‘देव’घरातील सीमा | पुढारी

‘देव’घरातील सीमा

मानवेंद्र उपाध्याय, सिनेसमीक्षक

साठी-सत्तरीच्या काळातील मराठी नायिका पाहिल्यास, त्यातील बहुतांश नायिकांमधील शालीनता, सोज्वळपणा हाच त्यांच्या अभिनयाचा आणि लोकप्रियतेचा गाभा होता, असे लक्षात येईल. सीमा यांच्या अभिनयाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहजता. त्यांनी विविधांगी भूमिका केल्या नसल्या तरी वाट्याला आलेल्या भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनय, सौंदर्याने, शालीनतेने अनोखे रंग भरले. निसर्गतः लाभलेला सोज्वळ, लाघवी चेहरा आणि अंत:करणात, वर्तणुकीत असणारी तितकीच सोज्वळता, लाजरेपणा यामुळे त्यांच्या अभिनयाने एक वेगळीच छाप रसिकांच्या मनात उमटवली.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने सिनेसृष्टीतले एक चिरतरुण मराठी युगुल लोप पावले आहे. दीड वर्षापूर्वी सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का सीमा देव यांना बसला होता आणि तो स्वाभाविकही होता. रमेश देव आणि सीमा देव यांनी संसाराची अनेक वर्षे व्यतीत केल्यामुळे आपला हा हक्काचा आधार गमावल्याचे शल्य त्यांना सहन झाले नाही. या विरहामुळे त्या प्रचंड खचल्या होत्या. रमेश देव यांच्यावर त्यांचे निरतिशय प्रेम होते. रमेश देवांनीही शेवटपर्यंत सीमा यांना अत्यंत मायेने जपले होते. आपल्या प्रेमकहाणीविषयी सांगताना रमेश देव नेहमीच सीमा यांचे दिलखुलासपणाने कौतुक करत असत.

सीमा देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये रमेश देवांसोबत एकत्र काम केले. ‘आलीया भोगासी’ या चित्रपटात रमेश देव नायक आणि सीमा नायिका होत्या. नायक-नायिका म्हणून केलेला या जोडीचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट या जोडीसाठी अविस्मरणीय ठरला कारण या चित्रपटातील नायकच पुढे जाऊन सीमा यांचा जीवनभरचा सहचर बनला. त्यामुळे या चित्रपटामुळे सीमा यांचे आयुष्य पालटून गेले. सरकारी कोट्यातून जागा न घेणारा रमेश देव हे मराठीतील एकमेव कलाकार होते, असे सीमा देव आवर्जून सांगत असत. रमेश देवांच्या निधनापूर्वी त्यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पुन्हा एकदा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी सीमा देव यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव हे नवतरुणीला लाजवणारे होते.

70 हून अधिक चित्रपटांमध्ये रमेश आणि सीमा यांनी एकत्र भूमिका केल्या. व्ही. अवधूत यांच्या ‘ग्यानबा तुकाराम’ या चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केले. या चित्रपटानंतर दोघांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये कामे केली. राजाभाऊ परांजपे हे सीमा देव यांचे गुरू होते. ‘सुवासिनी’ या चित्रपटासंदर्भातील एक आठवण सीमा देव नेहमी सांगत असत. या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यामुळे त्यांच्यात अबोला होता. चित्रपटातील संवाद वगळता ते दोघे एकमेकांशी चकार शब्दही बोलले नाहीत. या चित्रपटात रमेश देव त्यांच्या पतीची भूमिका साकारत होते; पण एकमेकांशी अबोला धरूनच दोघांनी हा चित्रपट पूर्ण केला. चित्रपट पाहताना त्यांच्या अभिनयातून कुठेही याची चुणूक दिसली नाही.

‘आनंद’ या चित्रपटातील रमेश आणि सीमा यांचा अभिनय मराठी आणि हिंदी सिनेरसिकांच्या अधिक स्मरणात राहणारा ठरला. सीमा देव यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. राजेश खन्ना आणि अमिताभ यांच्यासारख्या हिंदी सिनेसृष्टीतील नायकांसमोर वावरतानाही सीमा कुठेही कमी पडल्याचे दिसले नाही.

मुळात, सीमा यांच्या अभिनयाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सहजता. त्यांनी विविधांगी भूमिका केल्या नसल्या तरी वाट्याला आलेल्या भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनय, सौंदर्याने, शालीनतेने अनोखे रंग भरले. सीमा देव यांनी विवाहापूर्वी एक अट रमेश यांना घातली होती. त्यानुसार आपल्याला आईला घर घेऊन दिल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असे सांगितले होते. विशेष म्हणजे, सीमा यांनी पाच वर्षांत पैसे जमवून आईला खारमध्ये घर घेऊन दिले आणि त्यानंतरच त्या सांसारिकतेकडे वळल्या.अभिनयावर प्रेम करणार्‍या सीमा या तितक्याच कुटुंबस्नेही असल्याची ही साक्ष होती. उतारवयात पतीची देखभाल घेण्यामध्ये त्यांनी जराही कसूर ठेवली नाही. पण आपला हा हक्काचा माणूस गेला आणि त्यांच्या जगण्याच्या आशा मावळल्या. त्यांच्या निधनाने एका चारित्र्यवान, सहृदयी मराठी अभिनेत्रीला कलाविश्व मुकले आहे.

Back to top button