डंका वाजला, झेंडा रोवला | पुढारी

डंका वाजला, झेंडा रोवला

डंका आणि झेंडा हे दोन शब्द कुठल्याही परीक्षेचा निकाल लागला की, नेहमी ऐकण्यात येतात. मित्रा, यूपीएससीच्या परीक्षेमध्ये यावर्षी देशभरात मुलींनीच आपला डंका वाजवला आहे किंवा झेंडा रोवला आहे, अशी बातमी वाचून माझ्या मनात प्रश्न उभा राहिला की, प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये मुलीच बाजी मारतात मुले का मागे राहत असावीत?

अरे सोपे आहे. बुद्धिमत्ता मुलांना आणि मुलींना देवाने सारखीच दिलेली आहे; पण मुली या जास्त एकाग्रचित्त असतात. त्या सगळ्या सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात, तरी परंतु परीक्षा म्हटलं की, स्पर्धा आली आणि स्पर्धेत जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असेल, तर एकाग्रचित्त असणे.

म्हणजे मुले एकाग्रचित्त नसतात असे म्हणायचे? 60 टक्के मुली स्पर्धा परीक्षा पास होत असतील, तर 40 टक्के मुले होतातच ना? मग त्यांचं चित्त तेवढं एकाग्र नाही, असं कसं म्हणता येईल?

नाही ना यार. तू पहिल्यांदा समजून घे. मुली किंवा महिला जेव्हा एखादी गोष्ट ठरवतात तेव्हा ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नाहीत. मुलांचे तसे नसते. त्यांना अनेक मोह असतात. खास करून टीवल्या बावल्या करणारा मित्रपरिवार असतो. तो मित्रपरिवार अभ्यास करणारा असेलच असे काही नाही. किंबहुना बरेच जण या अभ्यास करणार्‍या मित्राची खिल्ली उडवतात. तो अभ्यास करायला बसला की, ‘हो हो, माहिती आहे, मोठाच कलेक्टर होणार आहेस’ किंवा ‘आले रे आले एस.पी. साहेब आले’ अशा प्रकारचे संवाद म्हणून त्याचे मनोधैर्य कसे ढासळेल, याची पुरेपूर काळजी घेत असतात. मैत्रिणींचे असे काही नसते. जर एखादी मुलगी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल, तर ती त्या विशिष्ट काळामध्ये असा अभ्यास करणार्‍या इतर मुलींसोबतच मैत्री करेल.

मला आणखी अजून एक शक्यता वाटते की, परीक्षेला जाताना मुलींचा कॉन्फिडन्स बहुधा जास्त असावा. याचे कारण मुलींच्या नशिबाला त्यांच्या आयुष्यात दोन वेळा टर्न मिळेल, अशी शक्यता असते. पहिले म्हणजे त्यांच्या करिअरच्या वेळी आणि समजा ते साधले नाही, तर चांगला मुलगा गाठून त्याच्याशी लग्न केले की दुसरा टर्न मिळू शकतो. परंतु, मुलांचे असे नसते. त्यांना जीव जाळून करिअर करावे लागते आणि पुढे करिअर असलेली किंवा नसलेली कन्या शोधून संसाराचा गाडा ओढावा लागतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला जाताना मुली अगदी आरामात आणि भरपूर आत्मविश्वास घेऊन जात असाव्यात आणि त्यामुळेच त्या यशस्वी होत असाव्यात असे माझे मत आहे.

म्हणजे मग हीच परिस्थिती शाळेचा किंवा महाविद्यालयाचा अभ्यास करताना असणार, होय की नाही? तरीपण मला असे वाटते की, मुलींसाठी घरामध्ये एक शिस्त असते. त्या सातच्या आत घरात असतातच आणि मुले संध्याकाळी सात वाजता बाहेर पडतात ती किती वाजता घरी परत येतील याचा नेम तेही सांगू शकत नाहीत. त्यामुळे रात्री बेरात्री न भटकणे, वेळच्यावेळी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे मुलींचे यश डोळ्यात भरण्याजोगे असते, असे मला वाटते.

ते काय असेल ते असो परंतु मुली या मुलांपेक्षा जास्त हुशार असतात असे माझे व्यक्तिगत मत आहे. तू जर घरोघरी पाहशील, तर कमावता पुरुष असेल, कमावते स्त्री-पुरुष दोघे असतील तरीही घराचा कंट्रोल मात्र त्या महिलेकडेच असतो. यावरून मुलींची मॅनेजमेंट ही खूप चांगली आहे, हे पण लक्षात येते. त्यामुळे इथून पुढे सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा दहावी, बारावीच्या निकालांमध्ये मुलीच बाजी मारणार किंवा त्यांचा डंका असणार किंवा मुलीच झेंडा रोवणार यात मला तरी शंका नाही.

-झटका

Back to top button