चांद्रयानाचे शिवधनुष्य!

चांद्रयान
चांद्रयान

एकेकाळी भारताकडे तुच्छ नजरेने पाहिले जात होते. भिकार्‍यांचा, गरिबांचा देश म्हणून हिणवले जात होते. कधीकाळी सायकल आणि बैलगाडीच्या मदतीने रॉकेट हे एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी नेले जात होते, आता त्याच देशाने चंद्रावर आणि अंतरिक्ष जगतात हुकूमत गाजविण्याचे शिवधनुष्य पेलले आहे.

अंतराळाच्या दुनियेत भारत पुन्हा इतिहास घडविण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'च्या चांद्रयान-3 ने यशस्वीरीत्या उड्डाण केल्यानंतर आता चंद्राला स्पर्श करण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

चांद्रयान हे सध्या चंद्राच्या 174 किलोमीटर ते 1437 किलोमीटरच्या कक्षेत फिरत आहे. म्हणजेच चांद्रयान अंडाकृती कक्षेत असून त्यापासून चंद्रापासूनचे त्याचे किमान अंतर 174 किलोमीटर, तर कमाल अंतर 1437 किलोमीटर आहे. चांद्रयान 14 ऑगस्टला 11.30 ते 12.30 वाजता पुन्हा आपल्या कक्षेत बदल करेल. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता चांद्रयानने आपली कक्षा कमी केली होती. तेव्हा ते चंद्राच्या 170 किलोमीटर ते 4313 किलोमीटरच्या कक्षेत दाखल झाले होते. 22 दिवसांच्या प्रवासानंतर 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.15 वाजता चंद्राच्या दुसर्‍या कक्षेत पोहोचला होता, तेव्हा तो चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात ओढला जाईल, या हेतूने त्याचा वेग कमी केला. वेग कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी चांद्रयानाचा फेस फिरवला. चांद्रयानाने जेव्हा चंद्राच्या या कक्षेत प्रवेश केला तेव्हा त्याच्या ऑनबोर्ड कॅमेर्‍याने चंद्राचे फोटो काढले. 'इस्रो'ने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 हा यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत स्थापन झाला आहे. 23 ऑगस्टला लँडिंग करण्यापूर्वी चांद्रयान हा एकूण चार वेळेस कक्षा कमी करेल. त्याने रविवारीच कक्षेत घट केलेली आहे.

चंद्रावर पाऊल टाकण्यात येणारे भारताचे हे तिसरे मोठे अभियान आहे. त्यास 642 टन वजनी, 43.5 मीटर उंचीच्या एलव्हीएम 3-एम 4 रॉकेटने सोडण्यात आले. हे देशातील सर्वात शक्तिशाली बाहुबली रॉकेट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग होत असेल, तर चंद्राच्या दक्षिण धु—वावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. वास्तविक, भारतासाठी हा एक ऐतिहासिक काळ आहे. चांद्रयान यशस्वीरीत्या स्थापित झाल्यानंतर भारताची जगभरात वेगळी ओळख निर्माण होईल आणि कालांतराने चंद्र आपल्याला पृथ्वीच्या क्रमबद्ध विकासासाठी आणि सौरमंडळाच्या पर्यावरणाची अविश्वसनीय माहिती देत राहील. वास्तविक, आजघडीला अंतराळात सर्वंकष मॉडेल सक्रिय आहेत; मात्र चंद्राच्या उत्पत्तीसंदर्भात अधिक सखोल माहिती मिळणे गरजेचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागाची व्यापक माहिती मिळवून त्याचा अभ्यास करण्यास मदत मिळणार आहे.

चंद्राची निर्मिती अणि विकासाबाबतची महत्त्वाची माहिती या अभियानाच्या मदतीने गोळा करता येईल. तेथे पाणी असल्याचे पुरावे चांद्रयान-1 ने शोधले होते, तर चांद्रयान-2 ने पृष्ठभागाची आणि जागेची मॅपिंगही केली होती. आताच्या चांद्रयानने चंद्रावरच्या खनिजाचा शोध लागू शकतो. चांद्रयान-3 चे लँडर ज्या ठिकाणी उतरणार आहे, तेथील तो लगेच माहिती गोळा करेल. चंद्रावर भूकंप होतात की नाही, याचाही तपास घेतला जाईल.

चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून तेथे अद्याप कोणताही देश पोहोचलेला नाही. त्याचा उद्देश चंद्राची माहिती मिळवणे, हाच आहे. या संशोधनातून मानवजातीला फायदा होणार आहे. चाचणी आणि अनुभवाच्या आधारावरच भविष्यातील चांद्रयान अभियानाचे नियोजन केले जाईल आणि त्यानुसार बदल केला जाईल. अनुभवाच्या आधारे नव्या तंत्रज्ञानाचा विकास केला जाईल. चांद्रयान जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल आणि संपूर्ण जगात भारतीय तंत्रज्ञानाचा डंका वाजेल, अशा दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news