लवंगी मिरची : पावरफुल्ल कांदा! | पुढारी

लवंगी मिरची : पावरफुल्ल कांदा!

खरं सांग मित्रा, जीवनासाठी किंवा जीवन जगण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? म्हणजे अशा बाबी की, ज्या प्रत्येकाला हक्काने मिळाल्याच पाहिजेत?

अरे सोपे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुख्य गरजा आहेत. पृथ्वीवर माणूस अस्तित्वात आल्यापासून या तीन गोष्टींसाठी तो आयुष्यभर श्रम करत असतो.

वाटलंच मला तू असे उत्तर देशील म्हणून. तुझ्या उत्तरामध्ये एक सुधारणा सांगतो. आपल्या भारतातील माणसाला अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर अत्यंत जीवनावश्यक झालेली आणखी एक गोष्ट म्हणजे, कांदा आहे. सध्या कांद्याचा वांदा झाल्यामुळे राज्यभर सगळ्या वर्तमानपत्रांमधून कांद्याचीच चर्चा चालू आहे. चार महिने चातुर्मासात कांदा न खाणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हा एकमेव असा खाद्यपदार्थ आहे की, निवडणुकांच्या काळामध्ये कांद्याचे भाव वाढले, तर सरकारे डोलायला लागतात. पाच वर्षे केलेले विकासकाम बाजूला राहून त्यावेळेला कांद्याचे काय भाव आहेत, हे पाहून मतदान होते. म्हणजे, कांदा हा फक्त उत्पादन करणारे शेतकरी आणि खाणारे ग्राहक यांच्यासाठी महत्त्वाचा नाही, तर मजबूत सरकारच्या डोळ्यांत पाणी आणण्याची ताकद पण कांद्यात आहे.

अरे, शेवटी कांदाच आहे तो. तुझी वहिनी कांदा चिरत असते तेव्हा नुसते बाजूला उभे राहिले, तरी तो डोळ्यांतून पाणी काढतो. मला स्वतःला जर बायकोने कधी कांदा चिरायला सांगितला, तर मी हेल्मेट घालून कांदा चिरत असतो, म्हणजे डोळ्यांतून पाणी येत नाही; पण डोळ्यांतून पाणी काढणारा कांदा हा एक जीवनावश्यक बाब झाला आहे, हे नक्की. साधे कुठे हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तर आधी कांदा कापून समोर आणून ठेवतात नंतर जेवण सुरू होते. भाजीत कांदा, भज्यात कांदा, पराठ्यात कांदा, आता फक्त कांद्याचा ज्यूस यायचा बाकी आहे. दुसरे म्हणजे, जसे चायनाचे वेगळे पदार्थ आपल्या भारतात पॉप्युलर झाले तसा चायनीज कांदा आणि लसूणसुद्धा उपलब्ध झाला आहे. संपूर्ण आशिया खंडामध्ये कांदा आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे सरकारे डोलवण्याची ताकदसुद्धा कांद्यामध्ये आहे.

कांद्याचे भाव पडायला लागले की, थेट केंद्र शासनालासुद्धा त्याची दखल घ्यावी लागते म्हणजे, भाव पडले तरी सरकारला त्यामध्ये लक्ष द्यावे लागते आणि भाव चढले तरी पण सरकारला त्यात लक्ष घालावे लागते. नाही तर सरकार डगमगण्याचीसुद्धा शक्यता असते. त्यामुळे कांदा अत्यंत पावरफुल्ल आहे हे नक्की! सध्या कांद्यामुळे वांदा झाल्याचे चित्र आहे. माणसाच्या प्रमुख आहारातील हा कांदा अश्रू तर आणत आहे, तर कांद्याच्या साठेबाजीमुळे व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची कुंचबणा करत आहेत. सध्या पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे याचा गैरफायदा व्यापार्‍यांकडून नक्कीच घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सरकारने व्यापार्‍यांच्या साठेबाजीला चाप लावण्याची गरज असून, जो काही कांद्यामुळे वांदा झाला आहे, त्याचे लवकरात लवकर निराकरण करावे. कारण, भविष्यात नेहमीच व्यापारी शेतकर्‍यांना लुबाडल्याशिवाय राहणार नाही.

देशभरात सध्या कांद्याची चर्चा सुरू आहे. देशातील एकही घर असे नसेल ज्या घरात कांद्याचा वापर केला जात नसेल. त्यामुळे सर्वांनाचा कांद्याच्या दराची चर्चा आहे. कांद्याचे दर पाडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. काही शेतकरी तर कांदा रस्त्यावर फेकून देत आहेत. अशा या पॉवरफुल्ल कांद्याला चांगला दर मिळालाच पाहिजे. तरच खर्‍या अर्थाने बळीराजाला न्याय मिळेल. सर्वसामान्य जनतेलाही रास्त दरात कांदा मिळण्याची गरज आहे. तरच कांद्याच्या दराचा समतोल साधला जाईल.

Back to top button