दिल्लीसंदर्भातले विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले, तर केजरीवाल यांच्यासाठी तो मोठा धक्का ठरेल. काँग्रेसने विधेयकाला विरोध करावा, यासाठी केजरीवाल यांनी आकाशपाताळ एक केले होते. बराच काळ झुलवत ठेवल्यानंतर काँग्रेसने सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. भविष्यात केजरीवाल विरोधी आघाडीसोबत राहतील काय, याबद्दल खुद्द काँग्रेसच्या मनात साशंकता आहे. कारण, दिल्ली आणि पंजाबमधील काँग्रेसची सद्दी 'आप' पक्षानेच मोडून काढलेली आहे. अन्य राज्यांतही 'आप' पक्षाचा वेगाने शिरकाव होत असल्याने केजरीवाल यांना सोबत घेतले जाऊ नये, असे मानणारा एक मोठा वर्ग काँग्रेसमध्ये आहे. दुसरीकडे कोणाच्याही मदतीशिवाय वेगाने विस्तारत असलेल्या 'आप'ला आपण आघाडीत राहिलो, तर फारसा विस्तार करता येणार नाही, ही भीती आहे. यामुळे भविष्यात 'आप' आघाडीत राहणार काय, याकडे सर्वांचे लक्ष आहे.