लवंगी मिरची : इतिहासाच्या मार्गावर..! | पुढारी

लवंगी मिरची : इतिहासाच्या मार्गावर..!

होय मित्रहो, आज आपण सारे श्वास रोखून आपल्या चांद्रयानाच्या चंद्रावरील पहिल्या पाऊलखुणा उमटण्याची वाट पाहतोय. आज तमाम देशवासीयांचे लक्ष चांद्रयानामधून विक्रम लँडर कसे उतरणार, याकडे लागले आहे. त्यातच काल रशियाची चंद्रयान मोहीम फसली आणि ते यान भरकटत चंद्रावर जाऊन आदळले. यापूर्वी आपली एक मोहीम अशीच अयशस्वी झाली होती. आपले लँडर ज्या ठिकाणी उतरले तिथे खूप खड्डे होते आणि मातीच्या एका ढिगार्‍याला अडकून त्याची वाटचाल बंद पडली होती. या वेळेला पुरेपूर काळजी घेऊन आपण ही मोहीम पुन्हा राबवत आहोत. पहिल्या अपयशानंतर ‘इस्रो’मधील सर्व शास्त्रज्ञांनी अजिबात निराश न होता नव्याने नवी मोहीम आखली आणि आज ती सफल होण्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत.

चांद्रयान चंद्रापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर घिरट्या घालत आहे आणि त्याने पाठवलेल्या फोटोजमधून लँडर कुठे उतरवायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे. आपल्या देशाच्या तंत्रज्ञानामधील प्रगतीचा एक फार मोठा टप्पा आज आपण गाठत आहोत. देश प्रगती करतो तेव्हा त्याची चौफेर प्रगती आवश्यक असते. सामाजिक, आर्थिक आणि एकंदरीत सर्वच पातळींवरती प्रगती होणे आवश्यक असते, कारण तर आणि तरच त्याला विकसित देश म्हणता येईल; पण अवकाश मोहिमांचा विचार केला तर आपण आज विकसित देशांच्या रांगेत बसलेलो आहोत. आपल्या आजूबाजूला असणार्‍या आणि कारण नसताना खुन्नस करणार्‍या देशांना ही फार मोठी चपराक आहे.

आज आपले यान चंद्रावर उतरणार आहे, काही दिवसांनी चक्क आपले अंतराळवीर पण चंद्रावर जातील. अवकाशाला गवसणी घालणार्‍या आपल्या सर्व शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा. आज सर्वत्र चांद्रयानाचीच चर्चा आहे. जेव्हा चांद्रयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरेल त्यावेळेला संपूर्ण देशभर दिवाळी साजरी केली जाईल यात काही शंका नाही. प्रत्येक देशवासयाीला अभिमान वाटेल अशीच ही घटना आहे. आज तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत हा प्रगत होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे सर्व जगाने मान्य केले आहे. हे चंद्रयान भारतीय बनावटीचे असल्यामुळे त्याला खड्डे नवीन नाहीत. विशेषत: आपल्या राज्यामध्ये काही भागांमध्ये खड्डे जास्त आणि रस्ते कमी अशी परिस्थिती आहे चंद्रावर तरी वेगळे असे काय आहे? तिथे खड्डेच खड्डे आहेत. त्या खड्ड्यांमधून वाटचाल करीत आपल्याला काम करायचे आहे. भारतीय असल्यामुळे आशा भूभागावर खड्ड्यांमधून वाट काढीत लँडर चंद्रावर निश्चित सुरक्षित उतरेल आणि त्याला सोपवलेले काम पूर्ण करेल याविषयी आपल्या मनात काही शंका नाही. आता अवघे काही क्षण, अवघे काही तास उरले आहेत.

संबंधित बातम्या

आपल्याला आपले लँडर चंद्रावर उतरताना पाहण्याची पण संधी मिळणार आहे. याचे कारण असे की या घटनेचे लाईव्ह टेलिकास्ट पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. चंद्रावर आपले यान जाते आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट आपण आपल्या घरात बसून पाहतो, हा सुद्धा आपल्या देशाने साधलेल्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. आपण भारत देशाचे नागरिक या निमित्ताने ‘इस्रो’ला शुभेच्छा देऊयात आणि हा इतिहास घडताना पाहुयात. आपल्या देशाची मान उंचावणार्‍या या शास्त्रज्ञांना खरोखर वंदन केले पाहिजे. आता चांद्रयानाने या पुढील वाटचाल यशस्वी करावी, अशी तमाम भारत वासीयांची इच्छा आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी घेतलेले कष्ट फळास येईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आतापर्यंत ‘इस्रो’ने अनेक मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आहेत.

Back to top button