राजकीय प्रीतिसंगम | पुढारी

राजकीय प्रीतिसंगम

मुंबई वार्तापत्र : विवेक गिरधारी

राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ पक्ष घेऊन अजित पवार भाजप सरकारमध्ये दाखल झाले. शिंदे-फडणवीसांच्या दोघांच्या सरकारात तिसरा दाखल झाला आणि या राजकीय प्रीतिसंगमावर नवा मधुमास बहरला. या मधुचंद्राला शुभेच्छा न देता शरद पवार मात्र कराडच्या प्रीतिसंगमावर पोहोचले. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभी करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस खरेच फुटली आहे ?

महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष संकटात सापडला असताना दिल्लीश्वरांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आणि फडणवीस यांनीही शिवसेना फोडली तशी महाविकास आघाडीही फोडून दाखवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकांत मविआ भाजपपेक्षा जास्त जागा जिंकणार, असे अलीकडच्या काही सर्वेक्षणांत दिसले आणि भाजपची चिंता वाढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मग आपल्या सोयीचे सर्वेक्षण करून घेत मुख्यमंत्री म्हणून पहिला क्रमांक स्वतःकडे घेतला तरी त्याने परिस्थिती बदलणार नव्हती. लोकसभेच्या 48 पैकी 32 ते 33 जागा मविआ जिंकणार असेल तर भाजपचा म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो महाराष्ट्राने केलेला महापराभव ठरेल, हे भाजपने ओळखले. शिवसेनेत फूट पाडून शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवले तरी शिवसेनेला सोबत घेऊन शरद पवार मविआचा रथ मजबुतीने हाकत होते. उद्याच्या कोणत्याही निवडणुकांत मविआ सर्वाधिक जागा घेऊन सत्तेवर येईल, असेच भाजपने केलेली सर्वेक्षणे सांगत होती. भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उदय होऊ घातला आहे, याचीही नोंद भाजप श्रेष्टींनीं घेतली. मविआचा फायदा काँग्रेसलाही होत असल्याचेही लपून राहिले नाही. अगदी शिंदेशाहीच्या सर्वेक्षणातही मुख्यमंत्रिपदाची तिसरी पसंती अशोक चव्हाण यांना मिळाली. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर मविआची अशी ताकद वाढणे भाजपला अपेक्षित नव्हते. लोकसभा निवडणुका जिंकायच्या तर मविआ फोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मविआच्या या संकटात भाजप श्रेष्ठींना फडणवीस यांच्याशिवाय अन्य कुणाची आठवण होऊ शकते? शिवसेनेचे अत्यंत अवघड ऑपरेशन त्यांनीच वर्षभरापूर्वी केले. या फुटीचे अपेक्षित राजकीय परिणाम भाजपच्या बाजूने दिसत नाहीत. अर्थात ही मुख्यमंत्री शिंदे यांची मर्यादा आहे. फडणवीस यांचा तो दोष नव्हे. राजकीय वाढीच्या द़ृष्टीने शिंदे निष्प्रभ ठरले म्हणून मविआ फोडणे अटळ होऊन बसले. ही जबाबदारी फडणवीस यांनी अखेर पार पाडली. अजित पवारांना सरकारमध्ये आणून त्यांनी मविआला खिंडार पाडले. पुन्हा सत्तेचा सोपान गाठण्यास निघालेली मविआ अस्तित्वाच्या संघर्षात नेऊन उभी केली. 40 आमदारांसह अजित पवार सरकारात जाऊन बसल्याने आता काँग्रेसमध्ये स्वबळाचा विचार बळावला. ठाकरे सेनाही सैरभैर झाली. यातूनही मविआ टिकवण्यात शरद पवार यशस्वी झाले तरी कमावलेली मोठी ताकद ही आघाडी गमावून बसलेली असेल. भाजप श्रेष्ठीना नेमके हेच हवे होते. फडणवीस यांनी ते करून दाखवले.

संबंधित बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना अजित पवारांना सरकारमध्ये घेण्याची गरज काय होती, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचे हे उत्तर आहे. मविआ मजबूत असताना शिंदे गटाच्या भरवशावर बसलो तर लोकसभा गमावून बसू आणि महाराष्ट्राची सत्ताही, हा विचार भाजपने केला आणि अजित पवारांना सरकारात बसवले. ही पुतण्याची बंडाळी की काकांची खेळी, असा प्रश्न घेऊन महाराष्ट्र आता बसला आहे. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण, या प्रश्नावर शरद पवारांनी हात वर करून उत्तर दिले, शरद पवार! पण अजित पवारांच्या बंडाळीत शरद पवारांबद्दल महाराष्ट्र तितका आश्वस्त नाही. एकटे अजित पवार गेले असते तर गोष्ट वेगळी होती. पण छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांना मंत्री म्हणून शपथ घेताना पाहून या बंडाळीतही शरद पवारांचा अद़ृश्य हात दिसू लागला. हे पुतण्याने काकाविरुद्ध केलेले बंड नसून काकांनी मविआविरुद्ध केलेला छुपा उठाव आहे, असाही एक निष्कर्ष काढला जातो. त्याची काही कारणे अशी आहेत…

  • अजित पवार चाळीस आमदार घेऊन भाजप सरकारमध्ये दाखल होत असल्याचे आपल्याला माहीत नव्हते, असा पहिला खुलासा शरद पवारांनी केला हे पहिले कारण.
  • अजित पवार यांच्या या फंदफितुरीला शरद पवार बंडखोरी म्हणायला तयार नाहीत. ही दरोडेखोरी आहे, असे ते मानतात. दरोड्यातील मुद्देमाल पुन्हा मिळवता येतो हा त्याचा अर्थ मानायचा का?
  • अजित पवारांवर कायदेशीर कारवाई करणार नाही. आपण जनतेच्या न्यायालयात जाणार, असे शरद पवार यांनी जाहीर केले. पक्षावर पडलेल्या दरोड्याचा हिशेब ते थेट निवडणूक रिंगणात विचारणार आहेत. कदाचित तोपर्यंत सत्ता उपभोगून अजित पवार काकांकडे परतलेले असतील.
  • ईडीच्या कारवाया, इन्कम टॅक्सच्या धाडी, अटकेच्या टांगत्या तलवारी अशा परिस्थितीतून पक्षाला उसंत मिळावी म्हणून अजित पवारांनी सरकारात जावे आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीसोबत राहून पक्ष वाढवावा, अशीही योजना असू शकते.
  • अजित पवारांच्या बंडाचे वर्णन महाभूकंप असे माध्यमांनी केले. या बंडाचा जितका धक्का माध्यमांना बसला, तितका तो शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बसलेला नाही. ही सर्वच मंडळी निर्धास्त वाटली. ठरल्याप्रमाणे गोष्टी घडत आहेत, अशीच त्यांची देहबोली होती. ही सर्व कारणे लक्षात घेतली म्हणजे पहाटेच्या शपथविधीची गुगली माझीच होती म्हणणारे शरद पवार विसरता येत नाहीत. कुणी सांगावे, ईडीची आघाडी शांत करून राष्ट्रवादीची नौका निवडणुकीच्या किनारी लागली तर अजित पवारांच्या दुसर्‍या बंडाचा ‘दुसरा’ मीच टाकला आणि भाजपची विकेट काढली, असे हेच शरद पवार सांगतील. तूर्त शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आपापल्या डावात जिंकलेले दिसतात. केंद्राच्या कारवायांना स्थगिती मिळवून शरद पवारांनी मोठी उसंत आणि सत्तेची रसद पक्षासाठी मिळवली. महाविकास आघाडी फोडून देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा महाराष्ट्रातील लोकसभेचा रणसंग्राम सोपा करून ठेवला. या डावात एक-अनेक पाऊल मागे पडले ते एकनाथ शिंदे. ज्या अजित पवारांवर दादागिरीचे आरोप करून मविआ सरकार शिंदे यांनी पाडले, त्याच दादागिरीसोबत आता नांदणे आले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सरकारात आले तर सत्तेतून बाहेर पडू ही अलीकडेच उपसलेली तलवार म्यान करून ठेवणे आले. कोंडी इतकी की, अजित पवारांच्या शपथविधी समारंभात मोबाईलवर बघत बसणे आले. यातून मार्ग कसा काढावा, या प्रश्नाचे उत्तर जणू ते ‘गुगल’ करत असावेत.

Back to top button