फेसबुक : झुकेरबर्गासी पत्र | पुढारी

फेसबुक : झुकेरबर्गासी पत्र

प्रिय झुकूदादा,
स.न.वि.वि.
कसा आहेस? तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्यासाठी आमचे दिवाळीचे पदार्थ लवकरच फेसबुकवर टाकणार आहे. कसे वाटले ते खाणाखुणा न करता कमेंटमध्ये लिहावेस एवढीच अपेक्षा आहे. बाकी आम्ही दुसरं काय करू शकतो? तुझ्यामुळे आम्हाला अनेक आभासी मित्र आणि मैत्रिणी भेटल्या. कुंडीतल्या रोपट्याला पालवी फुटली इथंपासून ते सहजच म्हणत स्वतःचा सेल्फी टाकण्यापर्यंतचे सर्व उद्योग आम्ही करत असतो. त्यामुळे आम्ही फेसबुकाळलो आहोत अशीही टीका आमच्यावर केली जाते. वाढदिवसाला शुभेच्छा देण्याच्या आनंददायी कामापासून ते चावडीवर एखादा घावल्यानंतर त्याची जिरवण्यापर्यंत सगळे उद्योग करताना फारच मजा येते. तू आणि तुझं फेसबुक आमच्या जीवनाशी इतकं एकरूप झाले आहात की, सकाळी उठल्यानंतर आरशात स्वतःचा फेस पाहण्यापेक्षाही आम्ही फेसबुक पाहण्याला पहिलं प्राधान्य देतो.

झुकूदादा, आमचे बरेच मित्र फेसबुकवर अक्षरशः पडिक असतात. पूर्वी काम धंदा नसलेले लोक फेसबुकवर जास्त असायचे. आता लोक आपले काम आणि धंदा करता करता फेसबुकवर असतात. तुला भाबडा वाटेल; पण एक प्रश्न विचारू का? तुझा किती वेळ फेसबुकवर जातो. फेसबुकच्या नादी लागलेले आमच्यासारखे लोक पाहून तुला काय वाटतं? तुझ्या मनात कोणते विचार येतात? यांना कसं नादाला लावलं आणि येडं बनवलं असा विचार करून तुला मनातल्या मनात हसायला येत असेल ना! तुझी बायको तुझी फेसबुक फ्रेंड आहे का? आमच्या फेसबुकवरील आभासी मैत्रिणीप्रमाणे तीही घरात केलेल्या पदार्थाचे फोटो फेसबुकवर टाकते का रे? तू तिच्या पोस्टवर कोणत्या कमेंट्स टाकतोस ते एकदा तरी सांग ना!

झुकूदादा, तू आता फेसबुकचे नाव बदलणार आहेस असे आम्ही ऐकत आहोत. तू फेसबुकचा चेहरा मोहराही बदलणार असल्याचे ऐकिवात आले आहे. हे काय रे नवीनच? म्हणजे तू आता आम्हाला आणखी फेसबुकच्या नादी लागायला भाग पाडणार! काहींना तर पार वेडं करून टाकणार! अगोदरच आम्हा भारतीय मंडळींना भरपूर वेळ. तो कसा घालवायचा? हा प्रश्न कधीच नसायचा. कारण, गावोगाव चावड्या असायच्या.

संबंधित बातम्या

तू त्या चावड्याच बंद करून टाकल्यास आणि आम्हाला या भलत्याच आभासी चावडीवर आणलंस. आता तू मेटावर्सचं खूळ तुझ्या मनात घेऊन आमचा आणखी वेळ खाणार असं दिसतंय. अगोदरच आमचे कितीतरी हावर्स सध्या वाया जात असल्यामुळे जीव मेटाकुटीला आलेला आहे, त्यात तुझं हे नवं मेटावर्स म्हणजे आमची पुरतीच वाट लागणार. आता या मेटावर्सच्या माध्यमातून तू स्पर्श आणि सुगंधाचा आनंद आम्हाला देणार आहेस.

झुकूदादा, असल्या भन्नाट कल्पना तुझ्या मनात कशा येतात रे? स्पर्श आणि सुगंध या दोनच गोष्टी जिवंत होत्या. त्यासुद्धा आता तू आभासी करून टाकायला निघाला आहेस. असल्या नसत्या उद्योगाबद्दल तुझी आई तुला कधीच रागावत नाही का? ते जाऊ दे आता, मेटावर्सवर भेटूच.

तुझाच
तुझा खरा फेस पाहण्यास उत्सुक.                                                                                                                                          – झटका

Back to top button