लवंगी मिरची : पर्यटनाची झुंबड! | पुढारी

लवंगी मिरची : पर्यटनाची झुंबड!

अरे काय हे? जिकडे पाहावे तिकडे नुसती गर्दीच गर्दी. धबधब्यात पाणी वाहत असताना दिसले की, गर्दीची पावले तिकडे वळलीच म्हणून समजा. डोंगरांवर गर्दी, धरणांवर गर्दी, किल्ल्यांवर गर्दी,भात लावणीच्या शेतामध्ये पण गर्दी. शेतकरी बिचारे भात लावणीच्या कामांमध्ये व्यस्त असतात. बाजूच्या रस्त्याने फिरायला जाणारी चार-पाच पर्यटकांची टोळी येते आणि भात लावणीचे नाटक करताना फोटो काढून घेते. काही मिनिटांत हे भात लावणी करतानाचे तरुण- तरुणींचे फोटो इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर भिरकावले जातात. पाठोपाठ त्यावर वॉव, ऑसम अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. लगेच लोकेशन प्लीज असे प्रश्न येतात, लगेच त्याला उत्तर दिले जाते मुळशी एरिया. ज्यांनी हे उत्तर पाहिले ते दुसर्‍याच दिवशी मुळशीच्या दिशेने धाव घेतात. काही काही भागात तर मला असे वाटते की शेतकर्‍यांनी स्वतः भात लावण्याचे काम न करता अशा रिल्स बनविणार्‍या आणि सोशल मीडियाचा नाद असलेल्या तरुण-तरुणींना बोलावून त्यांच्याकडून भात लावण्याचे काम करून घ्यावे. एक तर त्यांचे स्वतःचे श्रम वाचतील आणि असे काम करण्यास इच्छुक असणार्‍या लोकांकडून तासाला शंभर रुपये घ्यावेत म्हणजे भात लावणी पण होईल आणि उत्पन्न पण मिळवता येईल.

वीकेंड म्हणजे नियमित साजरा करायचा एक उत्सवच होऊन बसला आहे. जे वीकेंड साजरा करतात ते आठवडाभर अगदी अंग मोडून कष्ट करत असतीलच असे काही नाही. आठवडाभर झोपा काढणारे लोक सुद्धा वीकेंडला घराबाहेर पडलेले असतात. कोण म्हणतो भारताचा हॅपिनेस इंडेक्स फार कमी आहे? पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी जाऊन पाहा म्हणावं. भारताचा हॅपिनेस इंडेक्स जगातील पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये असणार यात काही शंका नाही. धरण सोडत नाहीत, अभयारण्य सोडत नाहीत ट्रेकिंगसाठी असणारे डोंगरे सोडत नाहीत, भल्या मोठ्या डोंगराच्या सर्वात उंच सुळक्यावर जाऊन सेल्फी काढण्याचा नाद सोडत नाहीत. ‘सेल्फी’ या विषयात भारत जगात प्रथम क्रमांकावर असेल.

पर्यटनाला खरा बहार येतो तो, पहिला पाऊस पडून गेल्यानंतर. एक तर निसर्ग सगळीकडे हिरवागार असतो आणि मुख्य म्हणजे पाणी सर्वत्र वाहत असते.अशावेळी पर्यटकांच्या टोळ्या घराबाहेर पडून अशा स्पॉटवर झुंबड करतात. यात सर्व वयोगटाचे स्त्री- पुरुष असतात. अगदी ज्येष्ठ नागरिक आणि भगिनी सुद्धा पावसाळी सहल काढून फिरत असतात. तरुणांचे तर विचारायलाच नको. भरधाव वेगाने धावणार्‍या दुचाकीवर तरुण-तरुणी बसलेले असतात. हातात मोबाईलचा कॅमेरा घेऊन धावत्या बाईकवर रील काढण्याची स्पर्धा सुरू असते. अरे काढा ना रील; पण काढताना कमीत कमी मोटारसायकल घसरणार नाही किंवा दुसर्‍याला धडक होणार नाही किंवा कोणता अपघात होणार नाही याची तरी किमान काळजी घ्या. बेदरकारपणे वाहने चालवून हे लोक स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतात.

सर्वत्र निसर्ग असा बहरलेला असताना, त्यात पुन्हा श्रावणाचा पवित्र महिना सुरू होत आहे. महत्त्वाच्या अशा सणांना इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाहतूक वाढलेली असते. बहिणीकडून ओवाळून घेण्यासाठी भाऊराया दुचाकीवर आपल्या गावावरून तिच्या गावाला जातात. उत्साह मानला पाहिजे, पण त्याच वेळेला काळजी पण घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे काय असेल तर स्वतःची सुरक्षा. सुरक्षेचा विचार न करता वेगाने वाहन चालवणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहे. बहिणीने सुद्धा भाऊरायाला येत असशील तर जरूर ये; पण हळू ये, अशी विनंती केली पाहिजे. पर्यटनाचा उत्साह अत्यंत वाखाणण्यासारखा असला तरी पर्यटन स्थळांवर होणारी झुंबड ही काळजी करायला लावणारी आहे. पर्यटनाचा आनंद घ्या, सेल्फी पण काढा; पण ती सेल्फी पाहण्यासाठी आधी जीव सुरक्षित ठेवा.

Back to top button