Lok Sabha Election 2024 | भाजपसमोर जागा वाटपाचे आव्हान!

Lok Sabha Election 2024 | भाजपसमोर जागा वाटपाचे आव्हान!
देशभरात आता 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनी 'इंडिया'ची स्थापना करून याचा बिगुल वाजवला, तर सदैव निवडणुकांच्या मूडमध्ये राहून काम करणार्‍या भारतीय जनता पक्षाने 38 पक्षांना सोबत घेत एनडीए अधिक भक्कम असल्याचे दाखवून 'इंडिया'ला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. ( Lok Sabha Election 2024)
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांची नजर ही प्राधान्याने 80 जागा असणार्‍या उत्तर प्रदेशवर असते. दिल्लीतील सत्तेचा महामार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या सत्तेमध्ये या राज्यातील विजयाचा मोठा वाटा होता, हे आपण पाहिले आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आपला विस्तार वाढवण्यासाठी जोरकसपणाने प्रयत्न करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची रणनीती म्हणून विविध छोट्या राजकीय पक्षांना आपल्यासोबत घेत आहे; पण आघाडीनंतर जागावाटपाच्या बाबतीत आपल्या मित्रपक्षांचे समाधान कसे करायचे, ही भाजप नेतृत्वापुढील समस्या बनणार आहे. याचे कारण, हे मित्रपक्ष लोकसभेच्या जागांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त दावे करत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, भाजपचा जुना मित्रपक्ष असणारा अपना दल सध्या लोकसभेसाठी पाच जागांवर दावा करत आहे, तर निषाद पक्षाचा दावा त्याहून मोठा आहे. तेही चार-पाच जागांवर दावा ठोकत असल्याचे दिसते.
दुसरीकडे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभर यांनाही लोकसभेच्या जागांबाबत आशा आहेत. ओमप्रकाश राजभर यांचे समाधान करण्यासाठी भाजप त्यांना योगी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देऊ शकते, तर त्यांच्या मुलाला लोकसभेचे तिकीट मिळू शकते. तसेच त्यांना लोकसभेच्या दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपसोबत युती करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले निषाद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मत्स्य व्यवसायमंत्री डॉ. संजय निषाद यांनी आपला पक्ष देशभरात लोकसभेच्या 37 जागांवर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे वक्तव्य नुकतेच केले आहे. संजय निषाद स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा दावा करत आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, त्या सर्व जागा आम्हाला द्या. आम्ही त्या जिंकून दाखवू, अशी मागणी त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. संजय निषाद यांच्या मते, उत्तर प्रदेश व्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही निषाद पक्षाचा विस्तार होत असून त्यामुळे पक्षाला बळकटी मिळत आहे. त्यामुळे भविष्यात पक्ष इतर राज्यांतही निवडणूक लढवणार आहे.  छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या दौर्‍यावर असताना त्यांनी पक्ष विस्तारासंदर्भात निषाद पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
दुसरीकडे, अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनी भाजप नेतृत्वासमोर किमान पाच जागांवर दावा मांडला आहे. अनुप्रिया या स्वतः मिर्झापूरच्या खासदार आहेत. याशिवाय प्रतापगड, आंबेडकरनगर, फतेहपूर आणि जालौन जागांचीही मागणी करण्यात आली आहे. 6 आणि 8 आमदार असलेल्या अन्य मित्रपक्षांना दोन ते तीन जागा देण्याची चर्चा असताना 13 आमदार असलेल्या अपना दलला किमान पाच जागा मिळाव्यात, असे पक्षाचे मत आहे. अपना दलही यावेळी सोनभद्रची जागा बदलू इच्छित आहे.
2019 मध्ये ही जागा अपना दलच्या कोट्यात देण्यात आली होती आणि त्यावर पकोरी लाल कोल हे खासदार आहेत. जागाबदल केल्यास कोल निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर होतील. पक्ष नेतृत्वाला सोनभद्रच्या जागी बुंदेलखंडमधील कुर्मी बहुल जागा घ्यायची आहे. तसेच पक्षाची पहिली पसंती जालौन आहे. याशिवाय प्रतापगडवरही पक्षाचा दावा आहे. 2014 मध्ये ही जागा अपना दलकडेच होती; परंतु 2019 मध्ये ही जागा भाजपने परत घेतली आणि या जागेवर अपना दलचे आमदार संगमलाल गुप्ता यांनी निवडणूक लढवली होती. आता यावेळी या जागेवर पुन्हा दावा करण्यात येत आहे. अनुप्रिया यांनी भाजप नेत्यांना विनंती केली आहे की, यावेळी लोकसभा निवडणुकीतील जागा निश्चित करताना त्यांच्या पक्षाच्या आमदारांचे संख्याबळही लक्षात घेतले पाहिजे. यावरुन त्यांना इतर मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा हव्या आहेत, असे स्पष्ट होते. भाजपनेही त्यांच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे; मात्र एकंदरीत सहकारी घटक पक्षांच्या वाढत्या मागण्या पाहता आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. ( Lok Sabha Election 2024)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news