काेकण वार्तापत्र : जलवाहतुकीचा नवा आरंभ | पुढारी

काेकण वार्तापत्र : जलवाहतुकीचा नवा आरंभ

भाऊचा धक्का येथून जलप्रवासाची सुरुवात झाली, त्याला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई -गोवा जलवाहतूक बंद झाली, त्याला 50 वर्षांचा काळ लोटला आहे; मात्र या टप्प्यावर पुन्हा सागरमाला प्रकल्पांतर्गत जलप्रवासाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर नियमित सेवेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आता सुरू असलेली मुंबई ते मांडवा ही जलवाहतूक टप्प्याटप्प्याने वाढत जाईल.

अलिबागच्या रो-रो सेवेमुळे पर्यटनात मोठी वाढ झालेली आहे. ही सेवा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांपर्यत आता विस्तारित होणार आहे. 100 वर्षांपूर्वी जलवाहतूकीला मोठे महत्त्व होते. बि—टिश काळापर्यंत कोकणातील देवगड, वेंगुर्ले, मालवण, रत्नागिरी, जयगड, हर्णे, दिघी ही बंदरे प्रवासी वाहतुकीने गजबजलेली होती. 17 जुलै 1947 ला कोकणात जाणार्‍या रामदास बोटीला अपघात होऊन 700 माणसे दगावली. त्यानंतर या जलवाहतुकीला घरघर लागली. जलवाहतुकीची उणीव ही कोकणवासीयांना सतत जाणवणारी गोष्ट आहे. आता रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे रस्त्यांचा प्रवास वेळखाऊ झाला आहे.

आता या वेळखाऊ प्रवासावर उपाय म्हणून जलवाहतुकीचे नवे मार्ग विकसित केले जात आहेत. मुंबईपासून सिंधुदुर्ग आणि पुढे गोव्यापर्यंत आता जलवाहतूक सुरू होणार आहे. या जलवाहतुकीचा मार्ग हा मुंबई, भाऊचा धक्का ते आगरदांडा, दिघी, बागमांडला, वेशवी, दाभोळ, धोपवे, जयगड, तवसाळ, रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले इथपर्यंत विस्तारित होईल. या मार्गांवर काही ठिकाणी रो-रो सेवा सुरू झाल्या आहेत, तर काही ठिकाणी सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. एका बाजूला मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील दळणवळणाचा प्रमुख महामार्ग गेली 16 वर्षे रखडलेला आहे. यात सागरी ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा होऊन दोन वर्षे झाली, असली तरी कामाचा प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी महामार्गांचे स्वप्न हे अधुरेच आहे. अशावेळी जलवाहतूक सुरू झाली, तर कोकणच्या पर्यटनाला नवा आयाम मिळू शकतो. सध्या कोकणात गेट वे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का येथून मांडवा, उरण, नवी मुंबई या ठिकाणी जलवाहतूक सुरू झाली आहे. पुढचा टप्पा मुंबई ते आगरदांडा ते दिघी असा असणार आहे. याशिवाय आगरदांडा ते दिघी, बागमांडला ते वेशवी, दाभोळ ते धोपवे, जयगड ते तवसाळ या मार्गांवर जंगलजेट्टी सुरू करण्यात आल्या आहेत. यातून गाड्या या किनार्‍यावरुन दुसर्‍या किनार्‍यावर नेता येतात. आता भाऊचा धक्का ते मांडवा ही रो-रो सेवा बारमाही सुरू झाली आहे. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा ही जलवाहतूक आठ महिने चालते. पावसाळ्यात ही जलवाहतूक बंद असते. मुंबई ते अलिबाग या जलवाहतुकीच्या मार्गावर दरवर्षी 15 लाख प्रवासी प्रवास करतात. ही संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. यामधून सुमारे 30 कोटींची आर्थिक उलाढाल होत आहे. आता जलवाहतूक मार्ग हे पुढील दिवाळीपासून सुरू होणार आहेत. यातून पर्यटनाला मोठी गती मिळू शकते.

रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासातील माईलस्टोन म्हणून उल्लेख केल्या जाणार्‍या भाऊचा धक्का ते काशीद-दिघीपर्यंतच्या रो-रो सेवा प्रकल्प आता द़ृष्टिपथात येऊ लागला आहे. 260 पर्यटक आणि 20 गाड्या घेऊन तीन तासांत पर्यटक आणि प्रवासी मुंबईतून मुरूड जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन येथे पोहोचू शकतील. अतिशय आलिशान आणि आरामदायी सागरी प्रवास करून कोकणात येणे शक्य होणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीच्या बोटीच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. भाऊचा धक्का ते काशीद आणि त्यानंतर दिघीपर्यंत ही बोट प्रवास करेल. पाच ते सहा तासांचे अंतर या बोटीतून सागरी पर्यटनाचा आनंद घेत करता येईल. बोटीच्या कामाबरोबरच काशीद येथील जेटीचेही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न मेरीटाईम बोर्डाचा आहे. मूळचे श्रीवर्धन येथील गौतम प्रधान ही बोट सेवा सुरू करीत आहेत. यासाठीच्या आवश्यक परवानग्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. रायगडच्या पर्यटनासाठी हे शुभ वर्तमान मानले जात आहे.

– शशिकांत सावंत  

Back to top button