लवंगी मिरची : नक्कीच अभिमानाची बाब! | पुढारी

लवंगी मिरची : नक्कीच अभिमानाची बाब!

मित्रा, आपले भारतीय वंशाचे एक गृहस्थ आणि ज्येष्ठ मंत्री थरमन षण्मुगरत्नम यांनी सिंगापूरमधील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहणार आहेत. शिवाय या बातमीमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, थरमन हे सिंगापूरचे अध्यक्ष होऊ शकतात. म्हणजे, याचा अर्थ आता ग्रेट बि—टन म्हणजे इंग्लंडच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक आहेत आणि त्यापाठोपाठ सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे नागरिक अध्यक्षपदी येऊ घातलेले आहेत. आपण भारतीय लोकांसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

होय नक्कीच; पण याचा अर्थ एक लक्षात घे की, आता कुठे जगाला भारतीय लोकांचे टॅलेंट समजायला सुरुवात झाली आहे. म्हणजे, आपला प्रशासकीय अनुभव किंवा प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन उद्या इतर देशांनी आपल्या देशातून अध्यक्षपदासाठी आणि पंतप्रधानपदासाठी उमेदवार मागितले, तर आश्चर्य वाटायला नको.

अरे, म्हणजे काय? आपले शेजारचे देश पाहा ना? दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान, अस्थिर असलेल्या नेपाळ, श्रीलंका किंवा गरिबीबरोबर झुंज देणारा बांगला देश यांना आपले देश सावरण्यासाठी भारतीय लोकांची मदत लागणार आहे; पण मला एक सांग, भारतीय लोक इतकी प्रशासकीय क्षमता असलेले असतील, तर मग आपल्या देशांमधील सर्व व्यवस्थांचा बट्ट्याबोळ का होत आहे, हे समजायला मार्ग नाही.

हे बघ, पहिल्यांदा हे समजून घे की, आपली अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम स्थितीमध्ये आहे. जगातील अनेक देश मंदीच्या लाटेमध्ये वाहून जाण्याची वेळ आली होती; पण सर्व प्रकारच्या लाटांचे फटकारे खाऊन आपण मजबूत स्थितीमध्ये उभे आहोत. त्यामुळे आपण आपल्या प्रशासकीय क्षमतेचा पुरावा जगाला दिलेला आहे. त्यामुळे पुढे चालून जगभरातून भारतीय लोकांना डिमांड आली, तर आपल्याकडे असंख्य लोक आहेत जे इतर देशांत मदत करू शकतात.

मला आणखी एक गोष्ट वाटते की, आपल्याकडे खूप टॅलेंट आहे; पण आपल्या देशामध्ये सर्वोच्च पदावर जाण्याची संधी मिळाली नाही, असे बरेचसे लोक आहेत. त्या लोकांना पण इतर देशांमध्ये आपली बौद्धिक क्षमता दाखवण्यासाठी भरपूर स्कोप मिळू शकतो.

शिवाय आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे समजा एखादा भारतीय माणूस अध्यक्ष किंवा पंतप्रधानपदावर बसला, तर पुढे पंचवीस-तीस वर्षे त्या देशाला नेतृत्वाची चिंता नाही. म्हणजे पहिली टर्म संपल्यानंतर दुसर्‍या टर्मच्या वेळेला आमदार-खासदारांची पळवापळवी करून आपले बहुमत बर्‍यापैकी मॅनेज करू शकतो आणि दीर्घकाळपर्यंत स्थिर सरकार देऊ शकतो. त्या देशांना हे सर्व कौशल्य प्राप्त असणारी माणसे रेडिमेड मिळाली, तर मला असे वाटते की, पुढील काही वर्षांत अनेक देशांमध्ये भारतीय लोक अध्यक्ष किंवा पंतप्रधानपदावर बसलेले दिसतील.

त्यापेक्षा आणखी एक आयडिया माझ्या डोक्यात येत आहे, ती म्हणजे यूपीएससीकडून प्रशासकीय कौशल्य आजमावण्याची एक परीक्षा घ्यायची आणि त्यात निवडून आलेल्या उमेदवारांची एक यादी तयार ठेवायची. एखादा देश डबघाईला आला, तर यापैकी एक एक उमेदवार अध्यक्ष किंवा पंतप्रधानपदासाठी इतर देशांना पाठवायचे आणि त्यांच्या सेवा पुरवण्याच्या बदल्यात आपण भरपूर मोठा महसूल त्यांच्याकडून वसूल करायचा. शेवटी आपल्याकडे लोकसंख्या आणि टॅलेंटशिवाय दुसरे आहेच काय?

– झटका

Back to top button