अमेरिकेतील नद्यांचा टाहो; अमेरिकेतील महाकाय कोलोरॅडो नदी वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न, त्याकडे जगाचे लक्ष | पुढारी

अमेरिकेतील नद्यांचा टाहो; अमेरिकेतील महाकाय कोलोरॅडो नदी वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न, त्याकडे जगाचे लक्ष

जगभरातील जवळपास सर्वच नद्या संकटात सापडल्या आहेत. त्यांना कसे वाचवावे, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अमेरिकेतील महाकाय कोलोरॅडो नदी वाचविण्यासाठी आजघडीला युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून, त्याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील सात राज्यांनी कोलोरॅडो नदीच्या पाण्याचा कमीत कमी वापर कसा करता येईल, यावर एकमताने निर्णय घेतला आहे. या नदीच्या पाण्याचा वापर अमेरिका आणि मेक्सिकोची जनता करते. कमीत कमी चार कोटी नागरिकांची तहान भागविण्याचे काम ‘कोलोरॅडो’ करते. अलीकडच्या काळात पाण्याचा अधिक उपसा होऊ लागल्याने, दुष्काळ आणि हवामान बदलामुळे नदीचे पात्र कोरडे पडत आहे. तज्ज्ञांनी सात राज्यांच्या या योजनेचे स्वागत केले आहे. परंतु, नदी वाचविण्यासाठी कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे. अर्थात, नद्या संकटात सापडल्या असून, त्या वाचविण्यासाठी तातडीने हालचाली करणे अत्यावश्यक आहे. तरीही पर्यावरणप्रेमी तज्ज्ञांना अशा प्रकारचे उपाय तोडकेच वाटू शकतात. ज्या सात राज्यांनी नदीच्या पाण्याचा कमी वापर करण्याचा निर्णय घेतला, ते निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकतील का? असा प्रश्न आहे. तसेच नदीच्या पाण्याचा वापर कमी केल्याने त्याच्या स्थितीत सुधारणा होणार आहे का?

फिनिक्सच्या अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे अर्थतज्ज्ञ कॅथरिन सोरेनसेन यांच्या मते, सात राज्यांनी घेतलेल्या निर्णयाने नदीच्या समस्येत फारसा बदल होणार नाही. 2,300 किलोमीटर लांबीची नदी रॉकी पर्वतरांगातून उगम पावत कॅलिफोर्नियाच्या खाडीत जाऊन मिसळते. पूर्वीपासून या नदीच्या काठावर आदिवासींचे वास्तव्य आहे. नदी कोरडी पडल्याने त्याचा फटका या मंडळींना सर्वाधिक बसू शकतो. अर्थात, धोक्याची घंटा ही पूर्वीपासूनच वाजत होती. परंतु, त्यासाठी ठोस प्रयत्न केले गेले नाहीत. कपात कशात करावी यावरून वाद सुरू होता. कारण, कोणत्या राज्याने किती कपात करावी? यावरून आतापर्यंत एकमत होत नव्हते.

कॅलिफोर्निया, अ‍ॅरिझोना, नेवादासारखी राज्ये पाण्याचा सर्वाधिक वापर करत राहतात; पण आता तिन्ही राज्ये नदीच्या पाण्याचा वापर कमी करण्याबाबत तयार झाली आहेत. कदाचित हा परिणाम शेतीवरदेखील होऊ शकतो. कारण, एका मोठ्या भागातील शेतकर्‍यांना शेतीसाठी पाणी मिळणार नाही. पाणी न वापराबद्दल सरकार त्यांना मोबदला देणार आहे. अशा शेतकर्‍यांसाठी सरकारने 1.2 अब्ज डॉलर बाजूला काढून ठेवले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन दशकांत या नदीत दुष्काळाची स्थिती निर्माण होत आहे. किमान सात उपनद्यांचे पाणी ‘कोलोरॅडो’ला मिळते आणि त्याची स्थिती आता फार काही चांगली नाही. 2000 पासून दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. त्याचवर्षी पाण्याची पातळी सातत्याने कमी दिसून आली. या नदीवर उभारलेल्या धरणांतही पाण्याची पातळी कमी होत आहे. परिणामी, जलविद्युत प्रकल्पासमोरदेखील वीजनिर्मितीचे संकट उभे राहिले आहे. लोक मीड आणि लेक पॉवेल ही दोन्ही धरणे सध्या 30 टक्केच भरलेली आहे. मात्र, 2000 च्या काळात 85 टक्के साठा असायचा. एका अंदाजानुसार नदीच्या वरच्या भागात एक अंश तापमानाची जरी वाढ झाली, तरी त्याच्या प्रवाहात 9.3 टक्के घट होते. अशा रीतीने प्रत्येक नदीचा प्रवाह कमी होत चालला आहे. जगाकडे आपापल्या नद्या वाचविण्यासाठी काही योजना आहेत का? आज गंगा नदी धोक्यात आहे. कावेरीच्या प्रवाहात 40 टक्क्यांंनी घट झाली आहे. जगभरातील दहा मोठ्या नद्यांवर संकट घोंघावत आहे. नदी वाचविण्यासाठी आता जगभरात ठोस उपाय करण्याची वेळ आली आहे.

– विनीता शाह

Back to top button