प्रवेशाची परीक्षा | पुढारी

प्रवेशाची परीक्षा

मित्रा, मला असे नेहमी वाटते की, या जगात प्रवेश करणे सोपे आहे. परंतु, शाळेचा प्रवेश मिळणे अत्यंत अवघड आहे. म्हणजे काय आहे की, आपल्या कळत नकळत आपण या जगामध्ये प्रवेश करतो आणि सर्व नातेवाईकांना, आई-वडिलांना आनंद होतो की एक नवा जीव आपल्या घरामध्ये आला आहे. त्या येणार्‍या निरागस जीवाला कल्पनाही नसते की, पुढे काय काय वाढून ठेवलेले आहे. म्हणजे, उदाहरणार्थ शाळेमध्ये प्रवेश मिळवणे हे इतके जिकरीचे झाले आहे की, त्यामुळे मला असे वाटते की एक वेळ जगात प्रवेश करणे सोपे आहे. परंतु, शाळेत प्रवेश मिळणे मात्र अत्यंत कठीण आहे. नक्कीच, तुझ्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे. म्हणजे काय होतं की, डार्विनचा जो सिद्धांत आहे, ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ याचा अर्थ जो मजबूत आहे, तोच टिकणार आहे आणि अनुवंशशास्त्र जे आहे, त्याच्याप्रमाणे दोन्ही डीएनए यांचा संगम होऊन एक तेजस्वी डीएनए असलेला मुलगा किंवा मुलगी घरामध्ये जन्म घेते.

त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढत गेली आहे. सगळेच काही झटपट झाले आहे. मुले लवकर रांगायला लागतात, बोलायला लागतात, चालायला लागतात आणि पाहता-पाहता तीन वर्षांची झाल्याबरोबर बालवाडी नावाच्या शाळेमध्ये प्रवेश करण्यास सज्ज होतात. फार फार पूर्वी नव्हे, तर अगदी 20 एक वर्षांपूर्वी बालवाडीचे फारसे प्रस्थ नसे. कार्ट किंवा कार्टी घरी त्रास देते म्हणून त्याला तीन तास अडकवून टाकावे, यासाठी बालवाडी असायची. या बालवाडी क्षेत्रात सर्वत्र महिला असतात. कारण, हे पुरुषाला झेपणारे काम नाही. या शिक्षिका अत्यंत सहनशील असतात. सर्व प्रकारची लहान मुले हाताळण्याचा त्यांना अनुभव असतो आणि स्त्री सुलभ वात्सल्य असल्यामुळे कितीही खोडकर मुलगा असला, तरी त्याच्यावर त्या प्रेमच करतात. असे हे एकदाचे तीन वर्षांचे झालेले मूल आधी ज्युनिअर केजी आणि पुढे चार वर्षे झाली, तर सिनियर केजी आणि पुढे पाच वर्षांची झाल्यानंतर इयत्ता पहिलीच्या दारावर धडका मारायला लागते.

हो, पण त्याला ज्युनिअर केजीमध्ये टाकतानाच विविध पॅटर्नच्या बालवाड्या तयार झाल्या आहेत. ज्या मुलाला कुठलीच भाषा अजून नीटपणे बोलता येत नाही, त्याला बालवाडी इंग्लिश मीडियमची असली काय किंवा मराठी माध्यमाची असली काय, काही फरक पडत नाही; पण पालकांना पडतो. म्हणजे, ज्युनिअर केजीमध्ये जाणार्‍या आणि अद्यापही शी व शुचेही भान नसलेल्या त्या बालकाची आई अत्यंत अभिमानाने सर्वांना सांगत असते की, आमच्या पिंटूची बालवाडी इंग्लिश माध्यमाची आहे म्हणून. ती बालवाडीसुद्धा प्रतिष्ठित शाळेची असली पाहिजे, याची पूर्ण काळजी घेतली जाते.

संबंधित बातम्या

हो तर, ती घ्यावीच लागते कारण की, एकदा बालवाडीत प्रवेश मिळाला की, त्या प्रतिष्ठित शाळेमधून इयत्ता दहावीपर्यंत आणि पुढे त्यांचे जुनिअर कॉलेज असेल, तर इयत्ता बारावीपर्यंत प्रवेशासाठी धावाधाव करावी लागत नाही. म्हणून हा सगळा आटापिटा असतो. आता जून महिना आला आहे, तर 3 वर्षे वय झालेल्या मुला- मुलींच्या पालकांना शाळेच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. अक्षरश: काही ठिकाणी प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य, अशी काही योजना असेल; तर पालक पहाटे पाच वाजल्यापासून शाळेच्या बाहेर रांगा लावायला सुरुवात करतात.

होय, हे द़ृश्य मी नागरी भागात आणि शहरी भागात नेहमी पाहिलेले आहे. या पालकांच्या रांगेमध्ये 90 टक्के पुरुष असतात. आई नावाची सर्वव्यापी संस्था घरी असते आणि तिने पुरुष नामक कामगार वर्गातील व्यक्तीला पहाटे चारला उठून आंघोळ, कपडे व्यवस्थित करून शाळेमध्ये पोहोचविण्याचे आदेश दिलेले असतात. आदेशाचे पालन करावेच लागते.

– झटका

Back to top button