लवंगी मिरची : आपली वाटचाल कोणत्या दिशेने? | पुढारी

लवंगी मिरची : आपली वाटचाल कोणत्या दिशेने?

काहीही म्हण मित्रा, महाराष्ट्राचा बिहार होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, असे वाटायला लागले आहे.
का रे बाबा? महाराष्ट्र आणि बिहारच्या मध्ये खुप राज्ये लागतात ती सोडून देऊन तू थेट बिहारच्या दिशेने का घेऊन निघालास आपल्या राज्याला?

अरे, कुणीतरी एक नृत्यांगना आहे, म्हणजे लावणीवर डान्स करणारी डान्सर आहे. तिचे जिथे जिथे कार्यक्रम होतात, तिथे तिथे राडा होणार म्हणजे होणार. म्हणजे होते काय की, प्रेक्षक बेभान होऊन तिच्याबरोबर नृत्य करायला लागतात. त्यात ते एकमेकांच्या अंगावर पडतात आणि त्यावरून मग मारामार्‍या होतात आणि नंतर जो प्रकार होतो, त्याला राडा असे म्हणतात. राडा संस्कृती महाराष्ट्राला नवीन नाही. परंतु, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राडे फारसे होत नाहीत. राडा होण्याचे कारण म्हणजे आलेले प्रेक्षक हे उत्तेजित होतात. बरेचदा काहीतरी द्रव पदार्थ पिऊन ते आलेले असतात किंवा त्यांना पण नाचायचे असते आणि त्यातून मग मारामार्‍या होतात, गोंधळ होतो. हे सर्व बिहारच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू असल्याचे लक्षण नाही, तर काय आहे?

मला काय वाटते की, आदिमानवाच्या काळापासून जर आपण विचार केला, तर खूप आनंद झाल्यानंतर पहिल्यांदा माणूस ओरडला असेल आणि त्यानंतर तो नाचला असेल. आपल्या संस्कृतीमध्ये सामान्य माणसाला क्वचितच नाचायला मिळते.

संबंधित बातम्या

लग्न आणि नृत्य यांचाही आता अविभाज्य असा संगम झाला आहे. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दोन्हीकडचे आई-वडील, नवरा, नवरी आणि सगळेच नातेवाईक नाचत असतात. नाचण्याचे स्वतंत्र असे कार्यक्रम ठेवले जातात. त्यामधून बर्‍याच लोकांना रोजगार देणारा कोरिओग्राफी नावाचा एक प्रकार आता झपाट्याने पुढे आला आहे. कोरिओग्राफी म्हणजे विशिष्ट गाण्यावर नृत्याची तालीम करून घेण्याची कला. अक्षरश: हजारो रुपये खर्च करून कोरिओग्राफर लावले जातात आणि लग्नाच्या आदल्या रात्री नाच-गाण्याचे कार्यक्रम केले जातात. त्यात विशेष असे काही नाही. मूळ महाराष्ट्र संस्कृतीमध्ये दोन गोष्टींबाबत फार उत्साह दिसून येतो. एक म्हणजे टाळ आणि दुसरे म्हणजे चाळ.

टाळ म्हणजे पंढरीच्या वारीला जाण्याचा नित्यनेम आणि ज्यांना चाळाचा नाद आहे, म्हणजे जे खरे लोककलांचे आश्रयदाते आहेत, त्यांचीही संख्या महाराष्ट्रात भरपूर आहे. लोककलांचा आश्रयदाता होण्यासाठी आसामी मातब्बर असणे आवश्यक असते. सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यातले ते काम नाही. मग सर्वसामान्य लोक काय करतात, तर असे लावण्याचे जाहीर कार्यक्रम असले की, तिथे गर्दी करतात. उत्साहात नाच करतात आणि ते करताना कुठे ना कुठे राडा होऊन बसतो. विशिष्ट नृत्यांगनांचे नाव इतके गाजलेले आहे की, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला काही ना काही तरी गालबोट लागत असते. त्यामुळे झाले असे आहे की, या नृत्यांगना सेलिबि—टी स्टेटसला पोहोचल्या आहेत आणि त्यांचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि झुंबड हे ठरलेलेच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी शंका कधी-कधी वाटते.

पण तुला एक माहीत नसेल, देशात सर्वात जास्त यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस किंवा आयएफएस, आयपीएस होणार्‍या तरुणांची संख्या बिहारमध्ये सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राचा बिहार व्हायचा असेल, तर तशा पद्धतीने झालेला पाहणे सर्वांनाच खूप आवडेल; अन्यथा नको तिथे आपले नाव होणे हे नाव घालण्याचेच दुसरे नाव आहे, हे निश्चित.

Back to top button