लवंगी मिरची : ओढ | पुढारी

लवंगी मिरची : ओढ

1977 या वर्षातील भारतातील एका प्रेमवीराची कथा अशात खूप व्हायरल झाली आहे. इंग्लंड येथून आलेल्या एका तरुणीबरोबर त्यांचे प्रेम जुळले आणि त्या दोघांनी लग्न केले. त्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या संसारानंतर त्यांच्या पत्नीला परदेशी जावे लागले. इकडे या गृहस्थांचे शिक्षण सुरू होते. शिक्षण संपल्यानंतर ते पत्नीला भेटण्यासाठी आतुर झालेले होते. परंतु, आर्थिक परिस्थिती कठीण होती. जी काय जमा रक्कम असेल ती एकत्र करून त्यांनी एक सायकल खरेदी केली आणि चक्क पाकिस्तान अफगाणिस्तान, इराण हे देश ओलांडत, ओलांडत युरोपचा प्रवास करत, इंग्लंडला जाऊन आपल्या पत्नीला भेटले. त्यानंतर त्यांनी सुखाचा संसार केला. आज हे दाम्पत्य स्वीडनमध्ये आपल्या दोन मुलांसह वास्तव्य करत आहे.

प्रेम ही अशी भावना आहे की, जी माणसाला काहीही किंवा अशक्य ते करायला लावते. एक निश्चित वेगळ्या प्रकारचे सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती प्रेमामध्ये असते, असे म्हणतात. परंतु, आजकालच्या काळामध्ये प्रेमाचे भलतेच प्रकार पाहायला मिळत आहेत. म्हणजे, चक्क काही लोक लग्न करायचे नाकारत आहेत. जे लोक लग्न करत आहेत ते मुलेबाळे होण्याचे नाकारत आहेत. काही लोक आधी म्हणजे लग्न करण्यापूर्वी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. म्हणजे, जमलं तर जमलं नाही तर वाजलं. गाजराची पुंगी वाजली, तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, अशा प्रकारचा दुहेरी प्रकार सर्वत्र पाहायला मिळतो आहे. तरुणाईला असणार्‍या या प्रकारांचे आकर्षण ज्येष्ठ नागरिकांना समजत नाही आणि वयोवृद्ध लोकांना ते समजणे त्यापेक्षा अवघड आहे.

परंतु, एकंदरीतच प्रेमाचे असंख्य वेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. अगदी ग्रामीण भागात एकतर्फी प्रेम नावाचा एक प्रकार पुढे आला आहे. हा कधी भयावह असे रूप घेतो, असे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण जर हिंदी चित्रपटांची प्रेमाची वाटचाल पाहिली, तर ती फार वेगळ्या पद्धतीची दिसेल. म्हणजे, फार पूर्वी चित्रपटांमध्ये नायक आणि नायिका एकमेकांच्या जवळ आले की, पुढे काय होत असे याचे उत्तर फक्त दोन फुले एकमेकांना भेटतात, असे द़ृश्य पडद्यावर पाहायला मिळत असे. आताची द़ृश्ये कुठून सुरू होतील आणि कुठपर्यंत जातील, याची काही मर्यादा राहिलेली दिसत नाही. मग प्रेमाचे प्रकार चित्रपटातले वेगळे आले, प्रत्यक्ष जीवनातले वेगळे आले, रिल्समध्ये वेगळे आले, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी वेगळेच प्रकार आले. म्हणजे नेमके प्रेम हे काय प्रकरण आहे, हे समजण्याच्या पलीकडे आता परिस्थिती केलेली दिसते.

संबंधित बातम्या

1977 सालच्या प्रेमविराने आपल्या पत्नीसाठी सायकलवर केलेला अर्ध्या जगाचा प्रवास अचंबित करून टाकतो. काय ओढ असेल माणसाची माणसाला, प्रेयसीची प्रियकराला प्रेमिकेची प्रेमिकाला किंवा एकंदरीत ओढ हे काय प्रकरण आहे, हे या घटनेवरून लक्षात येते. ही ओढ नाहीशी होत असून, त्या जागी ओढा ओढ सुरू आहे की, काय म्हणजे रस्सीखेच असा प्रकार जो खेळाचा आहे, तशा प्रकारची रस्सीखेच संसारामध्ये आणि सर्वत्र पाहायला मिळते. ही चढाओढ किंवा ओढा ओढही ओढ नसल्यामुळे होते की काय, असे आजकाल वाटते. आपल्याला काय करायचे? आपण आपले चित्रपट पाहावेत, ओटीपी प्लॅटफॉर्मवरच्या चविष्ट गोष्टी पाहाव्यात, रिल्स पाहावेत काही सेकंदांच्या आणि सोडून द्यावे आणि आपले जगणे सोपे करून घ्यावे एवढेच आपल्या हातात आहे.

– झटका

Back to top button