Mobile addiction : ज्येष्ठांचे नवे व्यसन | पुढारी

Mobile addiction : ज्येष्ठांचे नवे व्यसन

मला एक सांग मित्रा, हे मोबाईलचे व्यसन (Mobile addiction)आपल्या भारतात आणि राज्यात सर्वत्र फार झपाट्याने पसरताना दिसत आहे. नेमके याचे प्रमाण कोणत्या वयोगटात जास्त आहे, याची काही तुला माहिती आहे का?

निश्चित अशी काही माहिती नाही. परंतु, मी असे पाहतो की, ज्येष्ठ नागरिक हे जवळपास झोपेची वेळ सोडून इतर वेळी सतत मोबाईल पाहत असतात. नेमकी आकडेवारी जपानची उपलब्ध आहे. तिथे 30 टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात आणि ते जवळपास सर्वजणांचे मोबाईल हे व्यसन (Mobile addiction) झालेले आहे. आपल्याकडे पण आपण पाहतो की, ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिक फारसे मोबाईल पाहत नाहीत. परंतु, शहरी भागामध्ये काही ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरायला जाण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईलवर काही ना काही पाहत असतात. म्हणजे एक प्रकारचे व्यसनच त्यांना लागलेले आहे आणि ते साहजिक पण आहे. विशेष असे काही काम नसते, कुठे जायचं नसते कुणी यायचे नसते. त्यामुळे एकमेव करमणूक म्हणजे मोबाईल. त्यांच्या तरुणपणी नसलेल्या अनेक गोष्टी त्यांना आता या उतार वयात मोबाईलवर दिसत असतील, तर त्याचे आकर्षण वाटणे साहजिकच आहे.

आकर्षण असू दे रे; पण चक्क रस्ता ओलांडताना पण मोबाईल पाहत-पाहत रस्ता ओलांडतात हा म्हणजे कहरच आहे. ज्येष्ठ नागरिक काय पाहत असतील मोबाईलमध्ये असे तुला वाटते? (Mobile addiction)

रिल्स नावाचा जो भन्नाट प्रकार आलेला आहे, तो फार मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक (Mobile addiction) पाहत असतात. हे बहुतांश रिल्स तरुण-तरुणींनी बनवलेले असतात, ते पण अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये अंग प्रदर्शन करणारे असतात. बहुतांश वेळेला या काही सेकंदांच्या रिल्समध्ये तुफान कॉमेडी ठासून भरलेली असते. हसायला कुणाला आवडत नाही? छोटीशी रिल ज्येष्ठ नागरिक असो की, तरुण असो सर्वांना सुखावून जाते, म्हणून अशा रिल्स पाहण्याचे प्रमाण जास्त आहे.

शिवाय, ज्येष्ठ नागरिकांना विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये सामावून घेतलेले असते. या सर्व ग्रुपमध्ये आपल्या तरुणपणीचे फोटो प्रचंड मोठ्या संख्येने टाकून हे लोक त्या ग्रुपच्या सदस्यांना अक्षरशः वात आणतात. बरेचसे ज्येष्ठ नागरिक सकाळी उठल्याबरोबर ब्रॉडकास्टच्या माध्यमातून किमान दीड दोनशे लोकांना शुभप्रभातपासून ते पुढे दुपारी शुभदुपार, संध्याकाळी शुभसंध्याकाळ आणि झोपण्याच्या आधी शुभरात्र करून मगच झोपी जातात. त्यांनी दिलेल्या या शुभेच्छांमुळे ज्यांना या शुभेच्छा मिळतात ते दिवसभर वैतागले असतात; पण ज्येष्ठ नागरिकांना याची खबर नसते. (Mobile addiction)

आपण किती काळाबरोबर किंवा काळाच्या पुढे आहोत किंवा थोडक्यात म्हणजे किती अपडेट आहोत, या धुंदीत ते मग्न असतात. शिवाय, पूर्वीच्या काळी वयोवृद्ध लोक हातात माळ घेऊन देवाच्या नावाचा जप करायचे. त्याऐवजी आताचे नव वयोवृद्ध नागरिक नेमाने देवाचे फोटो इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे टाकत असतात. सोमवारी महादेवाचा, एकादशीला पांडुरंगाचा, चतुर्थीला गणपतीचा, शनिवारी मारुतीचा, शुक्रवारी देवीचा असे फोटो इकडचे तिकडे पाठवून ते फार मोठ्या प्रमाणात भक्ती करत असतात. वेळ भरपूर असल्यामुळे सकाळी उठल्याबरोबर कॅलेंडर पाहून आज कोणती तिथी आहे, कोणता वार आहे ते पाहायचे आणि त्याप्रमाणे त्या-त्या देवतेचे फोटो विविध ग्रुपमध्ये पाठवून सर्वांना दर्शन घडवून आणायचे हा नवीन वयोवृद्ध नागरिकांनी जोपासलेला भक्तिमार्ग (Mobile addiction) आहे, असे म्हणावे लागेल.

– झटका

Back to top button