ड्रॅगनभोवती नवे त्रिकूट | पुढारी

ड्रॅगनभोवती नवे त्रिकूट

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

कौटिल्याने असे म्हटले होते की, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! या द़ृष्टीने विचार करता अमेरिका, जपान आणि कोरिया या सर्वांचा समान शत्रू म्हणजे चीन होय. त्यामुळे चीनशी लढावयाचे झाले, तर या सर्व मित्रांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे ओळखून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मुत्सद्देगिरी वापरत अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या त्रिकुटाची निर्मिती केली आहे. हा त्रिकोण म्हणजे चिनी ड्रॅगनविरुद्ध प्रतिशह देण्यासाठी तयार केलेले एक नवे आंतरराष्ट्रीय भौमितिक सूत्र आहे.

जगाचे राजकारण झपाट्याने बदलत आहे. एकीकडे साम्यवादी चीन आणि त्याची हुकूमशाही वाटचाल ही सत्तेचे वेगवेगळे कारनामे दाखवीत आहे, तर त्याला प्रतिशह देण्यासाठी लोकशाही प्रधान अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक परस्परविरोधी विचारांचे देशसुद्धा एकत्र येऊन लढण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेत अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानने ऐतिहासिक समझोता केला. याला ऐतिहासिक असे म्हणायचे कारण म्हणजे, दुसर्‍या महायुद्धापूर्वीच्या काळामध्ये कोरिया आणि जपानमध्ये आडवा विस्तवही जात नव्हता. दोन्ही राष्ट्रांचे संबंध खूपच ताणलेले होते. जेव्हा जपानने कोरियावर वर्चस्व गाजवले तेव्हा त्यांच्या सैन्याने केलेले अत्याचार आणि तेथील लोकांचा झालेला अपमान कोरियन लोक विसरण्यास बराच वेळ लागला. परंतु, आता थोडेसे वातावरण निवळले आहे. जपान आणि दक्षिण कोरिया ही शेजारी राष्ट्रे एकमेकांचे शत्रू असूनही वर्तमान परिस्थितीच्या दबावामुळे एकत्र येत आहेत, ही एक विशेष महत्त्वाची बाब होय.

दक्षिण कोरिया आणि जपान या दोन देशांचा मागचा इतिहास मोठा रंजक आहे. दुसर्‍या महायुद्धापूर्वी जपानने रशिया, इंग्लंड यांच्याबरोबरच चीनलाही धमकावले होते. तसेच अनेक आशियाई राष्ट्रांवरसुद्धा पगडा गाजवला. त्या काळात जपानने सुमारे 30-40 वर्षे दक्षिण कोरियावर राज्य केले. त्या काळात जपानी सैन्याने केलेली मुस्कटदाबी आणि त्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे व्यथित झालेले दक्षिण कोरियाई लोक अजूनही त्या दु:खातून बाहेर पडण्यास तयार नाहीत. त्यापैकी एकाचे असे म्हणणे आहे की, खरे तर याबाबतीत जपानने जाहीरपणे माफी मागायला हवी होती; पण तशी माफीही त्यांनी मागितली नाही. परंतु, आता चीनचा धोका समोर दिसल्यामुळे कोरिया आणि जपान एकत्र येत आहेत. जपानचे नेते किशिंदा आणि दक्षिण कोरियाचे नेते युन सूक येओल यांनी एकत्र येऊन ताज्या बैठकीत मागचा सगळा इतिहास विसरून जाऊन नव्याने कोर्‍या पाटीवर मैत्रीचा हात पुढे केला आहे. या दोन्हीही विळा-भोपळ्याचे सौख्य असलेल्या मित्रांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्यास बायडेन यांना आलेले यश फार महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते टीबी यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे. दक्षिण कोरिया आणि जपानने दाखवलेले राजकीय धैर्य स्पृहणीय आहे. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते, दुसरा कोणताही मार्ग उरत नाही तेव्हा नुसता एकमेकांचा त्रागा व आदळआपट करण्यापेक्षा आपण एकत्र उतरून एकत्र येण्यास काय हरकत आहे, असा विचार दोन्ही देशांनी केला. त्यामुळे टोकियो आणि सेहूलदरम्यानचे बर्‍याच वर्षांचे ताणलेले संबंध सुधारले आणि आता दोन्ही राष्ट्रे एकत्र आली आहेत. हे संबंध सुधारण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून प्रयत्न चालू होते. जुलैमध्ये याबाबतीत जपानने पडती भूमिका घेऊन कोरियाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ही दोन्ही राष्ट्रे एका व्यासपीठावर येण्याचा चमत्कार घडू शकला. जगाच्या राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो व कायमचा मित्र नसतो, असे म्हटले जाते, ते खरेच आहे. त्यामुळे शत्रुत्वाची भावना सोडून देऊन दोन्ही राष्ट्रे एकत्र आली व त्यांना एकत्र आणण्यास बायडेन यांनी प्रयत्न केले, ही गोष्ट मान्य केली पाहिजे.

एकानंतर एक आघाड्या, मैत्री, त्रिकूट करण्यात बायडेन पटाईत आहेत. बुद्धिबळाच्या खेळातील एक एक डाव टाकावा तसे ते डाव टाकत आहेत. त्यांचे हे चेकमेट धोरण कसे आहे? त्याचे विश्लेषण काय करावे? जगातील अनेक विद्यापीठांतील तज्ज्ञांनी याबाबतीत बायडेन यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. त्याचे कारण असे की, आता पुढील वर्षी अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुका येऊ घातल्या आहेत. या अध्यक्षीय निवडणुकीला बायडेन यांना सामोरे जावयाचे आहे. अमेरिकन जनमतावर आपण काही वेगळे करत आहोत आणि अमेरिकेचे प्रभुत्व पुन्हा जगामध्ये प्रस्थापित करण्याचा माझा प्रयत्न आहे, हे त्यांना बिंबवायचे आहे.

या सर्व चर्चेचे सार असे की, अमेरिकेने पुढाकार घेऊन जपान आणि दक्षिण कोरियाला एकत्र केले आणि एका नव्या त्रिकोणाची स्थापना केली. हा त्रिकोण म्हणजे चीनी ड्रॅगनविरुद्ध प्रतिशह देण्यासाठी तयार केलेले एक नवे आंतरराष्ट्रीय भौमितिक सूत्र आहे. या त्रिकोणाचा चौथा बिंदू म्हणून अमेरिका भारताकडे पाहत असली, तरीदेखील भारत मात्र सावध आहे. कारण, भारताला थेट चीनचे शत्रुत्व घ्यावयाचे नाही. तसेच जपान हा भारताचा मित्र आहे. दक्षिण कोरियाशी भारताचे संबंध चांगले आहेत. सक्रिय अलिप्तता या भारताच्या धोरणाचा विचार करता भारत सावध पावले टाकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात जपानचे भरपूर सहाय्य घेतले आहे. शिवाय त्यांचा मागील महिन्यातील अमेरिका दौरासुद्धा नव्या आशा, आकांक्षा पल्लवित करणारा ठरला. आशियाच्या राजकारणात इतर राष्ट्रांचा प्रभाव फार वाढणे भारतालासुद्धा फारसे सुखावह नाही. त्यामुळे चीनने दिलेली प्रतिक्रिया मोठी अर्थपूर्ण आहे.

चीनने असे म्हटले आहे की, आशियातील राष्ट्रांनी एकत्र येऊन आशियाचे प्रश्न सोडवावेत. यासाठी अमेरिकेसारख्या महासत्तेला प्रवेश का द्यायचा? हे चीनचे म्हणणे असले, तरीदेखील या पद्धतीच्या प्रतिक्रियेपेक्षाही चीनने साम्राज्यवादी भूमिका सोडून देऊन आशिया खंडातील इतर राष्ट्रांबरोबर मैत्रीची आणि प्रेमाचे संबंध ठेवले आणि थोडी पुंडाई कमी केली, साम्राज्यवादी विस्ताराची पावले कमी केली पाहिजेत; पण सर्व गरीब राष्ट्रे एकत्र आली पाहिजेत, गरीब राष्ट्रांनी मोठ्या राष्ट्रांशी संघर्ष केला पाहिजे, हे लेनिनचे तत्त्वज्ञान चीन मात्र विसरलेला आहे. उलट चीन आशिया खंडामध्ये म्हणजे छोट्या छोट्या गरीब राष्ट्रांना पंजात पकडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अमेरिकेला काय किंवा जपानला काय, चीनच्या वाढत्या पुंडाईला प्रतिशह देण्यास दुसरा पर्याय उरत नाही. त्यामुळे एका अर्थाने ही शिखर परिषद म्हणजे एक नवा मैलाचा दगड आहे. एका नव्या युगाची सुरुवात आहे, असे म्हणावे लागेल.

Back to top button