प्रभावी, जोखीमविरहित हेरगिरीचे तंत्र

भारत सरकार ‘पेगासस’सारखे नवीन सॉफ्टवेअर खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असून, यासाठी सरकारने 120 दशलक्ष बजेट ठेवल्याचेही सांगितले जात आहे. शत्रूच्या गोटातील हालचाली जाणून घेण्यासाठी पूर्वीच्या काळी गुप्तहेरांचा वापर केला जात असे. आजही तो ‘रॉ’सारख्या संघटनांच्या माध्यमातून केला जात असतोच; पण त्यामध्ये प्रचंड मोठी जोखीम असते. याउलट तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हेरगिरीचे काम अतिशय सुलभ, प्रभावी आणि जोखीमविरहित बनवले आहे.
पेगासससारख्या सॉफ्टवेअरमुळे किंवा विविध प्रकारच्या मालवेअर्समुळे, अॅपमुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची, व्यक्ती समूहांची, संवेदनशील ठिकाणांची, महत्त्वाच्या संस्थांची माहिती मिळवणे हे सोपे बनले आहे. तंत्रज्ञानाची क्रांती ही दुधारी तलवारीसारखी असते, असे का म्हटले जाते, ते यावरून स्पष्ट होते. आज जगातील बहुतेक देश हेरगिरी करण्यासाठीच्या नवनवीन शस्त्रांच्या, आयुधांच्या शोधात आहेत. जगभरात वेगवेगळ्या प्रकारे हेरगिरी केली जात असते आणि यासाठी अनेक शस्त्रांचा वापर देशाबरोबरच इतर देशांवरही नजर ठेवण्यासाठी होत असतो. या स्पर्धेत कोणताही देश मागे राहू इच्छित नाही. याबाबत विविध पद्धती अवलंबल्या जातात आणि त्यावरून अनेक वादप्रवादही होत असतात. पेगासस, हर्मिट ही नावे अलीकडील काळात या पाळत ठेवण्याच्या किंवा हेरगिरीच्या प्रकरणाच्या निमित्ताने चर्चेत आली. भारतात पेगाससची खूप चर्चा झाली. आज जगातील अनेक देशांमध्ये या प्रकारचे स्पायवेअर वापरले जात आहे. आता एका वृत्तानुसार, भारत सरकार पेगासससारखे नवीन सॉफ्टवेअर खरेदी करण्याच्या तयारीत आहे, असे समजते. याबाबतच्या एका अहवालानुसार, केंद्र सरकार वादग्रस्त ठरलेल्या पेगाससपेक्षा कमी लोकप्रिय असणारी नवीन स्पायवेअर प्रणाली घेण्याचा विचार करीत आहे. यासाठी सरकारने 120 दशलक्ष बजेट ठेवल्याचेही सांगितले जात आहे. आज जगातील अनेक देश वेगवेगळे स्पायवेअर्स वापरत आहेत. काही देश इतर देशांमध्ये विकसित झालेले स्पायवेअर वापरत असतात; तर अमेरिका, बि—टन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारखे देश त्यांच्या स्वत: च्या गुप्तचर संस्थांनी विकसित केलेले स्पायवेअर वापरण्यालाच प्रधान्य देतात.
सध्याच्या काळात तंत्रज्ञान हा लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. स्पायवेअरचा विचार करता साध्या आणि सोप्या शब्दांत याची व्याख्या हेरगिरी करणारा व्हायरस अशी करता येईल. याला स्पायवेअर असे म्हणतात. कारण, ते वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय मोबाईल, लॅपटॉप यासारख्या इतर उपकरणांमधून माहिती मिळवते आणि ते ज्या ठिकाणाहून नियंत्रित होते तिथपर्यंत पोहोचते. असे मानले जाते की, साधारणत: 90 च्या दशकापासून या तंत्रज्ञानाच्या निर्मितीची सुरुवात झाली. परंतु, प्रत्यक्षात 2000 नंतरच ते लोकांच्या नजरेत आले. 2006 मध्ये ते विंडो ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असल्याचे आढळले होते. अलीकडील काळात भारतात पेगाससची खूप चर्चा झाली. हा स्पायवेअर एनएसओ ग्रुप या इस्रायली कंपनीने विकसित केला आहे. हा स्पायवेअर 2016 मध्ये पहिल्यांदा उघड झाला होता. एका अरब कार्यकर्त्याकडून संशयास्पद संदेश मिळाल्याने ही बाब उघडकीस आली. व्हॉटस्अॅपने ही बाब उजेडात आणली. मे 2019 मध्ये व्हॉटस्अॅपने भारतासह जगभरातील 20 देशांमध्ये पेगासस स्पायवेअर वापरले जात असल्याबद्दल इस्रायली स्पायवेअर निर्माता एनएसओ ग्रुप विरुद्ध खटला दाखल केला. हे स्पायवेअर पत्रकार, कार्यकर्ते, वकील आणि वरिष्ठ सरकारी अधिकार्यांची हेरगिरी करत होते. याबाबत भारतात बराच गदारोळ झाला होता आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते.
पेगाससनंतर, आणखी एक स्पायवेअरची चर्चा झाली जी आणखी धोकादायक असल्याचे म्हटले गेले. त्याचे नाव हर्मिट स्पायवेअर आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील लूकआऊट थ—ेट लॅब या कंपनीने याबाबतची माहिती समोर आणली. लूकआऊटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, या स्पायवेअरचा वापर अनेक देशांतील लोकांची हेरगिरी करण्यासाठी केला जात आहे. राजकीय नेते, व्यापारी, पत्रकार आणि शिक्षण क्षेत्रातील लोक हे त्याचे लक्ष्य राहिले. कंपनीच्या संशोधकाने हे स्पायवेअर कझाकिस्तानमध्ये शोधले. संशोधकाच्या मते, इटालियन सरकारने 2019 मध्ये भ—ष्टाचारविरोधी मोहिमेत याचा वापर केला. अलीकडे, चीनच्या हेरगिरी करणार्या बलूनबाबत बरीच चर्चा झाली. अमेरिकेने चिनी बलूनवर गोळीबार केल्याने प्रतिस्पर्धी देश एकमेकांची हेरगिरी कशी करतात याविषयीची चर्चा पुन्हा सुरू झाली. एखाद्या देशाची हेरगिरी करण्यासाठी बलून वापरण्याची कल्पना अनेकांना हास्यास्पद वाटू शकते. तथापि, वास्तविकता अशी आहे की, विरोधकांवर वर्चस्व गाजवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला जातो. इतर देशांची गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात. सिग्नल इंटेलिजन्स ही डेटा गोळा करण्याची एक प्रमुख पद्धत आहे. सहसा अत्यंत संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी याचा वापर केला जातो.
इमेजरी इंटेलिजन्सचाही हेरगिरीसाठी वापर केला जातो. अनेकदा यामध्ये उपग्रह, ड्रोन आणि विमानांचाही वापर केला जातो. सैन्य आणि शस्त्रास्त्रे, विशेषत: लष्करी तळ, आण्विक शस्त्रागार आणि इतर सामरिक मालमत्ता यांच्या धोरणात्मक हालचाली टिपण्याचे काम याद्वारे होते. याखेरीज सायबर हेरगिरीही अलीकडील काळात चर्चेत आली आहे. सामान्यत: ती सिग्नल इंटेलिजन्सशी संबंधित आहे. संरक्षित सिस्टीममध्ये प्रवेश करण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी हॅकर्सद्वारे याचा वापर केला जातो. यासाठी मालवेअरचा वापर केला जातो.
ओपन सोर्स इंटेलिजन्स हा हेरगिरी करण्याचा सोपा आणि नवीन मार्ग आहे. यामध्ये विविध प्राथमिक स्रोतांमधून आलेली माहिती संकलित केली जाते. वर्तमानपत्रे, ब्लॉग, अधिकृतपणे समोर आणली गेलेली माहिती आणि अहवाल, विकिलिक्स, द इंटरसेप्ट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इत्यादींवरील माहिती यांचा वापर करून त्या राष्ट्रासाठीच्या महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था यांच्याविरोधात षड्यंत्र आखण्याचे काम या हेरगिरीमध्ये केले जाते. अगदी अमेरिकेसारख्या सर्व शक्तिमान महासत्तेच्या प्रमुखांचीही माहिती गोपनीय राहत नाही. 2020 मध्ये अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या दैनिकाने ‘द प्रायव्हसी प्रोजेक्ट’ नावाचा एक प्रकल्प राबवला होता. त्यासाठी सव्वा कोटी स्मार्टफोन आणि त्यामाध्यमातून झालेल्या संदेश देवाण-घेवाणीचा मागोवा घेण्यात आला होता.
– कमलेश गिरी