शिवराज्याभिषेकाचा अमृतसोहळा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी सोहळा म्हणजे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षाचा आनंदसोहळा आजपासून सुरू होतोय. हिरे, माणके, मोती उधळून जयजयकार करण्याचा सोहळा म्हणूनच किल्ले रायगडासह संपूर्ण मराठी जनांच्या मनामनात हा सोहळा साजरा होतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठी माणसांच्या मनात जे स्थान आहे, ते साडेतीन शतकांहून अधिक काळ अढळ आहे. महाराजांनी केवळ स्वराज्याचीच प्रेरणा दिली असे नव्हे, तर डोंगर-दर्यांतील सामान्य मावळ्यांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करून स्वाभिमानी विचारांचे बीजारोपण केले. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शुक्रवारी, शके 1576, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले. तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. याप्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वामुळे सामान्य माणसांच्या मनात स्थान निर्माण केले होते, ते राज्याभिषेकाच्या आधीही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राजेच होते. परंतु, तरीसुद्धा परंपरेने राज्याभिषेकाला विशेष महत्त्व दिले आहे. राज्याभिषेकापूर्वी व्यक्ती इतरांसारखी सर्वसामान्य मानली जाते. प्रजा अशा सर्वसामान्य व्यक्तीच्या आज्ञेचे पालन करण्याची शक्यता नसते म्हणून राजा सर्वसामान्यांहून वेगळा व श्रेष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि त्याच्या अधिकाराला पावित्र्य व मान्यता मिळवून देण्यासाठी राज्याभिषेकाचा विधी अपरिहार्य मानला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचसाठी राज्याभिषेक करवून घेतला आणि ते सर्वार्थाने राजे झाले. जगाच्या कानाकोपर्यात अनेक राजे, महाराजे होऊन गेले. त्यांची साम—ाज्ये प्रचंड होती. तरीसुद्धा आजही राजे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजच नजरेसमोर येतात, इतके हे राजेपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महान होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तमरीत्या आखून ते कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जाती-धर्मांतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून कामे करवून घेतली. सर्व धर्मांतील साधू-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस याबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय कुणाही मराठी माणसाचा दिवस जात नाही. देशाच्या पातळीवरही राष्ट्रीयतेचे प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती-धर्मांमध्ये, माणसां-माणसांमध्ये भेद केला नाही. राजाचे तेच वैशिष्ट्य असते, त्याच्या द़ृष्टीने सर्व प्रजाजन सारखेच असतात. स्वराज्यावर आक्रमण करणारे मुसलमान होते, त्यामुळे त्यांच्या लढाया मुस्लिम शासकांशी झाल्या. याचा अर्थ महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते, असा नाही. महाराजांच्या सैन्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम होते आणि मुस्लिमांच्या सैन्यात अनेक हिंदू सैनिक होते, यावरून तत्कालीन परिस्थितीचे आकलन करून घेता येते. रयतेच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये, अशी सूचना आपल्या सैन्याला देणारे महाराज रयतेची किती काळजी घेत होते, हे दिसून येते. महाराजांनी अपुरे सैन्यबळ असतानाही अनेक मोठ्या लढाया जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर-वीरांबरोबर करण्यात आल्याचे इंग्रजांच्या कागदपत्रांतून आढळून आले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्वल्य अभिमान यामुळे लोककल्याणकारी राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिहासकार. त्याने छत्रपतींविषयी म्हटले आहे, ‘शिवाजी महाराजांनी सार्वकाल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून ते सदैव अलिप्त राहिले. स्त्रियांच्या अब्रूला ते दक्षपणे जपत असत, मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत. याबाबतीत त्यांच्या आज्ञा कडक असत. जो कोणी याबाबतीत आज्ञाभंग करील, त्याला ते कडक शासन करीत असे.’ छत्रपती शहाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या महाराजांनी केवळ स्वराज्य निर्माण केले नाही, तर स्वराज्यातील सामान्य माणसांना स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. अशा या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सर्वसामान्य जनतेच्या वतीने साजरा होतोय, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही त्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद केली असून, त्याद्वारे महाराजांच्या विचारांच्या जोपासनेसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केवळ उत्सव न करता भविष्यातही महाराजांच्या कर्तृत्वाचा डंका वाजत राहील, यासाठी विविध कल्पक उपक्रमांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराजांच्या कार्याची ओळख ठळकपणे करून देण्यासाठीच्या अनेक योजना आहेत. या सर्वांतून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांच्या मनात रुजवण्याचे काम व्हावे. सामान्य माणसांच्या मनात महाराजांचे विचार रुजवण्यातूनच खर्या अर्थाने आजच्या काळाशी सुसंगत राज्याभिषेक साजरा होईल.