आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेनेची कसोटी | पुढारी

आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे शिवसेनेची कसोटी

सहकारातील महासंग्रामात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने बाजी मारली असली, तरी त्यांचा हा विजयरथ छत्रपती राजाराम सहकारी कारखान्यात महाडिक गटाने अडविला आहे. त्यामुळे भाजपला दावा करण्यासाठी तरी हा कारखाना मिळाला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील व त्यांचे विधानसभेतील सहकारी आमदार प्रकाश आबिटकर (शिंदे शिवसेना) यांना बिद्री कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सहकारात भाजप व शिंदे शिवसेनेची ताकद किती ते समजणार आहे.

मुळात त्या-त्या नेत्यांकडे सहकारातील सता आहे. हेच नेते पूर्वी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत होते. त्यामुळे त्या सहकारी संस्थाही त्या-त्या पक्षाकडे होत्या. आता हे नेते भाजप किंवा शिंदे शिवसेनेत असल्यामुळे त्या सहकारी संस्थांवर त्या पक्षाची मोहर लागली आहे. छत्रपती शाहू कारखाना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्याकडे आहे. राजाराम कारखाना भाजपचे अमल महाडिक यांच्याकडे आहे. तात्यासाहेब कोरे वारणा कारखाना जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे यांच्याकडे आहे. त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. कल्लाप्पाणा आवाडे कारखान्यावर आवाडे गटाची सत्ता आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा आहे. सदाशिवराव मंडलिक कारखान्यावर संजय मंडलिक यांची सत्ता आहे. ते शिंदे शिवसेनेचे सहयोगी खासदार आहेत. शरद कारखान्यावर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची सत्ता आहे. त्यांचाही शिंदे शिवसेनेला पाठिंबा आहे.

आता दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे असा उघड संघर्ष आहे. मुळात या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात संघर्ष आहे. आता निवडणुकीत त्यांच्यात सामना झडणार की ए. वाय. पाटील थांबणार, यावर बरेच काही अवलंबून आहे. हा संघर्ष झाला, तर तो आपल्या पथ्यावर कसा पाडायचा, यावर चंद्रकांत पाटील व प्रकाश आबिटकर यांचे लक्ष असेल; मात्र या निवडणुकीत खर्‍याअर्थाने भाजप-शिवसेना शिंदे गटाची ताकद दिसणार आहे. सहकारातील निवडणुकीत राजाराम कारखान्याचा अपवाद सोडला, तर महाविकास आघाडीनेच बाजी मारली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे अरुण डोंगळे यांची निवड झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भरत पाटील-भुयेकर या काँग्रेसच्या युवकाला संधी मिळाली आहे. या निवडीतून महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा या आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्याचवेळी सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा सुरू झाल्याने आघाडीच्या नेत्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली आहे.

या सत्तेचा आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होईल. मुळात जिल्हा बँक आणि गोकुळ या जिल्ह्यातील दोन बलाढ्य आर्थिक संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. तेथे चौकशी आणि लेखापरीक्षणातून शिंदे-भाजप सरकारने नियंत्रण वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे; मात्र सध्यातरी हे चौकशीच्या पातळीवर असले, तरी राजकीय गुंतागुंत कायम आहे. गोकुळ आणि जिल्हा बँकेतील सत्तेत विनय कोरे महाविकास आघाडीबरोबर आहेत. राजाराम कारखान्यात कोरे यांनी महाडिक यांना ताकद दिली. या पार्श्वभूमीवर चौकशीचा गुंता निर्माण करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यामुळे सहकारातील हे बलाबल जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारे ठरेल. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे असणार्‍या संस्था आणि त्यांचे प्रमुख यांना महाविकास आघाडीला रोखण्यासाठी कडवा राजकीय संघर्ष करावा लागणार आहे.

– चंद्रशेखर माताडे

Back to top button