धवलक्रांती : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा | पुढारी

धवलक्रांती : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा

दरवर्षी साजरा होणारा जागतिक दूध दिन हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज ‘जी-20’चे अध्यक्षपद स्वीकारणार्‍या भारताच्या ग्रोथ स्टोरीची जगभरात चर्चा आहे. भारत हा खेड्यापाड्यांचा देश असून, इथल्या ग्रामीण विकासामध्ये शेतीपूरक व्यवसाय असणार्‍या दुग्धोत्पादनाचा मोठा वाटा आहे. आज भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून पुढे आला असून, जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा 24 टक्के वाटा आहे. सहकारी दूध संघांच्या माध्यमातून देशाच्या ग्रामीण अर्थकारणाला मिळालेला बूस्टर पाहता ही दुग्धक्रांती ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणाच म्हणायला हवी.

जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशांनुसार 1 जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून साजरा होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणार्‍या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मूळ उद्देश. दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक असा जोडधंदा आहे. देशातील ग्रामीण भागात दूध उत्पादन व्यवसायात प्रामुख्याने विखुरला आहे.

दुग्धोत्पादनामुळे शेती करताना येणार्‍या आर्थिक ताणांच्या काळात शेतकर्‍यांना मोठा हातभार लागतो. भारतात बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जणांच्या रोजच्या आहारात दुधाचा समावेश असतो. त्यामुळे दुधासाठी मागणीचा अडसर कधीच राहिला नाही. उलटपक्षी दुधाच्या उत्पादनात काही कारणांनी चढ-उतार होत असतात.

सर्वसाधारणपणे दुधाचे उत्पादन केल्यावर दूध त्याच स्थितीत विकणे फायदेशीर असते. अनेकदा शिल्लक राहिलेले दूध योग्य पद्धतीने साठवण्याविषयी माहिती नसल्यामुळे बर्‍याचदा शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागते. वास्तविक, दुधाची निश्चित अशी विक्रीची व्यवस्था आज झाली आहे. शेतकर्‍यांनी दुधाचे उत्पादन अधिक वाढवावे यासाठी महाराष्ट्र सरकारने दुधाला योग्य भाव ठरवून दिले आहेत. गावोगावी दूध संकलन केंद्रे उघडून निरनिराळ्या हंगामासाठी दुधाच्या प्रतीनुसार वेगवेगळ्या किमती ठरवून दिल्या आहेत. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये खेडोपाडी झालेली दुग्धक्रांती ही भारताच्या आर्थिक विकासाचा एक अविभाज्य भाग आहे.

महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनाला चांगली संधी आहे आणि हवामानही चांगले आहे. परंतु, 1960-65 पर्यंत काही अपवाद वगळले, तर शेतकरी दुग्ध व्यवसाय करत नव्हते. दुधाचा व्यवसाय होऊ शकेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर पैसा कमवता येईल, अशी जाणीवच झालेली नव्हती. अर्थात, कोणताही व्यवसाय करायचा झाला, तर त्यासाठी आवश्यक असे ग्राहकसुद्धा तयार असले पाहिजे आणि हे ग्राहक बहुत करून शहरांमध्येच उपलब्ध आहेत.

शहरातल्या लोकांची क्रयशक्ती वाढून त्यांच्यामध्ये नियमितपणे दूध वापरण्याची सवय वाढत नाही, तोपर्यंत दुधाला गिर्‍हाईक मिळत नाही. मात्र, 1960 च्या दशकामध्ये शहरातल्या ग्राहकांची ही सवय वाढायला लागली आणि त्यामुळे दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करता येईल, असे लक्षात आले. डॉ. वर्गीस कुरीयन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धवलक्रांतीने दुग्धव्यवसायात मोठे परिवर्तन घडून आले.
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. कारण, जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात भारताचा 24 टक्के वाटा आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसमधील उत्पादनविषयक माहितीनुसार जागतिक दूध उत्पादनात भारत हा प्रथम स्थानी आहे. ही आकडेवारी समोर आली आहे. 2021-22 मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात 24 टक्के योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2014-15 ते 2021-22 अशा आठ वर्षांच्या कालावधीत, भारतातील दूध उत्पादनात 51 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2021-22 मध्ये देशातील दूध उत्पादन 22 कोटी टनांपर्यंत वाढले आहे.

– नवनाथ वारे, कृषी अभ्यासक

Back to top button