इम्रान खान यांची कोंडी | पुढारी

इम्रान खान यांची कोंडी

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अनेक पातळ्यांवर कोंडी करण्याचे तेथील विविध यंत्रणांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इम्रान यांच्या बाजूने असलेला जनमताचा रेटा आणि न्यायव्यवस्थेचे सुरक्षा कवच यामुळे आतापर्यंत इम्रान प्रत्येक संकटातून सुटण्यात यशस्वी झाले असले, तरी नजीकच्या काळात ते सापळ्यात अडकणारच नाहीत, असे नाही. पंतप्रधानपदावर असताना मिळालेल्या भेटवस्तू खजिन्यात जमा न करता त्यांची परस्पर विक्री करून ती रक्कम दडवल्याच्या आरोपावरून इस्लामाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांची ठोठावलेली शिक्षा हे इम्रान यांच्यापुढील नवे संकट आहे. पाकिस्तानमधील न्यायव्यवस्था अनेकदा निष्पक्षपाती आणि कठोर वाटत असली, तरी तिची अवस्था तिथल्या इतर व्यवस्थांहून फार वेगळी नाही. लष्कर, सरकार, निवडणूक आयोगासारखी घटनात्मक संस्था अशा अनेक यंत्रणा विरोधात गेल्या असतानाही इम्रान खान यांचा संघर्ष सुरू आहे आणि तुरुंगात गेल्यानंतरही त्यांनी आपल्या समर्थकांना संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

इस्लामाबादच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली याचा अर्थ त्यांचे सगळे मार्ग बंद झाले असा होत नाही. खरे तर, शिक्षा सुनावली तेव्हा ते स्वतः किंवा त्यांचे मुख्य वकील न्यायालयात हजर असते, तर जामिनासाठी अर्ज करू शकले असते; परंतु दोघेही अनुपस्थित असल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत. न्यायालयाने तातडीने अटकेचे आदेश दिले असल्यामुळे त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयाला इम्रान यांच्या वतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकेल. खालच्या न्यायालयाच्या निकालाला उच्च न्यायालय स्थगिती देऊ शकते किंवा पुढे त्यांना सर्वोच्च न्यायालयातही जावे लागू शकेल. एकूण आगामी निवडणुकांपर्यंत इम्रान यांना सातत्याने संघर्षाला सामोरे जावे लागेल. कारण, त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यासाठी सगळा खेळ सुरू आहे. असे असले तरी त्यांच्यावरील आरोपांचे समर्थन करता येणार नाही. या अटकेमागे असलेले नेमके कारण पाहिले, तर सत्तेत असतानाचे मोह त्यांना नडले. पंतप्रधानपदावर असताना त्यांना अन्य देशांच्या प्रमुखांकडून ज्या भेटवस्तू मिळाल्या, त्यांची त्यांनी विक्री केली आणि त्यातून मिळालेली रक्कम उत्पन्नात दाखवली नाही, असा त्यांच्यावरील मुख्य आरोप आहे. त्यांना तुरुंगात किती दिवस राहावे लागते किंवा किती दिवस तुरुंगात राहणे त्यांना राजकीयद़ृष्ट्या फायदेशीर वाटते, यावरही भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करीत आहेत. त्यांच्या संघर्षाला लोकांचाही मोठा पाठिंबा मिळत असला, तरी सध्याचे प्रकरण त्यांच्या या लढाईशी विसंगत आहे. अनेक संकटांनी ग्रासलेल्या पाकिस्तानातील सामान्य माणसांसाठी संघर्ष करण्याची गरज असताना विरोधी पक्षाचा प्रमुख नेता मोहाच्या सापळ्यात अडकून तुरुंगात गेला. हे शोभादायक नाही. पंतप्रधान, राष्ट्रपतींसह वरिष्ठ पदावरील व्यक्तींना परदेश दौर्‍यामध्ये मिळणार्‍या भेटवस्तूंची नोंद ठेवणार्‍या खजिन्याचे हे प्रकरण आहे. या खजिन्यात ठेवलेल्या वस्तूंना स्मृतिचिन्हांचा दर्जा असतो आणि कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय तेथील वस्तूंची विक्री करता येत नाहीत. भेटवस्तूंची किंमत तीस हजार रुपयांहून कमी असेल, तर संबंधित अधिकारपदावरील व्यक्ती अशी वस्तू स्वतःकडे ठेवू शकते. परंतु, 30 हजारांहून अधिक किमतीच्या भेटवस्तूच्या किमतीच्या निम्मी रक्कम भरून ती वस्तू खरेदी केली जाऊ शकते. 2020 पूर्वी फक्त वीस टक्के रक्कम भरून वस्तू खरेदी करता येत होत्या. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने महागडी घड्याळे, सोन्या-चांदीचे, हिर्‍यांचे दागिने, सजावटीच्या महागड्या वस्तू, हिरेजडित पेन, क्रॉकरी, गालिचे आदींचा समावेश असतो. इम्रान यांनी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती लपवल्याचा आरोप आहे. 1 ऑगस्ट 2018 पासून 31 डिसेंबर 2021 पर्यंत इम्रान आणि त्यांच्या पत्नीला 58 भेटवस्तू मिळाल्या. या भेटवस्तूंमध्ये फुलदाण्या, सजावटीचे साहित्य, गालिचे, पर्स, अत्तरे, फ्रेम, पेन होल्डर, घड्याळे, पेन, अंगठ्या आणि बांगड्या आदींचा समावेश होता. भेटवस्तूंमध्ये 30 हजारांहून अधिक किमतीच्या फक्त चौदा वस्तू होत्या आणि प्रक्रियेनुसार त्यांचे पैसे भरून खजिन्यातून त्या विकत घेतल्याचा इम्रान यांचा दावा होता. खरेदी केलेल्या वस्तूंची विक्री केल्याचेही त्यांनी मान्य केले. खजिन्यात केवळ वीस टक्के आणि काहींची 50 टक्के किंमत भरून खरेदी केलेल्या वस्तू त्यांनी महागड्या किमतीला विकल्याचाही आरोप होता. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार पंतप्रधान बनल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच इम्रान यांनी खजिन्यातून दोन कोटींहून अधिक रक्कम जमा करून भेटवस्तूंची खरेदी केली होती. त्यात 85 लाख रुपये किमतीचे एक घड्याळ, 60 लाख रुपये किमतीचे कफलिंग, 87 लाखांचे पेन आणि अंगठी आदी वस्तूंचा समावेश होता. अशा रितीने त्यांनी 38 लाखांचे किमती घड्याळ साडेसात लाखांना आणि साडेसात लाखांचे घड्याळ अडीच लाखांना खरेदी केले होते. आणखीही काही महागड्या वस्तू त्यांनी मामूली किमतीत विकत घेतल्या होत्या. इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बेबी यांना सौदी अरबमध्ये मिळालेल्या 85 लाखांच्या घड्याळाची विक्री करण्यात आली. त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली गेली नव्हती. अर्थात, भेट मिळालेल्या महागड्या वस्तूंच्या मोहात पडलेले इम्रान हे काही पहिले पंतप्रधान नाहीत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ, युसूफ रजा गिलानी आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आजही अशा स्वरूपाच्या खटल्याला सामोरे जात आहेत. इम्रान यांच्या अटकेनंतरची कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवरची लढाई रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत, ती त्यामागील पाकिस्तानी राजकारणामुळे!

Back to top button