

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाने महाविकास आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर 'मविआ'मध्ये वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डावपेच सुरू केल्याचे दिसत आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले. गेल्या तीन दशकांत प्रथमच एवढे मोठे संख्याबळ काँग्रेसला मिळाले आहे. या विजयामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण आहे आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांवरही झाला आहे. सत्ता गेल्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून सतत बॅकफूटवर असलेल्या महाविकास आघाडीला आता बळ आल्याचे दिसत असून निकाल जाहीर होताच, 'मविआ'ने तत्काळ बैठक घेत थेट लोकसभा जागावाटपाची खलबते केली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली अणि आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शरद पवार यांनीच आघाडीची सारी सूत्रे आपल्या हाती खेचून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नजीकच्या काळात शरद पवार महाविकास आघाडीच हायजॅक करणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
साठ वर्षांहून अधिक काळ राजकारणावर घट्ट पकड ठेवून राहिलेल्या शरद पवार यांना आगामी घटनांचा अचूक अंदाज येतो, असे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे कर्नाटकातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याची अटकळ त्यांनी आधीच बांधली असणार, यात काही आश्चर्य नाही. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात बाजी कोण मारणार, याचीही खूणगाठ त्यांनी पक्की बांधली असणारच. याबाबत त्यांच्या 'सोर्स'नी त्यांना खात्रीलायक माहिती पुरवली असणार, यातही शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे एका बाजूने अदानी उद्योगावर स्तुतिसुमने उधळीत असताना त्यांचे पुतणे काकांची री ओढीत पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करीत होते तेव्हा शरद पवार यांनी सारे पर्याय खुले ठेवले होते. अदानी भलावणीच्या आपल्या विधानातून त्यांनी पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखवण्याचा आपला हातखंडा यशस्वी प्रयोग सादर केला.
राजकारण कोणत्या वळणावर जाणार, हे लक्षात येताच शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची आकस्मिक घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंपच झाला. त्याआधी 'भाकरी फिरवावी लागेल', असे ते म्हणाले होते; पण त्यांनी चूलच फिरविण्याचा घाट घातला, तेव्हा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नेते, कार्यकर्ते हवालदिल झाले. मग, सार्यांच्या आग्रहाला मान देत त्यांनी यू टर्न घेत राजीनामा मागे घेतला. पक्षावरची आपली पकड वज्रलेप आहे, याची हलवून खुंटा बळकट करीत त्यांनी खात्री करून घेतली. आगामी व्यूहरचनेच्या द़ृष्टीनेच त्यांनी हे पाऊल टाकले असावे, असे म्हणायला जागा आहे.
कर्नाटकच्या निकालानंतर 2024 मध्ये देशातील चित्र वेगळे असेल, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली होती. तो हिशेब पक्का धरून शरद पवारांनी निकालाची बातमी ताजी आहे, तोच महाविकास आघाडीची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीला तब्बल वर्षभर तरी अवकाश असतानाच लोकसभा जागा वाटपाची खलबतेही सुरू केली. पवारांनी आता 'मविआ'वर पक्की मांड घेतल्याचे दिसत आहे, तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सायडिंगला पडल्याचे चित्र पुढे आले आहे.
2019 ची लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र लढवली होती. भाजपला 25 आणि शिवसेनेला 23 असे जागा वाटप होते. भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. भाजपची मताची टक्केवारी 27.84 टक्के, तर शिवसेनेची 23.5 टक्के होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अनुक्रमे 25 आणि 19 असे जागावाटप करून लोकसभेची एकत्रित निवडणूक लढवली. राष्ट्रवादीला 4 जागा आणि 15.66 टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला एकमेव जागा आणि 16.41 टक्के मते मिळाली.
विधानसभा निवडणुकीवेळी भाजप 152 आणि शिवसेना 124 जागांवर एकत्र लढले. इतर जागा मित्र पक्षांना देण्यात आल्या. भाजपला 105 जागा आणि 25.75 टक्के मते प्राप्त झाली. शिवसेनेला 58 जागा आणि 16.41 टक्के मते मिळाली. काँग्रेसने 147 जागा आणि राष्ट्रवादीने 121 जागा एकत्र येऊन लढवल्या. राष्ट्रवादीला 54 जागा आणि 16.71 टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला 44 जागा आणि 15.87 टक्के मते मिळाली.
आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित लढणार, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी एकत्र मैदानात उतरणार, हे स्पष्ट आहे. कर्नाटकात भाजपला फटका बसला, त्याचा महाराष्ट्रातही परिणाम होईल, हे गृहीत धरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी जागा वाटपावर आपला वरचष्मा राहावा, यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी चालवल्याची चर्चा आहे. त्याद़ृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू झाल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांची अद्याप काही हालचाल नाही. ठाकरे गटाची ताकद तुलनेने कमी झाल्याचे कारण पुढे करीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा वाटपात कुरघोडी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील निकालाने महाराष्ट्रातही काँग्रेसचा मतांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात धरून वाढीव मतांचा लाभ घ्यायचा, असाही राष्ट्रवादी काँग्रेसचा मनसुबा असू शकतो. येनकेन प्रकारेन लोकसभेत राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढले, तर राष्ट्रीय राजकारणात पवार यांचे वजन वाढू शकते, असे यामागचे धोरण असू शकते. विधानसभा निवडणुकीत आघाडीतील सर्वात मोठा पक्ष व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकद पणाला लावील. आघाडीला बहुमत मिळाले, तर आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, याच द़ृष्टीने शरद पवार यांची पावले असतील.
महाविकास आघाडीवर आपला वरचष्मा निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी आतापासूनच डावपेच चालवले आहेत. यदाकदाचित वेगळेच चित्र झाले, तर त्यांचा प्लॅन बी तयारच असेल, यात शंका नाही.
सुरेश पवार