नऊ वर्षांचे विकासपर्व

‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र घेऊन पंतप्रधानपदावर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नऊ वर्षे होत असताना जागतिक पातळीवर भारताने मिळवलेली प्रतिष्ठा नजरेत भरल्यावाचून राहत नाही. जगाच्या कानाकोपर्यात भारतीय नागरिकांकडे बघण्याची आधीची द़ृष्टी आणि मोदी सत्तेवर आल्यानंतरची द़ृष्टी यात आमूलाग्र बदल झाल्याचे पदोपदी जाणवते. नरेंद्र मोदी जगातील कोणत्याही देशात, कितीही महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा परिषदेसाठी गेले, तरी अनेक महासत्तांचे प्रमुख अवती-भवती असतानाही सगळ्यांच्या केंद्रस्थानी मोदीच असतात, यावरून त्यांचे आणि भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखित होत असते. आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा मोदींनी अधिक परदेशदौरे केले. त्यांच्या रूपाने सातत्याने जगभराच्या अवकाशात भारताचा डंका वाजतोच आहे. मोदींनी आतापर्यंत सुमारे सत्तर परदेश दौरे केले. त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या अनेक बाबी घडल्यात त्यामध्ये भारताच्या अमेरिकेशी संबंधांमध्ये झालेला बदल लक्षणीय म्हणावा लागेल. अनेक दशके परस्परांकडे संशयाच्या नजरेने पाहणारे भारत आणि अमेरिका हे दोन देश परस्परांचे व्यूहरचनात्मक भागीदार बनले. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अणुकरारापासून सुरू केलेला सिलसिला मोदी यांनी परमोच्च बिंदूवर नेला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे भारत रशियाचा मित्र असल्याची शंका आता अमेरिकेच्या मनात उरलेली नाही. भारत आणि अमेरिकेचे आता सैन्य आणि धोरणात्मक पातळीवर बिगरनाटो देशांमध्ये सर्वाधिक जवळचे संबंध असून, ते निर्माण करण्यात मोदींची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. जागतिक पातळीवरील कोणतेही संबंध आर्थिक पायावर मजबूत बनत असतात आणि त्याद़ृष्टिकोनातून पाहिले, तर आज अमेरिका भारताचा सर्वात मोठा आर्थिक भागीदार बनला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आता 162 अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे. त्यामध्ये वीस ते बावीस अब्ज डॉलरचा फक्त शस्त्रास्त्रांचाच व्यवहार आहे. अमेरिकेसोबत जवळीक वाढत असताना या संबंधांचे रशियासोबत असलेल्या भारताच्या ऐतिहासिक संबंधांवर काहीही परिणाम होत नाहीत, ही गोष्ट मुद्दाम लक्षात घ्यावयास हवी. रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतरच्या परिस्थितीत त्यासंदर्भातील स्पष्टता जगासमोर आली आहे. अमेरिकेशी संबंध असताना दुसरीकडे रशियाशीही तेवढीच घनिष्टता आणि त्याचवेळी युक्रेनशीही मैत्रीचे संबंध अशा अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून कुणाच्याही विश्वासाला तडा न जाऊ देता आव्हानात्मक भूमिका भारताने पार पाडली. आपले परराष्ट्र धोरण आपणच ठरवू, ते कुणाच्याही प्रभावाखाली येणार नाही, हेही भारताने यानिमित्ताने दाखवून दिले. युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करणारे एकटे पंतप्रधान मोदी होते. अमेरिकेसह अनेक देश रशियावर प्रतिबंध लागू करीत असताना पाश्चात्यांच्या नाराजीची फिकीर न करता भारताने रशियाकडून तेल आयातीला मंजुरी दिली होती.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी पावले उचलली. आर्थिक पातळीवर घेललेल्या निर्णयाचे परिणाम समोर येण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे अशा निर्णयांवेळी मोदींना टीकेचे प्रहारही झेलावे लागले. परंतु, त्यांनी त्याची पर्वा न करता देशहित नजरेसमोर ठेवून निर्णय घेतले. भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन बनवण्याचे स्वप्न त्यांच्या काळात पाहिले गेले आणि त्याद़ृष्टीने भारताची दमदारपणे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. कोरोना काळात भारताने घेतलेले निर्णय आणि अत्यंत गंभीर संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली झालेले प्रयत्न जगाने वाखाणले. संपूर्ण देशवासीयांना मोफत लस उपलब्ध करून देण्याबरोबरच जगातील अनेक देशांना लसपुरवठा करून भारत जागतिक पातळीवरील सक्षम नेतृत्व असल्याचे मोदी यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कर्तृत्वाचे मूल्यमापन केवळ जागतिक मापदंडांच्या आधारे न करता देशातील सर्वसामान्य माणसांच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या आधारेही करावे लागेल. त्याद़ृष्टीने विचार करता मोदींनी राबवलेल्या कल्याणकारी योजना महत्त्वाच्या ठरतात. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी घेतलेला पहिला महत्त्वाचा निर्णय म्हणजे जनधन योजना सुरू करण्याचा. सामान्यातील सामान्य माणसांना बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले, त्यामुळे या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या 49 कोटींवर पोहोचली. गरजवंत कुटुंबांची पारंपरिक चूल आणि धुरापासून मुक्तता करणारी उज्ज्वला गॅस योजना ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची योजना असून, या योजनेमुळे त्यांचे नाव दुर्गमातल्या दुर्गम भागातील स्त्रियांपर्यंत पोहोचवले. या योजनेंतर्गत नऊ कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन्सचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना. या योजनेमुळे कोट्यवधी लोकांच्या भूकेचा प्रश्न मिटवून टाकला आहे. कोरोना काळात या योजनेमुळे कोट्यवधी लोकांना जगण्यासाठी आधार दिला. या योजनेतून देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन मिळते. सत्तेवर येण्याच्या आधीपासून मोदींनी शेतकर्यांच्या हितासाठी काम करण्याची ग्वाही दिली होती. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्याच्या या योजनेमुळे लाखो शेतकर्यांच्या गरजेसाठी पैसा हातात मिळाला. याव्यतिरिक्त वैद्यकीय सुविधांसाठीची आयुष्मान भारत योजना, स्वच्छ भारत मिशन, घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारे जलजीवन मिशन अशा कितीतरी योजनांचा उल्लेख करता येईल. ज्या योजनांमुळे सामान्य माणसांचे जगणे बदलून गेले. हे करत असताना जम्मू-काश्मीरसंदर्भातील 370 वे कलम हटवून या वेगळ्या पडलेल्या राज्याला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम सरकारने केले आहे. नऊ वर्षांत मोदींनी केलेल्या कामगिरीमुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारत एका वेगळ्या उंचीवर पोहोचला असून, स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाकडे दमदार वाटचाल करू लागला आहे. नवा बलशाली भारत उभारण्याची ग्वाही या सरकारने आपल्या चमकदार कामगिरीतून दिली आहे.