम धर्मग्रंथांत सांगितलेला आढळतो. प्राचीन काळी बळी नावाच्या पराक्रमी राजाने पृथ्वी तर जिंकलीच शिवाय लक्ष्मीसारख्या अनेक देवतांना बंदिवासात टाकले. विष्णूने त्या सर्वांना मुक्त केले. मुक्त झालेले देव नंतर शांतपणे क्षीरसागरात जाऊन झोपी गेले, अशी कथा आढळते. या सर्व देवतांसाठी पूजेची व्यवस्था आणि सर्वत्र प्रसन्न पणत्यांचा उजेड केला जातो. पार्वणश्राद्ध म्हणजे श्राद्धाचा एक प्रकार असतो. पित्रादी त्रयीला उद्देशून व तीन पिंडांनी युक्त असे हे श्राद्ध केले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे, याचे मार्गदर्शन आढळते. एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदलांचे कमल चिन्ह किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवतात. तिच्यासाठी असा मंत्र म्हणतात –

“नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरेः प्रिया।
या गतिस्त्वत्प्रन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात्॥”

याचा अर्थ असा की, ‘(हे लक्ष्मी) तू सर्व देवांना वर देणारी आहेस आणि विष्णूला प्रिय आहेस. तुला जे शरण येतात, त्यांना जी गती प्राप्त होते, ती गती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो.’

नंतर या लक्ष्मीजवळ निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्याची पूजा केली जाते. धन व धान्य यांची प्राप्ती व्हावी, म्हणून कुबेराला प्रार्थना केली जाते. लक्ष्मीसह सर्व देवतांना सुगंधी दुधाचा व खव्याचा नैवेद्य दाखवतात. साळीच्या लाह्या व बत्तासे हेही अर्पण करून मग सर्वांना वाटतात. हातात चूड धरून पितरांना मार्गदर्शन केले जाते. पुराण साहित्यात असे वर्णन आहे की, या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरत असते आणि स्वतःच्या निवासासाठी योग्य स्थान शोधत असते. जी वास्तू स्वच्छ, टापटीप, प्रसन्न राखलेली असते, तिथे ती राहते. त्यामुळे या रात्री जागरण करतात. मध्यरात्र झाल्यानंतर अलक्ष्मीला प्रतीकात्मक रूपाने हाकलून लावतात. ‘अलक्ष्मी’ ही देवतेची संकल्पना निराळीच आहे. देव आणि आसुर यांनी समुद्रमंथन केले. त्यावेळी कालकूट विषानंतर; पण लक्ष्मीच्या आधी ही वर आली म्हणून ती झाली लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठा! अलक्ष्मीने पाण्यातून वर आल्यावर देवांना विचारले, “मी काय करू? कुठे राहू?” देवांनी तिला सांगितले, “तू कोळसा, केस, केर, अस्थी या ठिकाणी राहा. जिथे भांडणतंटा, दुष्ट कामे, अनीतिमान व्यवहार चालतो, तिथे राहा.” अलक्ष्मीच्या रथावर जो ध्वज असतो, त्यावर कावळा असतो. प्राचीन तमिळ निघंटु ग्रंथात तिचे वाहन गाढव व केरसुणी हे आयुध सांगितले आहे. याच ग्रंथात ज्येष्ठा देवीला शीतला म्हटले आहे. आमावास्येच्या दिवशी तिचे निवारण कसे केले जाई? तर, शेणापासून तिची लहान मूर्ती बनवत. मंत्रासह तिची पूजा होई. मध्यरात्रीनंतर सूप व दिमडी वाजवत तिचे गावाच्या सीमेबाहेर विसर्जन केले जाई. बंगालमध्ये या प्रतिमेला ‘क्षणिका अलक्ष्मी’ असे म्हणतात.

आता या दिवशीची मुख्य देवता असलेल्या लक्ष्मीबद्दल आपण थोडे जाणून घेऊया! लक्ष्मी ही विष्णूची केवळ पत्नी नाही, तर त्याची शोभा, कांती व तेज आहे. ‘लक्ष्म’ म्हणजे चिन्ह या शब्दावरून ‘लक्ष्मी’ शब्द बनला. लक्ष्मीचे चिन्ह कोणते, याबद्दल प्राचीन काळातही निश्चित माहिती मिळत नाही. परंतु, ‘श्री’ हा शब्द ‘लक्ष्मी’ शब्दाचा पर्याय आहे. ‘श्री’ हे अक्षर स्वस्तिक चिन्हापासून बनले. त्यामुळे लक्ष्मीचे चिन्ह स्वस्तिक असावे, असे मानले जाते. श्रीसुक्ताने लक्ष्मीची उपासना केली जाते. अगदी प्राचीन काळात ‘श्री’ व ‘लक्ष्मी’ या दोन वेगळ्या देवता होत्या. तेज आणि ऐश्वर्याची राज्ञी असलेल्या ‘लक्ष्मी’ संकल्पनेच्या उत्क्रांतीचा इतिहास मोठा रंजक आहे. कमल पुष्प, गज, सुवर्ण आणि बेलफळ या गोष्टी तिच्याशी निगडित असतात. उपनिषदांच्या काळात बिल्वफल म्हणजे बेलफळाला ‘श्रीफल’ म्हटले आहे. लक्ष्मीची आठ रूपे कल्पिली गेली आहेत. ती म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विनयालक्ष्मी आणि राज्यलक्ष्मी.

प्राचीन शिल्पकलेत गजलक्ष्मीच्या देखण्या मूर्ती आढळतात. पद्मावस्थेत (म्हणजे कमळावर बसलेली), पद्मग्रह (म्हणजे कमळ हातात घेतलेली) आणि पद्मवत्स (म्हणजे कमळांनी वेढलेली) अशा लक्ष्मी मूर्तीचे वर्णन आढळते. गुप्तकाळात पुराण साहित्याला उठाव आला आणि या काळात लक्ष्मीच्या पूजेला विलक्षण महत्त्व आले. गुप्त सम्राटांच्या शिक्क्यावर लक्ष्मीची मूर्ती ठसवली गेली.

‘लक्ष्मी’चे दोन भावात्मक पुत्रही मानले जातात. त्यांची नावे बल आणि उन्माद होय! मात्र, महाभारतातील शांतिपर्वातील एक संदर्भ महत्त्वाचा आहे. आपले निवासस्थान कुठे असते, हे सांगताना लक्ष्मी देवता म्हणते, “मी प्रयत्न करण्यात राहते, मी उद्योगरूपी आहे. समृद्ध आहे. शांती, प्रेम, दया, सलोखा, न्याय, नीती जिथे असतात, तिथे मी आनंदाने राहते.” आपल्याला व्यक्तिगत संपन्नतेसह निसर्गलक्ष्मीही जपायचं व्रत घ्यायला हवं. कारण, निसर्ग समृद्ध, तर देशही समृद्ध..!

Back to top button