भारत-फ्रान्स मैत्री पर्व

भारत-फ्रान्स मैत्री पर्व
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक परदेश दौरा भारतासाठी एकेक नवे शिखर पादाक्रांत करणारा ठरत असतो. जगाच्या पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढविण्याबरोबरच अनेक नवे ऐतिहासिक करार या दौर्‍यांतून होत असतात आणि त्या माध्यमातून देश प्रगतीचे पाऊल पुढे टाकत असतो. पंतप्रधानांचा अलीकडेच झालेला अमेरिकेचा दौरा त्याद़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताने तटस्थतेची भूमिका घेतल्यामुळे अमेरिका नाराज असल्याचे मानले जात होते. परंतु मोदी यांच्या दौर्‍याने तो समज खोटा ठरवला. पाठोपाठ झालेला त्यांचा फ्रान्सचा दौराही अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला.

जगाच्या पाठीवर कुणाच्याही मागे फरफटत न जाता स्वतःची धोरणे आपल्या अटी-शर्तींवर ठरवणारे देश म्हणून भारत आणि फ्रान्सचीही ओळख आहे. अशा या देशाच्या दौर्‍यामध्ये मोदींनी संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबरोबरच आगामी पंचवीस वर्षांसाठी भारत-फ्रान्स संबंधांचा दिशादर्शक आराखडाच तयार केला. फ्रान्स सरकारकडून 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' या फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मानाने पंतप्रधान मोदी यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.

या सन्मानाइतक्याच आणखी एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख करावयास हवा, तो म्हणजे 'बॅस्टिल डे परेड'मध्ये मोदी यांचा सहभाग. त्यांनी जागतिक पातळीवर मिळवलेल्या प्रतिष्ठेची कल्पना यावरून येऊ शकते. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या मैत्रीला अनेक कंगोरे आहेत. जागतिक परिप्रेक्ष्यात त्याकडे अनेक अंगांनी पाहता येऊ शकते. दोन्ही देशांचे भौगोलिक स्थान वेगळे. दोन्ही देश वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीतले असून त्यांचे आर्थिक विकासाचे टप्पे वेगवेगळे असे असले तरीसुद्धा जागतिक प्रश्नांकडे पाहण्यासंदर्भातील त्यांच्या द़ृष्टीमध्ये असलेले साम्य त्यांची मैत्री अधिक घट्ट करणारे आहे. दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दलचे विचार मिळते-जुळते आहेत.

मागील 25 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी स्थित्यंतरे झाली असून आर्थिक क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली. आर्थिक आणि भू-राजकीय संदर्भ वेगाने बदलल्यामुळे भारत-फ्रान्स यांना एकत्र येऊन काम करण्यासाठी पोषक वातावरण बनले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह अनेक युरोपीय राष्ट्रांच्या नेत्यांच्या द़ृष्टीने चीन हा त्यांचा सर्वांत मोठा आर्थिक पातळीवरील प्रतिस्पर्धी. असे असले तरीसुद्धा चीनपासून घाईगडबडीने फारकत घेणे शक्य नसल्याने बहुतेक देशांनी चीनशी असलेले आर्थिक संबंध कमी कमी करीत नेले आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि फ्रान्स यांना एकत्रित काम करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि दोन्ही देशांना त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकतो. मोदी यांच्या फ्रान्सच्या भेटीमध्ये त्याद़ृष्टीने अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

उभय देशातील संबंधांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी स्वातंत्र्योत्तर काळात ते ज्या रीतीने पुढे जायला हवे होते, तसे ते गेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी भारताशी मैत्रीचा हात पुढे केला आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. दोन्ही देशांनी धोरणसिद्ध भागीदार बनण्याचा करार केला. वाजपेयी यांच्या काळात झालेल्या या कराराला पंचवीस वर्षे झाली आहेत आणि मोदींच्या दौर्‍याला असलेली त्या कराराच्या रौप्यमहोत्सवाची पार्श्वभूमीही लक्षात घ्यावी लागते. पंचवीस वर्षांपासून दोन्ही देश सर्वच बहुपक्षीय मंच आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत एकत्र काम करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय दहशतवाद, हवामान बदल, शाश्वत विकास इत्यादी मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या मतांमध्ये समानता दिसून येते. या दौर्‍यामध्ये झालेले अनेक महत्त्वपूर्ण करार भारतासाठी महत्त्वाचे आहेत. भारत फ्रान्सकडून लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक पाणबुड्या घेणार आहे. शिवाय हिंदुस्थान एरोनॉटिक्सकडून विकसित करण्यात येणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टरला फ्रेंच बनावटीची इंजिन्स असणार आहेत. भारतीय लष्कराचे आजवरचे प्राधान्य रशियन इंजिन्सला होते. भारताच्या एकूण संरक्षण खरेदीत फ्रान्सचा वाटा आता 30 टक्के झाला असून अमेरिकेला मागे टाकून फ्रान्स भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार बनला आहे.

संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक क्षेत्र, शाश्वत ऊर्जा, सायबर स्पेस, डिजिटल तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी यंत्रणा, सागरी सुरक्षा आणि सागरी किनारपट्टीशी संबंधित अर्थव्यवस्था अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी मजबूत यंत्रणा उभारली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय सौरयुतीसाठी भारत-फ्रान्स-ऑस्ट्रेलिया व भारत-फ्रान्स-यूएई असा त्रिपक्षीय करारही करण्यात आला. फ्रान्सच्या दौर्‍यानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौर्‍यातही अनेक करार करण्यात आले. अबू धाबीमध्ये आयआयटी दिल्लीचा कॅम्पस सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण करार झाला. दोन्ही देशांनी देवाणघेवाणीसाठी स्थानिक चलन रुपया आणि दिरहमचा वापर वाढवण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा निश्चय करण्यात आला. भारतीय रिझर्व्ह बँक आणि संयुक्त अरब अमिरातच्या सेंट्रल बँकेदरम्यान स्थानिक चलन व्यवहाराच्या प्रणालीसंदर्भातील करार करण्यात आला.

भारतातील यूपीआय आणि यूएईमधील आयपीपीच्या एकीकरणाचा करार हा आजच्या काळाशी सुसंगत महत्त्वाचा करार म्हणता येईल. त्यामुळे दोन्ही देशांच्या बँकांची कार्ड एकमेकांशी जोडण्याची सुविधा मिळेल. फ्रान्स आणि यूएई या दोन्ही देशांशी झालेले करार महत्त्वाचे असले तरी मोदींचा फ्रान्सचा दौरा आंतरराष्ट्रीय द़ृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरला. अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून सुरू झालेले भारत-फ्रान्सचे संबंध दिवसेंदिवस अधिक घट्ट बनत चालले आहेत आणि पंतप्रधान मोदी यांच्या काळात ते एका नव्या उंचीवर गेले आहेत. जागतिक नकाशावर देशाचे राजनैतिक स्थान अधिक ठळक झाले, हे खरे फलित. भविष्यात ही भागीदारी आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, यात तिळमात्र शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news