चांद्रयानाची ऐतिहासिक मोहीम यशस्वी करून भारताने संपूर्ण जगामध्ये आपल्या तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा डंका वाजवला आहे. 'प्रज्ञान' नावाची आपली बग्गी चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर मुक्त संचार करत आहे. एकूण 14 दिवस ही बग्गी सातत्याने चंद्राच्या विविध भागांचे फोटो 'इस्रो'ला पाठवणार आहे. विशेष सांगायचे म्हणजे हे सर्व फोटो अत्यंत स्पष्ट आणि सामान्य माणसालाही पाहून अभ्यास करता येण्यासारखे आहेत. मग मी काय म्हणतो मित्रा! की बुवा, कितीतरी लाख किलोमीटरवरून यंत्राने काढलेले फोटो जर अत्यंत स्पष्ट येत असतील तर मग काही फुटांवरून काढलेला आधार कार्डचा फोटो इतका का घाणेरडा येतो? आपण या तंत्रज्ञानातसुद्धा काहीतरी संशोधन करायला पाहिजे, जेणेकरून आधार कार्डवरील फोटोसुद्धा, नसो आकर्षक; परंतु किमान व्यक्ती जसा आहे तसातरी आला पाहिजे.
हो ना यार! माझा स्वतःचा आधार कार्डवरचा फोटो पाहिला की, मला फार कॉम्प्लेक्स येतो. इतका काही मी वाईट दिसत नाही; परंतु आधार कार्डवरचा फोटो मात्र 'आपण यांना पाहिलेत का' अशा प्रकारचा किंवा पोलिस स्टेशनमध्ये वॉन्टेड आरोपींचे फोटो असतात तसा येत असतो. बरे, आधार कार्ड हा एक आपल्या स्वतःच्या ओळखीचा फार मोठा पुरावा समजला जातो. आज आधारकार्डची गरज पडत नाही अशी जागा नाही. संबंधित व्यक्ती म्हणजे उदाहरणार्थ आपण एखाद्या हॉटेलवर थांबलो आहोत, तिथे आधार कार्ड देणे अत्यावश्यक आहे. तेथील काऊंटरवरील मॅनेजर हा आधार कार्डवरील आपला फोटो आणि आपले प्रत्यक्षातील मुखकमल याचा मेळ बसवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी तो एक नजर आधार कार्डवर आणि एक नजर आपल्या चेहर्यावर फेकत असतो. आपण संशयित गुन्हेगार असल्यासारखी त्याची नजर आपल्याला स्कॅन करत असते. एकदाची कशीबशी त्याला ओळख पटते आणि आपला प्रवेश निश्चित होतो. मी काय म्हणतो, असे कोणते अद्भुत कॅमेरे आधार कार्डसाठी वापरले जातात की, ज्याचा फोटो काढला त्याचा आणि त्याच्या चेहर्याचा काही संबंध दिसून येत नाही.
खरी कमाल ही आहे की, चंद्रावरची आपली 'प्रज्ञान' नावाची चाके असलेली जी बग्गी फिरते आहे, तिच्या टायरच्या खुणांचेसुद्धा स्पष्ट फोटो सर्वत्र व्हायरल झालेले आहेत. तर मग आधार कार्डावरच हा चमत्कार का केला जातो, हे समजायला मार्ग नाही.
मला असे वाटते की, आधार कार्ड काढण्यासाठी वापरले जात असणारे कॅमेरेसुद्धा तयार करण्याची जबाबदारी 'इस्रो'वर द्यायला पाहिजे. वधूवर सूचक मंडळांनी समजा वर आणि वधूचे आधार कार्ड एकमेकाला दाखवले तर एकही लग्न जुळण्याची शक्यता नाही. आपला होणारा नवरा किंवा पत्नी इतक्या भयावह चेहर्याचे असतील, तर कोणताच मुलगा मुलीला आणि कोणतीच मुलगी मुलाला कधीच पसंत करणार नाही.
हे तुझे बरेच आहे, म्हणजे आता आधार कार्डचे कॅमेरेपण 'इस्रो'ने द्यायचे? उद्या तू म्हणशील, पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी 'इस्रो'ने गावोगावी दुकाने उडाली उघडली पाहिजेत. याला काही अर्थ नाही. आधीच ते शास्त्रज्ञ बिचारे सरकारी पगारामध्ये काम करून देशाला भूषणावह अशी कामगिरी करत आहेत. त्यात तुमच्यासारखे लोक 'इस्रो'ने सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय व्हावे, अशी अपेक्षा बाळगत असतील तर ते पूर्णतः चूक आहे. हा, एक मात्र मान्य केले पाहिजे की, आधार कार्डवरील फोटो चांगला निघावा याचेही काहीतरी तंत्रज्ञान कोणीतरी विकसित केले पाहिजे. जेणेकरून देशाचे 140 कोटी नागरिक स्वतःच्या आधार कार्डवरील फोटोवर खूश राहतील.