बहिष्कार अस्त्र | पुढारी

बहिष्कार अस्त्र

बाबा, बाबा, आई म्हणाली, आजपासून तुमच्या प्रत्येक कामावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. तुम्ही आम्हाला कधीच काही विचारत नाही. तुमच्या मनात येईल तेच करता. त्यामुळे आई म्हणते की, आम्ही सगळे तुमच्या वागण्याला कंटाळलो आहोत.

काय बोलतोस रे गाढवा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करतो, तरी तुमची ओरड आपली चालूच आहे, विचारत नाही, विचारत नाही म्हणून. बोलाव तुझ्या आईला.

काय हो, मला कशाला बोलवलत?

हा पिंट्या काय म्हणतोय ते बघ. माझ्यावर बहिष्कार टाकणार आहात म्हणे तुम्ही? तुझ्या डोक्यात काहीतरी खुळ येतं, वर्तमानपत्र वाचतेस, टीव्हीवरच्या बातम्या पाहतेस आणि कुणी कशावर बहिष्कार टाकला की, तुला वाटते आपण पण बहिष्कार टाकावा.

हो, तुमची सगळी मनमानी चालू आहे. तुम्ही कोणताही निर्णय घेताना आम्हाला काही विचारत नाहीत. आपल्या घरासाठी परवा फ्लॉवरपॉट घेऊन आलात, मला विचारून आणलात का? त्या फ्लॉवर पॉटवर पण माझा बहिष्कार आहे. मी त्याच्यात कधीच फुले लावणार नाही. एवढेच काय, आज सकाळी किराणा घेऊन आलात त्या किराणावर, पण माझा बहिष्कार आहे. तुम्ही ती जी गच्ची बांधली आहे आपल्या घरावर, त्याच्यावर पण आमचा बहिष्कार आहे. मी आणि मुले गच्चीवर कधीच जाणार नाहीत.

अगं वेडे, मी जे काय करतो ना ते आपल्या घरासाठीच करतोय. हे घर काय माझे एकट्याचे आहे काय? हे आपल्या सर्वांचे घर आहे. तरी तुम्ही बहिष्कारची भाषा बोलताय, हे शोभत नाही. एक माणूस घर बांधतो म्हणजे काय त्याच्यापुरते बांधतो काय? तो पिढ्यांन्पिढ्यांची सोय करत असतो. उद्या समजा माझे काही बरे वाईट झाले, तर हे घर काय मी सोबत घेऊन जाणार आहे काय? चल चहा टाक.

काही चहा बिहा टाकणार नाही. तुम्ही आणलेल्या दुधावर, साखरेवर, किचन ओट्यावर, स्वयंपाक घरावर माझा बहिष्कार आहे. आम्ही बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे.

माझ्यावर बहिष्कार टाकून काय उपाशी राहणार आहात काय? की काही न करता तसेच बसून राहणार आहात? चला उठा. कामाला लागा. पिंट्या तुझी शाळेत जाण्याची वेळ झाली आहे.

आई म्हणाली, शाळेची फी तुम्ही भरली आहे, त्यामुळे माझा शाळेवर पण बहिष्कार आहे.

अरे, बाबांनो हात जोडून नम्र विनंती करतो की, बहिष्कार टाका, पण स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आणि मी काय कोणी वेगळा आहे का? तुमच्यापैकीच एक आहे ना? हे घर, या घरातील वस्तू, परंपरा या कित्येक शतके राहणार आहेत. त्यामुळे विनंती करतो की, बहिष्कार मागे घ्या आणि गपचूप कामाला लागा. शाबास पिंट्या, घातलास ना शाळेचा ड्रेस? चल निघ. शाळेला चांगले मार्क मिळव आणि पुन्हा म्हणून बहिष्कार वगैरे शब्द उच्चारायचे नाहीत. चला लागा कामाला. अरे बहिष्कार वगैरे शब्द राजकारणामध्ये बरे असतील, पण मी म्हणतो तिथे तरी कशाला बहिष्कार टाकायचा? ज्या कोणत्या वास्तू उभारल्या जात आहेत, त्या देशाच्या वास्तू आहेत ना, की कोणाच्या व्यक्तिगत मालकीच्या आहेत? तसेच आपले घर आहे. घर आपले सगळ्यांचे मिळून आहे, त्यामुळे बहिष्कार वगैरे शब्द उच्चारायचे नाहीत. पटापट प्रत्येकाने कामाला लागा. असे उद्योग करण्यापेक्षा आपले काम भले आणि आपण भले! सध्या ज्या लोकांना काहीच कामच नसते त्यांनाच काहीतरी नसते उद्योग असतात. नकारात्मक विचार करण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीकडे डोळसपणे पाहिल्यास सर्व काही ठिक होते. तर चला मग आपआपली कामे करण्यास निघा! शाब्बास!

– झटका

Back to top button