

सासू आणि जावई संबंध तसे फार जिव्हाळ्याचे असतात; पण मला एक सांग मित्रा, आता जी बातमी आपण वाचली त्याचा मला धक्काच बसला. बातमीचे शीर्षक होते 'जावयाने फेकले सासूच्या तोंडावर पाणी.' म्हणजे एखाद्या व्यक्तीला राग आला, तर त्याने जवळपास असलेले पाणी उचलून सरळ त्या व्यक्तीच्या अंगावर फेकले, तर समजू शकते, परंतु या बातमीमध्ये पुढे असे लिहिलेले आहे की, सदर जावयाने गरम पाणी फेकले. काय वाटते की, हे काय प्रकरण असेल?
कुटुंब पद्धतीचा विचार केला, तर जावई आणि सासुबाई यांचे खरोखरच फार मधूर नाते असते. याचे कारण म्हणजे सासुबाईचा जीव आपल्या लेकीमध्ये असतो आणि त्या लेकीचे लाड करणारा व्यक्ती म्हणजे जावईच असतो. साहजिकच जावई आपल्या लेकीचे लाड करत असतो. त्यामुळे सासुबाई जावयाचे लाड करत असतात; पण यामध्ये बरेचदा गोंधळ होतो. आजकाल अपत्य संख्या कमी झाल्यामुळे आणि त्यात विशेषतः मुलींना अत्यंत लाडाने वाढवले जात असल्यामुळे लेकीच्या माध्यमातून जावयाच्या संसारावर कंट्रोल ठेवणार्या सासवांची संख्या कमी नाही.
त्या वारंवार मुलीला मार्गदर्शन करत असतात आणि ती मुलगी मग त्या घरामध्ये त्या पद्धतीने कारभार चालवत असते. या गोष्टीचा राग येऊन एखाद्या जावयाने सासूच्या तोंडावर गरम पाणी टाकले, तर आपण इथे जावयाला समजून घेतले पाहिजे. बिचार्याची सहन करण्याची क्षमता संपली असेल आणि रागाच्या भरात त्याने बाजूलाच असलेल्या एखाद्या मगामधून किंवा लहान बादलीमधून रागा रागात ते पाणी सासूच्या चेहर्यावर फेकले असेल, तर कदाचित त्याच्या रागाचा निचरा झाला असता आणि प्रकरण मिटले असते; पण या बातमीमध्ये दिल्याप्रमाणे जावयाने जे पाणी सासूच्या चेहर्यावर फेकले ते दुर्दैवाने गरम पाणी होते आणि गरम पाण्याचा चेहर्यावर चटका बसल्यामुळे सासुबाई मोठ्याने ओरडल्या असतील. मग सहाजिकच रीतीप्रमाणे त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांत फिर्याद दिली.
म्हणजे, याचा अर्थ कायदा सुव्यवस्था राखणे, चोरांना पकडणे, खुनाच्या गुन्ह्याचा तपास लावणे, पळून गेलेल्या गुन्हेगारांना शोधणे, राजकीय नेत्यांचा बंदोबस्त आणि त्यांचा दौरा सांभाळणे, विविध प्रकारच्या धार्मिक जातीय मिरवणुका सुरू असताना बंदोबस्त ठेवणे, भरधाव वाहणार्या वाहतुकीला नियंत्रित करून चुका करणार्या वाहनचालकांना दंड ठोठावणे अशा असंख्य कामांबरोबरच आता पोलिसांना जावई आणि सासूबाई यांच्यातील भांडण मिटवायचे, पण काम करायला लागणार असे दिसते.
ते जाऊदे; पण झाला प्रकार चुकून आपल्याकडून हातून घडून गेला असेल, असे जरी संबंधित जावई बापूंना वाटले तरी पण या ठिकाणी सासुबाईंच्या चेहर्यावर झालेल्या गरम पाण्याच्या जखमा कशा संपणार, कशा भरणार हा प्रश्न राहतोच. शिवाय, आपल्या आईच्या तोंडावर गरम पाणी फेकणार्या नवर्याला समजा माफ करायचे असेल, तर सदरहू विवाहित स्त्रीला फार म्हणजे फारच मोठे मन करावे लागेल.
मला काय म्हणायचे आहे की, वृत्तपत्रांनी ही बातमी दिली, उत्सुकतेपोटी मी समजा ती वाचून संपवली, पण या केसचे पुढे काय झाले याचा पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे. म्हणजे पुढे भांडण मिटले, विकोपास गेले, जावयाला शिक्षा झाली किंवा त्यांनी माफी मागून प्रकरण मिटवले किंवा कौटुंबिक हिंसाचारामध्ये याचा समावेश होतो का? या गोष्टींची शहानिशा पत्रकारांनी करून अशा बातम्यांचा पण पाठलाग केला पाहिजे म्हणजे नेमके कुटुंबकारण आणि समाजकारण कसे चालले आहे, याचा अंदाज लावणे जनतेला सोपे जाईल.
– झटका