लवंगी मिरची : गट आणि तट | पुढारी

लवंगी मिरची : गट आणि तट

महाराष्ट्राचे राजकारण किती अजब आहे पाहा? डझनावरील पक्ष, चार-पाच आघाड्या, दहा-बारा युत्या आणि या प्रत्येकाची विभागणी विविध गटांमध्ये झालेली आहे. म्हणजे, हेच बघ ना मित्रा, की घड्याळवाला पक्ष फुटला म्हणजे, दोन गट तयार झाले. एक गट थोरल्या साहेबांबरोबर राहिला आणि एक मोठा गट दादांच्या बरोबर बाहेर पडला. आज बातमी वाचण्यात आली की थोरल्या साहेबांच्या बरोबर जो गट राहिला आहे, त्याच्यातही दोन गट पडले आहेत म्हणे. एका गटाचे म्हणणे की दादांच्या बरोबर जायला पाहिजे आणि दुसर्‍या गटाचे म्हणणे की साहेबांच्या बरोबर राहायला पाहिजे. त्यामुळे जनतेच्या द़ृष्टीने पाहिले, तर पक्षांचे राजकारण संपून गटातटांचे राजकारण सुरू झाले आहे, असे वाटायला लागले आहे.

तू म्हणतोस ते शंभर टक्के बरोबर आहे. जे आमदार धाडसाने निर्णय घेऊ शकत नाहीत ते कधी इकडे दिसतात, तर कधी तिकडे दिसतात. दोन्ही गट एकमेकांना झुलवत असतात. शिवाय, त्याच वेळेला काही बोलघेवडे नेते अमूक तमूक मुख्यमंत्री होणार म्हणून अफवा सोडून देतात. मी काय म्हणतो, आधीच त्या पदावर एक व्यक्ती भक्कमपणे बसलेला असताना पुन्हा कोणीतरी भावी मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍याच कुणाच्या नावे जयघोष करतो. अरे किमान विद्यमान मुख्यमंत्री यांच्या मनाचा तरी विचार करा. सदरहू मुख्यमंत्री अत्यंत कष्टाळू असून, दिवस-रात्र जनतेच्या सेवेत रुजू आहेत.

हे बघ मित्रा, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि तात्विक भूमिकेचा संबंध केव्हाच संपलेला आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वविरोधी,पुरोगामी आणि प्रतिगामी, जुने आणि नवे असे सर्व प्रकारचा विरोधाभास असणारे लोक एकत्र आले आहेत. मला असे वाटते की, त्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकच मोठी सर्वसमावेशक आघाडी करावी. त्याला ससमा आघाडी असे नाव द्यावे आणि त्यामध्ये प्रत्येक पक्षाला, प्रत्येक गटाला, अगदी फुटीर गटांना आणि शिल्लक राहिलेल्या गटांनाही प्रतिनिधीत्व देऊन राज्याचा गाडा हकावा; पण तसे होताना दिसत नाही.
त्याची बरीच कारणे आहेत. आजच एका कमळवाल्या नेत्याने सांगितले की, आमची बस भरली आहे. कृपया आता कोणी येऊ नका. याचे कारण म्हणजे, येणारा प्रत्येक जण काही ना काही तरी अपेक्षा घेऊन येतो. अगदी प्रत्येक अपक्षालासुद्धा काही ना काहीतरी करून आपल्याला मंत्रिपद मिळावे असे वाटत असते. जनतेची सेवा करण्याची आस आहे, दुसरे काही नाही. खरंतर महाराष्ट्रातील जनतेच्या भाग्याचा हेवा इतर राज्यांतील जनतेला वाटावा, अशी परिस्थिती आहे. जनतेची सेवा करायला मिळावी म्हणून आपल्या पक्षाची विचारसरणी, एवढेच काय आपल्या नेत्याला गुंडाळून ठेवून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे रहदारी सतत सुरू आहे. हे सर्व जनतेची सेवा करण्यासाठी चालले आहे हे विशेष.

हेच बघ ना मित्रा, तुझ्या-माझ्यासारखा माणूस टोल ओलांडताना काही एक रक्कम भरतो आणि निमुटपणे निघून जातो. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला, कार्यकर्त्याला आपण काहीतरी विशेष आहोत त्यामुळे आपल्याला सर्व विशेष सवलती मिळाल्या पाहिजेत, असे वाटत असते. इतके मोठे अर्थकारण करत आहात, तर भरा ना यार शंभर दोनशे रुपये? प्रश्न शंभर, दोनशे रुपयांचा नसतो, तर इतका मोठा नेता सर्वसामान्य जनतेप्रमाणे टोल कसा काय भरणार? कशासाठी भरणार? हा कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न असतो.

– झटका

Back to top button