पाणी वापराचा ताळेबंद | पुढारी

पाणी वापराचा ताळेबंद

एकविसाव्या शतकाच्या मध्यावधीत अथवा उत्तरार्धात पाणी प्रश्नावरून संघर्ष उफाळून येतील, अशी भाकिते अनेक जाणकारांकडून केली जाताहेत. पाणी प्रश्न हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असूनही पाणीवापराबाबत नागरिकांमध्ये सजगता दिसून येत नाही. आपण प्रत्यक्षरीत्या जेवढ्या पाण्याचा वापर करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात आपण पाण्याचा अप्रत्यक्ष वापर करीत असतो. अनेक वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी हजारो-लाखो लिटर पाणी खर्ची पडलेले असते. त्याचा आपण कधीच हिशेब करीत नाही. अनेक देशांनी आगामी पाणीटंचाईचे सावट ओळखून जास्त पाण्याचा वापर होणार्‍या वस्तू आणि अन्नधान्ये अन्य देशांमधून आयात करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात काय परिस्थिती आहे? एक अस्वस्थ करणारा आढावा…

उन्हाळा, पाणीटंचाई, चर्चा, सूचना… आणि मग पावसाळा! कोणतेही नियोजन नाही. पीक पद्धतींमध्ये बदल नाहीत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाय नाहीत. पाणी अडवून ते मुरवण्यासाठी होणारे तुटपुंजे प्रयत्न… पावसाळा संपतो आणि पुन्हा पाण्याची टंचाई वाढू लागते. निसर्गचक्र बदलले, तरी बेजबाबदारपणाचे हे चक्र मात्र सुरूच आहे. परंतु, लोकसंख्येबरोबर आणि पाणी वापरातील बदलांमुळे आपण केवढ्या मोठ्या संकटाकडे निघालो आहोत, याचा अंदाज जरी घेतला, तरी भीतीने कंप सुटेल. गेल्या सात दशकांचा विचार केल्यास 1951 मध्ये आपल्या देशात प्रतिव्यक्ती 14 हजार 180 लिटर पाणी उपलब्ध होते. आजमितीस प्रतिव्यक्ती केवळ 5 हजार 120 लिटर पाणी उपलब्ध आहे. 2015 पर्यंत प्रतिमाणशी पाण्याची उपलब्धता आणखी कमी होऊन केवळ 3 हजार लिटर पाणीच एका व्यक्तीला मिळू शकेल. सध्याच आपण पाण्याचे योग्य वाटप करू शकत नाही. असमतोल पाणीवाटपामुळे अनेक ठिकाणी घसे कोरडे आहेत, तर अनेक ठिकाणी पाण्याची बेसुमार उधळपट्टी चालली आहे. अशा तर्‍हेने 2025 पर्यंत प्रवास केल्यानंतर आपले काय होईल, हा प्रश्न प्रत्येकाने गंभीरपणे स्वतःला विचारायला हवा. जगभरात कार्बनचा वापर किती प्रमाणात होतो, याची आकडेवारी ‘कार्बन फूटप्रिंट’वरून मिळू शकते. त्याच धर्तीवर मानवी हस्तक्षेपामुळे कुठे पाण्याचा किती वापर होतो, हे जाणून घेण्यासाठी आजकाल एका खास प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीचे नाव आहे, ‘वॉटर फूटप्रिंट.’ आपण कोणत्या कारणास्तव किती पाणी वापरतो, याचे उत्तर ही प्रणाली आपल्याला देते.

सर्वात आधी आपल्याला दखल घेतली पाहिजे, ती बाटलीबंद पाण्याची. गेल्या वीस वर्षांत भारतात बाटलीबंद पाण्याच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. हा व्यवसाय करणार्‍यांची प्रचंड भरभराट झाली आहे. ही भरभराट थक्क करणारी आहे. कारण, या व्यवसायात नफ्याचे प्रमाण गुंतवणुकीच्या अनेकपट आहे. एक लिटर बाटलीबंद पाणी जेव्हा आपण विकत घेतो, तेव्हा ते कोणत्या दराने घेतो आणि त्यासाठी किती लिटर पाणी वाया घालवतो, हे माहीत आहे? यासंदर्भातल्या आकडेवारीवर कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु, हे एक अत्यंत कडवे सत्य आहे. हे सत्यच आपल्याला दिवसेंदिवस पाण्याच्या भीषण टंचाईकडे घेऊन चालले आहे. हे सत्य म्हणजे एक लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी सुमारे पाच लिटर पाणी खर्ची पडते. एका आकडेवारीनुसार, जगभरात 2004 मध्ये 154 अब्ज लिटर बाटलीबंद पाणी तयार करण्यासाठी 770 अब्ज लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. याच प्रक्रियेसाठी भारतात 25.5 अब्ज लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. बाटलीबंद पाणी आणि शीतपेये बनवणार्‍या कंपन्यांविरुद्ध वाराणसीपासून केरळपर्यंत ग्रामस्थ आंदोलने करीत आहेत, ती अकारण नाहीत. कॅलिफोर्निया येथील पॅसिफिक इन्स्टिट्यूटचे म्हणणे असे आहे की, 2004 मध्ये अमेरिकेत 26 अब्ज लिटर बाटलीबंद पाणी विकण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यात आल्या, त्यासाठी दोन कोटी बॅरल तेलाचा वापर झाला. प्लास्टिकपासून तयार केलेल्या बाटल्याही पाणी प्रदूषित करीत आहेत आणि जागतिक तापमानवाढीचे एक मोठे कारण बनल्या आहेत.

पाण्याच्या उधळपट्टीचा शोध आपल्याला शेतशिवारातही घ्यावा लागेल. यासंदर्भातली आकडेवारी जितकी रोचक, तितकीच भयावह आहे. शेती हे असे क्षेत्र आहे, जिथे एकूण उपलब्ध पाण्याच्या 90 टक्के हिस्सा वापरला जातो. घरगुती वापरासाठी पाण्याचा केवळ पाच टक्के भाग खर्च होतो. भारतात एक किलो गव्हाचे पीक घेण्यासाठी 1,700 लिटर पाणी खर्च केले जाते. म्हणजेच आपल्या घरात जर आपण दिवसाकाठी एक किलो गव्हाचे पदार्थ सेवन करीत असू, तर आपण 1,700 लिटर पाणी अप्रत्यक्षरीत्या वापरतो. एवढेच नव्हे, तर आपण जी जीन्स पॅन्ट वापरतो, ती बनविण्यासाठीही हजारो लिटर पाण्याची गरज असते. इजिप्त हा देश गव्हाची आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. चीनसुद्धा अन्नधान्यांची मोठ्या प्रमाणावर आयात करतो.

आपल्या देशात यासंदर्भात काय चालले आहे? काही उदाहरणांवरूनच आपल्याला याचा अंदाज येऊ शकेल. भारताने सुमारे 30 लाखांहून अधिक टन बासमती तांदळाची निर्यात केली. हा तांदूळ पिकविण्यासाठी भारतात 10 दशअब्ज लिटर पाणी खर्च झाले. दुसर्‍या शब्दांत आपण असे म्हणू शकतो की, 37 लाख टन बासमती तांदळाबरोबरच भारताने 10 दशअब्ज लिटर पाणीही अन्य देशांमध्ये पाठवले. किंमत मात्र केवळ तांदळाचीच मिळाली; पाण्याची नाही. उलटपक्षी आपल्याकडून बासमती तांदूळ घेणार्‍या देशांना 37 लाख टन तांदळासोबत 10 दशअब्ज लिटर पाणी फुकट मिळाले किंवा त्या देशांमध्ये पाण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर बचत झाली. भारत अनेक वर्षांपासून तांदूळ निर्यात करून त्यासोबत पाण्याचीही अशाप्रकारे अप्रत्यक्ष निर्यात करतो आहे.

या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण ‘वॉटर फूटप्रिंट’चा विचार करतो, तेव्हा पहिला प्रश्न येतो की, अखेर ‘वॉटर फूटप्रिंट’ म्हणजे नेमके काय? आपल्या दररोजच्या अनेक उत्पादनांसाठी पाण्याचा वापर झालेला असतो. हा पाण्याचा अप्रत्यक्ष वापर होय. उदाहरणार्थ, एक कप कॉफीसाठी पाण्याचा आभासी वापर 140 लिटरपर्यंत होतो. आपली ‘वॉटर फूटप्रिंट’ केवळ आपण प्रत्यक्षपणे वापरलेले पाणीच दर्शवित नाही, तर आपण अप्रत्यक्षपणे वापर केलेल्या पाण्याचे प्रमाणही दर्शवितो. प्रत्यक्षपणे पाणी आपण पिण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी वापरतो. परंतु, दररोजच्या जीवनात आपण अप्रत्यक्षपणे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतो. या सर्व पाण्याची गोळाबेरीज म्हणजे आपली ‘वॉटर फूटप्रिंट’ होय.

‘वॉटर फूटप्रिंट’चा संबंध ताज्या पाण्यातील मानवी हस्तक्षेप आणि मानवी वापराशी आहे. ‘फूटप्रिंट’च्या माध्यमातून पाणीटंचाई आणि प्रदूषणासारखे मुद्दे समजून घेता येतात. अनेक देशांनी आपली ‘वॉटर फूटप्रिंट’ कमी करण्यासाठी अधिक पाण्याचा वापर होणार्‍या वस्तू अन्य देशांमधून मागविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आपली ‘वॉटर फूटप्रिंट’ काय सांगते आणि ती कमी करता येईल का, याचा गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ नव्हे का?

– रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

Back to top button