कुरघोडी आणि ‘कात्रजचा घाट’ - पुढारी

कुरघोडी आणि ‘कात्रजचा घाट’

महाराष्ट्राच्या राजकारणात कुरघोडी आणि ‘कात्रजचा घाट’ हे दोन खेळ तुफान लोकप्रिय आहेत. सत्ताधारी आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते स्वतःस या खेळातील अजिंक्य खेळाडू मानतात. कुरघोडी करणे हा काँग्रेसचा आवडता खेळ, तर ‘कात्रजचा घाट’ खेळण्यात राष्ट्रवादीचे जाणते नेते शरद पवार हे माहीर. पवारांनी याआधी कितीतरी जणांना ‘कात्रजचा घाट’ दाखविला. कितीतरी नेते पवारांचे बोट धरूनच या ‘कात्रजच्या घाटा’त गेले आणि एका बोगद्यात गाठून पवारांनी त्यांचे बोट सोडताच ते भरकटले. समोर, मागे अंधार दाटल्याने त्यांना रस्ता सापडला नाही आणि पवारांना ‘कात्रजच्या घाटा’तला कानाकोपरा माहीत असल्याने ते स्वतः मात्र प्रत्येक वेळी सहीसलामत सुटले; पण त्यालाही आता जमाना झाला. शिवाय, मधल्या काळात घाटातही बर्‍याच सुधारणा झाल्याने जुने रस्ते आता बदलले आहेत. पवारांनाच काही कोपरे नवेनवे भासू लागल्याने बर्‍याचदा त्यांचीच कोंडी होऊ लागली आहे.

काँग्रेसचेही तेच झाले आहे. ताकद तोळामासा झाल्याने कुरघोडीच्या स्पर्धेत उतरणे शक्यच होत नसल्याने आता काँग्रेसजन आपापसातच या खेळाची गंमत लुटून आपला जीव रमवत आहेत. प्रतिस्पर्धी तगडा असल्याने प्रत्येक वेळी या खेळात तोंडघशी पडण्याची वेळ येत असल्याने काँग्रेसची टीम आता कच्चा लिंबू ठरली आहे. भाजप नेत्यांनी या दोन्ही खेळांमध्ये आता पुरेसे प्रावीण्य मिळविल्याने त्यांच्यासोबत हे खेळ खेळून तोंडघशी पडण्याची वेळ वारंवार येऊ लागल्याने आता काँग्रेस, राष्ट्रवादी आपापसातच हे खेळ खेळू लागले आहेत. कधीकधी स्वतंत्रपणे, तर कधी दोघे मिळून या दोन्ही खेळांची मजा शिवसेनेस चाखावयास लावतात. सेनेवर कुरघोडी करून वर ‘कात्रजच्या घाटा’ची सफर करवून आणताना महाराष्ट्राच्या जनतेचे मात्र हाल सुरू झाले आहेत. आपण मुख्यमंत्री होऊ हे स्वप्नातदेखील वाटले नव्हते, असे उद्धव ठाकरे अधूनमधून म्हणतात. जगभरातील अनेक विषयांचे ज्ञान त्यांच्यापाशी असल्याचा समज असलेल्या संजय राऊतांनी उद्धव यांना या पदाच्या स्पर्धेसाठी घोड्यावर बसविले खरे; पण आजची सेनेची अवस्था ‘अवघड जागेच्या दुखण्या’सारखी झाली आहे. कुरघोडी आणि ‘कात्रजच्या घाटा’साठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर आहेत.

सध्या महाविद्यालये सुरू करणे, वीजपुरवठ्याचे आव्हान पेलणे, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत, अतिवृष्टी, महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राचा गाडा रुळावर आणणे अशा अनेक संकटांचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर जेवढे प्रश्न महाराष्ट्रसमोर उभे राहिले, त्या सर्वांना स्थगिती देऊन प्रश्न बासनात बांधले. असे झाले की, मुख्यमंत्री हा टीकेचा आणि जनतेच्या नापसंतीचा धनी होतो, हे सत्ता कोळून प्यायलेल्या काँग्रेसला आणि पवारांच्या अनुभवामृताने कोणत्याही परिस्थितीत राजकारणात जिवंत राहणार्‍या राष्ट्रवादीला चांगलेच माहीत असल्याने टीकेचे आणि नाराजीचे धनी उद्धव ठाकरे होत आहेत, हे वास्तव!

महाराष्ट्रात कोळसा नसल्याने वीज टंचाईची भीती दाखवून त्यासाठी केंद्र सरकारवर कुरघोडी करण्याचा खेळ काँग्रेसने करून पाहिला; पण कोळसा उगाळावा तेवढा काळा होतो आणि त्याने आपले हात बरबटतात. काँग्रेसने तर या खेळात केवळ हातच नव्हे, तर तोंडही काळे करून घेतले. कोळशाच्या प्रश्नावरून केंद्रावर कुरघोडी करण्याचा खेळ फसला असून आता या खेळात काँग्रेसचा सपशेल पराभव झाला आहे, तरीही पराभवाचे खापर मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याच माथ्यावर फोडण्याची संधी शोधली जात आहे. मावळच्या गोळीबार प्रकरणामुळे कोंडी झालेल्या राष्ट्रवादीच्या जाणत्या राजाने भाजपला ‘कात्रजचा घाट’ दाखविण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण तोही फसला आणि फडणवीस यांच्या पलटवारात पवारच घाटात फसले. बालेवाडीच्या क्रीडा संकुलात असे खेळ खेळून जागतिक विजेत्याच्या थाटात वावरणार्‍या पवारांना आता तगडा प्रतिस्पर्धी मिळाला आहे. ‘कात्रजचा घाट’ करणे सोपे नाही हे त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून समजून आले असेल. कुरघोडीचा डाव भाजपवर चालत नाही, हे लक्षात आल्यावर काँग्रेसने आता राष्ट्रवादी काँग्रेसवर त्याचे फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. एकूणच जनतेचे प्रश्न वार्‍यावर आहेत. आता हाल विसरून ही राजकीय कुरघोड्यांची गंमत बघण्याची भूमिका जनतेने घ्यावी. म्हणजे, कोरोनामुळे रटाळ झालेल्या जगण्याला थोडासा विरंगुळा तरी मिळेल.

Back to top button