लवंगी मिरची : राजकीय हाकहवाल | पुढारी

लवंगी मिरची : राजकीय हाकहवाल

कोण आहे रे तिकडे?
आता तिकडे कोणीच नाही महाराज, मी एकटाच आहे. तुमचा निष्ठावान, विश्वासू सेवक हरबा!
हरबा, प्रधानजी आजकाल दररोजचे हाकहवाल सांगण्यासाठी येत नाहीत. कुठे गेले आहेत आपले प्रधानजी?

प्रधानजी राज्यातच आहेत महाराज; पण नॉट रिचेबल आहेत. काय झाले महाराज की, पाऊस फारसा पडला नाही; पण राज्यातील राजकीय वातावरण मात्र वादळी झालेले आहे. त्यामुळे प्रधानजी स्वतः गोंधळात पडलेले आहेत. ताई बरोबर जावे की दादा बरोबर जावे, हा निर्णय होत नसल्यामुळे प्रधानजी थंड हवेच्या ठिकाणी हातावर हात ठेवून बसले आहेत.

ज्याच्या मागे बहुमत आहे त्याने सरकार स्थापन करावे, असा आमचा आदेश आहे. म्हणजे बहुमत असलेल्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय आम्हाला पण मान्य करावे लागतात. हरबा, राज्याची राजकीय परिस्थिती कशी आहे, याविषयीचा आपला अहवाल सादर करा.

संबंधित बातम्या

होय महाराज! राज्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. साधारणतः कुणीच विरोधी पक्षात बसायला तयार नाही. पंजा निशाणी असलेले आमदार सुद्धा नेमके काय करावे, याविषयी गोंधळात आहेत. त्यापैकी काही आमदार फुटण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

हरबा, हे सूत्र म्हणजे नेमके कोणते लोक असतात? ते कुठे राहतात?
महाराज, हे सूत्र नावाचे लोक सर्वपक्षीय मित्र असतात. ते कुठे राहतात हे कुणालाच माहीत नाही आणि ते कधीच कुणाला दिसत नाहीत. परंतु, त्यांना असलेली गोपनीय माहिती ते आपल्या पत्रकार बांधवांना देतात आणि त्याला तिखट-मीठ लावून पत्रकार बांधव ‘असे सूत्रांकडून समजते’ असे म्हणून ती बातमी छापून टाकतात.
ठीक आहे. त सूत्रांचा विषय सोडून द्या. राजकीय परिस्थिती काय आहे?
विशेष काही नाही महाराज, ज्यांनी पक्ष स्थापन केला किंवा मोठा केला त्यांना आमचे प्रेरणास्थान म्हणून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांचीही मान्यता आहे. म्हणजे गंमत अशी की, प्रेरणास्थान अत्रतत्र सर्वत्र आहे आणि त्याचबरोबर प्रेरणास्थानांना पण कळत नाही की, आपण नेमके कुठे आहोत?
हे ताई आणि दादा प्रकरण काय आहे? हे आम्हा समजले नाही. याचा स्पष्ट उलगडा करून सांगा!

होय महाराज! एका पक्षामध्ये वारसा हक्कासाठी ताई आणि दादा असे दोन नेते तयार झाले. पुढे चालून पक्ष आपल्यालाच चालवायला मिळेल, याची दोघांनाही खात्री होती. परंतु, झाले असे की, ताई ही कन्या आहे आणि दादा हा पुतण्या आहे. शेवटी कितीही काही झाले तरी बापाचा जीव आपल्या लेकरासाठी भयंकर तुटत असतो, हे मी आपणास सांगावयास नको. आपल्या युवराजांनी केलेले शंभर अपराध आपणही पोटात घातलेच आहेत. महाभारत काळापासून पुत्र किंवा कन्या आणि पुतण्या यांच्यामधील द्वंद्व आपण पाहिलेले आहे. इथे नेमके तेच घडले. पित्याने आपल्या पक्षाचा सातबारा कन्येच्या नावाने केला आणि त्यामुळे पुतण्याने घराबाहेर पडून त्या सातबारावर कब्जा केला. आता ही लढाई दीर्घकाळ चालत राहील, असे दिसते.
हरबा, असे असे गोल गोल बोलण्यापेक्षा स्पष्ट सांगा!

महाराज, राज्यामध्ये देवाभाऊ नावाचा गोरा गोमटा, देखणा आणि तरुण असा स्मार्ट नेता आहे. त्याने इतर पक्षांमध्ये असलेली अस्वस्थता ओळखून चाचपणी करायला सुरुवात केली. आधी पक्ष फोडावा असा त्यांचा विचार होता; पण देवाभाऊचे दिल्लीतील गुरू अमिताचार्य यांना पक्ष फोडण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यांनी देवाभाऊंना आदेश केला की पक्ष फोडू नका, संपूर्ण पक्षच आपल्याकडे घेऊन या! तेव्हापासून राज्यामध्ये पक्ष पळवण्याची फॅशन आली आहे.

– झटका

Back to top button