संरक्षण क्षेत्रातील झेप | पुढारी

संरक्षण क्षेत्रातील झेप

नीलेश गायकवाड, कॅप्टन

गेल्या एक दशकांत भारताने संरक्षण क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गेल्या नऊ वर्षांत संरक्षण निर्यातीत 23 टक्के वाढ झाली आहे. सध्या शंभराहून अधिक कंपन्यांच्या माध्यमातून देशात संरक्षण क्षेत्रातील साहित्याची, उपकरणांची निर्मिती केली जात आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणात्मक पातळीवर संरक्षण साहित्याचे उत्पादन केले जात आहे.

संरक्षण क्षेत्रात केवळ आत्मनिर्भरता वाढत नसून दुसर्‍या देशांनादेखील निर्यात केली जात आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने 16 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण उपकरणांची निर्यात केली. यात सैन्य हार्डवेअर म्हणजेच स्फोटके, शस्त्रे याचा समावेश होता. ही निर्यात मागील वर्षापेक्षा तीन हजार कोटी रुपयांनी अधिक आहे आणि गेल्या नऊ वर्षांत सर्वाधिक आणि 2014 पासून 23 पटीने अधिक आहे. एकेकाळी भारत संरक्षण क्षेत्रातील मोठा आयातदार देश होता.

शस्त्रे, दारुगोळा, हेलिकॉप्टरबरोबरच त्यांचे सुटे भागही आयात करावे लागत होते; मात्र कालांतराने देशांतर्गत संरक्षण साहित्याच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले गेले आणि अगदी कमी काळात भारताने आपली प्रतिमा बदलली. आज आघाडीचा निर्यातदार देश म्हणून जगात ओळख प्रस्थापित झाली आहे. भारत जगातील आठव्या क्रमाकांचा निर्यातदार देश बनला आहे. भारताकडून 85 देशांना संरक्षण साहित्याची निर्यात केली जात आहे. भारताच्या संरक्षण उत्पादनाला कमी काळात विशेष महत्त्व आले आहे.

आत्मनिर्भर भारत धोरणानुसार स्वदेशी रचना, विकास आणि उत्पादनास प्रोत्साहन देण्यात आले. त्याचवेळी एक ना एक दिवस भारतीय सैनिक हा संपूर्णपणे स्वदेशी संरक्षण उपकरण, शस्त्र बाळगेल अशी आशा व्यक्त केली आहे. परदेशातील अवलंबित्व 2018-19 या काळात एकूण खर्चाच्या 46 टक्के होते. आता 2022 मध्ये हा आकडा 36.7 टक्के झाला आहे. सध्याच्या काळात भारत डॉर्नियर-228, 155 मि.मी. अ‍ॅडव्हान्स्ड टोएड आर्टिलरी गन्स, एटीएजी, ब्राह्मोस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा, रडार, सिम्युलेटर, माईन प्रोटेक्टेड व्हेईकल, आर्मर्ड व्हेईकल, पिनाका रॉकेट, लाँचर, स्फोटक साहित्य, थर्मल इमेजर्स, बॉडी आर्मर्स, सिस्टीम याशिवाय लाईन रिप्लेसेबेल युनिटस् आदींची निर्यात करत आहे. आयात निर्यातच नाही, तर याकाळात आपली संरक्षण प्रणालीदेखील सक्षम झाली आहे.

फ्रान्समधून 32 राफेल विमाने खरेदी करून दोन स्क्वँड्रनची उभारणी केली आहे. लढाऊ हेलिकॉप्टर चिनूक आणि अपाचे याचा समावेश झाल्याने संरक्षण सिद्धता आणखीच वाढली आहे. आकाशातून जमिनीवर मारा करणारे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र हे हवाई दलाच्या ताफ्यात सामील होणे आणि आस्ट्रा म्हणजेच रडारच्या माध्यमातून हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांना नवीन एसयू-20 एमकेआय स्क्वाड्रनमध्ये सामील करण्याचा निर्णय हे हिंद महासागर क्षेत्रातील भारताची सामरिक क्षमता सिद्ध करणारे आहे. आपण कोणापेक्षा कमी नाही, हे दाखवून दिले आहे. पश्चिम किनारपट्टीवर करंज आणि वेला पाणबुड्या तैनात केल्या आहेत. तसेच भारताच्या दोन युद्धनौका सुरत आणि उदयगिरीचीही नेमणूक केली आहे.

कोलकता येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीचे अनावरण केले. नीलगिरी श्रेणीतील ही एक स्टेल्थ गाइडेड क्षेपणास्त्र युद्धनौका आहे. यात ब—ाह्मोस क्षेपणास्त्रही तैनात आहे. या युद्धनौकेवर दोन हेलिकॉप्टरचा ताफा आहे. या जहाजाच्या माध्यमातून हे हेलिकॉप्टर शत्रूचे जहाज किंवा हेलिकॉप्टरवर हल्ला करत नेस्तनाबूत करू शकतात. याशिवाय विंध्यगिरी हे बराक-8 क्षेपणास्त्र सोडण्यास सक्षम आहे. यात स्टेल्थ फिचर्स, अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीम, आधुनिक रडार यंत्रणा आणि पाणुबुडीविरोधी यंत्रणा सुसज्ज आहे. एकंदरीत संरक्षण क्षेत्रात आपण कमकुवत नाहीत, हे जगाला कळून चुकले आहे.
– नीलेश गायकवाड, कॅप्टन

Back to top button