पाकिस्तानचे वस्त्रहरण

गेले काही दिवस सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाने पाकिस्तानला एका नव्या वळणावर नेऊन ठेवले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा राजकीय सामना शाहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्याशी असला, तरी त्यांना ठाऊक आहे की, लष्कर हेच आपले प्रमुख विरोधक आहे. त्यामुळे त्यांनी थेट लष्करालाच आव्हान दिले आहे. लष्कर आणि इम्रान समोरासमोर ठाकले असून, इम्रान समर्थकांनी थेट लष्कराच्या मुख्यालयात घुसून हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा संघर्ष टोकाचा बनला असताना संघर्षाचा फायदा घेऊन इम्रान यांनी लष्करावर एकापाठोपाठ एक गंभीर आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. अर्थात त्यांनी केलेल्या आरोपात नवीन काही नसले आणि ती बाब जगजाहीर असली, तरी त्यासंदर्भात माजी पंतप्रधानांनी बोलावे, हे विशेष!
पाकिस्तानचे लष्कर दहशतवादी पोसण्याचे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते, असा गंभीर आरोप इम्रान यांनी केला आहे. पाकिस्तानचे लष्कर आपल्या छावण्यांमध्ये दहशतवाद्यांना पोसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याची पुष्टी करताना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही दाखला त्यांनी दिला असून, त्यांनीही लष्कराला दहशतवादी तळ बंद करण्यास सांगितल्याचा दावा केला आहे. याचाच अर्थ लष्कराच्या मदतीने हे तळ आणि त्यांच्या भारतविरोधी कारवाया सुरू असल्याची अप्रत्यक्ष कबुली हे माजी पंतप्रधान जाहीरपणे देतात. घरातल्या भांडणांमध्ये अनेक अंतर्गत आणि खासगी बाबी चव्हाट्यावर येत असतात, तसेच तेथे घडू लागले आहे.
पाक लष्कर आणि आयएसआय ही संघटना दहशतवाद्यांना पोसतात, त्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी सहकार्य करतात, हे यापूर्वी अनेकदा आढळून आले आहे. त्याचे पुरावे भारताने न्यायालयीन तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवरूनही मांडले आहेत. परंतु, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी किंवा लष्कराने कधीही या गोष्टी जाहीरपणे मान्य केल्या नाहीत. भारतातील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ‘वाँटेड’ असलेले अनेक आरोपी पाकिस्तानमध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात फिरत असतात, तरीसुद्धा हा देश त्यांचे अस्तित्व मान्य करीत नाही. भारतातील फुटिरतावादी घटकांना आर्थिक सहकार्यापासून सर्व प्रकारची मदत पाककडून केली जात असते आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर जाताना आपण दहशतवादापासून लांब असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यासाठी पाकिस्तानमध्ये होणार्या दहशतवादी हल्ल्यांचे दाखले दिले जातात. आम्हीच दहशतवादाचे बळी आहोत, असे सांगून सहानुभूती मिळवण्याचा आटापिटा केला जातो. प्रत्यक्षात त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये मोठे अंतर असते.
इम्रान यांनी देशाच्या याच कांगावाखोर वृत्तीला जगाच्या चावडीवर उघडे केले त्यांच्या लष्कराचे वस्त्रहरणही केले. थेट माजी पंतप्रधानांनीच आरोप केला असल्यामुळे लष्कर किंवा तेथील राज्यकर्त्यांनाही ते नाकारणे अवघड जाणार आहे. तेथील राजकारणात या आरोपाचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे भविष्यात उत्कंठावर्धक ठरणारे आहे.
इम्रान यांच्या वक्तव्याला महत्त्व अशासाठी आहे की, पाकिस्तान लष्कराकडून दहशतवाद्यांना पोसले तसेच नियंत्रित केले जात असल्याचे तेथील एखाद्या महत्त्वाच्या नेत्याने इतिहासात पहिल्यांदाच मान्य केले आहे. काश्मीर खोर्यातील काही फुटिरतावादी शक्तींना सीमेपलीकडून ताकद पुरवली जाते. त्यांच्या माध्यमातून सतत अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. शिवाय, दहशतवादी घुसवून विध्वंसक कारवायाही केल्या जातात. या कारवायांची मोठी किंमत आजवर भारताने चुकवली.
शेकडो नागरिकांचे प्राण गेले, सीमेवर तैनात अनेक जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. हा दहशतवाद ठेचून काढण्यासाठी भारताकडून कठोर उपाययोजना करण्याबरोबरच जागतिक व्यासपीठावर त्यांना उघडे करण्याचेही प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे इम्रान जे बोलले ती वस्तुस्थिती जगाला ठाऊक होती. परंतु, त्यासंदर्भात बोलण्याचे धाडस पाकिस्तानमधील कुणी नेत्याने आजवर केले नव्हते, ते इम्रान यांनी केले. अर्थात लष्कराशी संबंध बिघडल्यामुळे इम्रान यांची सत्ता गेली आणि ते पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, अशी लष्कराची इच्छा आहे. त्याचमुळे त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचे कारस्थान केले जात आहे. विविध प्रकरणांवरून त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे हा त्याचाच भाग आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये इम्रान यांच्याकडे जनतेचे मोठे समर्थन असल्याचे अलीकडच्या घडामोडींवरून दिसून आले आहे. तेथील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक चुकीची असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना शांततेचे आवाहन करण्यास सांगितले होते. त्यांनी आपल्या वक्तव्याच्या पुष्ट्यर्थ नवाज शरीफ यांचा दाखला दिला.
परवेझ मुशर्रफ लष्कर प्रमुख असताना पंतप्रधान शरीफ यांनी त्यांना दहशतवाद पोसणे थांबवण्यास सांगितल्याचे इम्रान यांचे म्हणणे आहे. वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये नवाज शरीफ, इम्रान खान यांचा हा दावा फेटाळू शकतील. परंतु, त्यामुळे वास्तव बदलणार नाही. भारताने नेहमीच पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते की, तुम्ही तुमचे मित्र निवडू शकता. परंतु, शेजारी निवडणे तुमच्या हाती नसते. वस्तुस्थिती स्वीकारून सौहार्दाने पुढे जाण्याची भूमिका त्यांनी त्यातून मांडली होती. शत्रूराष्ट्राच्या भूमिकेत असलेल्या पाकिस्तानशीही संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते. शेजारी देशांशी असलेल्या संबंधांचा इतिहास भारतासाठी फारसा उत्साहवर्धक नसला, तरी या संबंधांमध्ये वाजपेयींच्या प्रयत्नांमुळे एक नवी वाट निर्माण होऊ शकली.
डॉ. मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी यांनीही तीच वाट पुढे अधिक विस्तारित करण्याचे प्रयत्न केले. परंतु, दहशतवाद पोसण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेमुळे त्यात सातत्याने अडथळे येत गेले आहेत. पाकचे लष्कर आणि राज्यकर्त्यांचा बुरखा खुद्द तेथील माजी पंतप्रधानानेच फाडला. भारताची आंतरराष्ट्रीय पटलावरील भूमिका आणखी ठोस बनली आहे.