दूरगामी परिणाम घडवणारा निकाल | पुढारी

दूरगामी परिणाम घडवणारा निकाल

विधानसभा निवडणुकीत कर्नाटकातील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात दणदणीत बहुमत टाकले. कर्नाटकातील विधानसभा निकालांचे परिणाम केवळ दक्षिण भारतातील या एका राज्यापुरते मर्यादित राहणार नाहीत. याचे परिणाम यानंतर यावर्षी देशात इतर राज्यांत होत असलेल्या विधानसभा आणि पुढच्या वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर होतील.

गेली काही वर्षे काँग्रेसमध्ये खूपच खराब वातावरण निर्माण झालेले होते. लोकशाही शासनव्यवस्थेत सुद़ृढ विरोधी पक्षाची नितांत गरज असते. भारतीय मतदार ज्यावेळी अस्वस्थ होतो त्यावेळी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतो, हे आतापर्यंतचे चित्र आहे, असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. शिवाय अनेक मतदानोत्तर चाचण्यांनी काँग्रसेच्या विजयाचे आणि भाजपच्या पराभवाचे भाकित केले होते.

मोदी-शहांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजपच्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक छोटी-मोठी निवडणूक जीवाच्या कराराने लढवायची असते. त्यानुसार भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवली होती. 6 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे 40 किलोमीटर लांब रोड शो केला होता. भाजपने सर्व प्रकारे आणि सर्व पातळ्यांवर ही निवडणूक जिंकण्याचे आटोकाट प्रयत्न केले होते.

संबंधित बातम्या

एक राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपच्या द़ृष्टीने कर्नाटक हे फार महत्त्वाचे राज्य आहे. 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे 85 खासदार निवडून आले होते. तेव्हापासून हा पक्ष देशाच्या आणि भारतीय संघराज्याच्या अनेक राज्यांत महत्त्वाचा पक्ष म्हणून पुढे आला. त्यानंतर 1998 ते 2004 अशी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि 2014 ते आतापर्यंत भाजपने स्वबळावर केंद्रात मिळवलेली सत्ता असा या पक्षाचा आजवरचा प्रवास आहे; मात्र या पक्षाच्या यशाचे विश्लेषण केले, तर असे दिसून येते की, या पक्षाची राजकीय शक्ती उत्तर भारत, पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील काही राज्यांपुरती मर्यादित आहे. भाजपच्या व्यापक राजकारणाच्या द़ृष्टीने दक्षिण भारतातील कर्नाटक हे राज्य महत्त्वाचे आहे.

1980 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या भाजपची कर्नाटकात सुरुवात 1983 मध्ये झाली. यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजपने 18 जागांसह 8 टक्के मते मिळवली. यातील बरेचसे यश पश्चिम किनारपट्टी भागात मिळवलेले होते. नंतरचा टप्पा म्हणजे 1990 च्या दशकात भाजपने पुढे आणलेले आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण. याचा परिणाम कर्नाटकातील शहरी भागात जाणवला. परिणामी, 1994 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 40 आमदार निवडून आले, तर काँगे्रसचे फक्त 34. त्या निवडणुकीत जनता दलाने 115 जागा जिंकल्या होत्या. दक्षिण भारतातील एका राज्यात पाय रोवण्याची भाजपची रणनीती यशस्वी ठरत होती. आता झालेल्या विधानसभा निवडणुकांनी या रणनीतीला हादरा बसला आहे.

काही अभ्यासकांच्या मते भाजपच्या पराभवाची काही कारणे दिसतात. एक म्हणजे काँगे्रसने भाजप सरकारच्या गैरकारभाराच्या विरोधात जबरदस्त प्रचार केला होता. यातही सर्व सरकारी कंत्राटांत चाळीस टक्के कमिशन द्यावे लागते, असा आरोप कंत्राटदार संघटनेचे प्रमुख श्री. डी. केमपन्ना यांनी मागच्या वर्षी केला होता. दुसरे म्हणजे बोम्मई सरकारने अलीकडेच मुस्लिम समाजाला असलेले चार टक्के आरक्षण रद्द केले. लिंगायत आणि व्होकलिगा समाजाला खूश करण्यासाठी हे चार टक्के आरक्षण प्रत्येकी दोन टक्के असे वाटून टाकले होते. जोडीला हिजाब आणि हलाल मांस वगैरे मुद्देसुद्धा मतदारांसमोर होते.

यामुळे अल्पसंंख्याक मतदार नाराज झाला. तिसरे म्हणजे आकाशाला भिडलेली महागाई. भाजपच्या सरकारने स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरचे भाव वाढवले. चौथें महत्त्वाचे कारण म्हणजे या खेपेस भाजपला अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची टिम उपलब्ध नव्हती. तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधींची 3 हजार 570 किलोमीटरची भारत जोडो यात्रा. सप्टेंबर 2022 मध्ये तब्बल 21 दिवस या राज्यातून ही पदयात्रा गेली. या यात्रेचे ठिकठिकाणी जे उत्स्फूर्त स्वागत होत होते, तेव्हाच मतदारांच्या मनात काही तरी वेगळे शिजत आहे, याचा अंदाज आला होता.

भारतीय संघराज्यात कर्नाटक हे राज्य स्वतःचे राजकीय वेगळेपण टिकवून आहे. मार्च 1977 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींसह काँगे्रस पक्ष निवडणूक हरला. त्यानंतर इंदिराजींनी कर्नाटकातील चिकमंगलूर लोकसभा मतदारसंघातून नोव्हेंबर 1978 मध्ये पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली आणि सुमारे 80 हजार मतांनी जिंकली. ताज्या निकालांचा परिणाम देशातील इतर राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांत दिसून येईल. ही निवडणूक एका प्रकारे काँगे्रसला आणि भाजपलासुद्धा संकेत देणारी आहे. यापुढच्या निवडणूका कशा आणि कोणत्या मुद्द्यांवर लढवल्या पाहिजे, हे काँगे्रसला आणि भाजपला शिकवले आहे.

– प्रा. अविनाश कोल्हे

Back to top button