लवंगी मिरची : काय बघून मतदान करावे!

लवंगी मिरची : काय बघून मतदान करावे!

मित्रा, मला एक सांग, सर्वसाधारण भारतीय माणूस मतदान करताना नेमके काय पाहत असतो? म्हणजे बघ, येत्या काही दिवसांत कर्नाटकात निवडणूक होणार आहे, तर कानडी लोक काय पाहून मतदान करत असतील, असे तुला वाटते?

विशेष असे काही नाही. ज्याची त्याची बुद्धी जशी चालेल त्याप्रमाणे तो मतदान करतो. कर्नाटकचे जाऊ दे; पण मी तरी मतदान करताना उमेदवाराची मुलेबाळे काय करत आहेत, हे पाहूनच मतदान करतो. समजा मुलीच असतील, तर जावई काय उद्योग करतात हेही पाहतो.
त्याच्याने काय होणार आहे? मतदान तर उमेदवाराला करायचे आहे ना? मग त्याच्या मुलाबाळांचा जावयाचा काय संबंध येतो?

हे बघ उमेदवारी मिळवायला वयाची पन्नास वर्षे होईपर्यंत झगडावे लागते. कर्नाटकमध्ये सलग आमदार राहिलेले एक गृहस्थ सध्या 91 वर्षांचे आहेत. म्हणजे प्रत्येक उमेदवार हा मध्यमवयीन प्रौढ व्यक्ती असतो आणि या काळातच तो आपल्या एखाद्या मुलाला, मुलीला अथवा जावयाला आपला वारसदार म्हणून तयार करत असतो. म्हणजे उद्या चालून राजकारणातून बाहेर बसण्याची किंवा निवृत्त होण्याची वेळ आली, तरी सत्ता आपल्याच घरात राहिली पाहिजे, हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. म्हणून मी पाहतो की, एखादा उमेदवार ज्याचा मुलगा राजकारणात आलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरात मित्रमंडळ स्थापन करून दादागिरी करत आहे, अशा उमेदवाराला मी कधीच मतदान करत नाही.

कारण, बापाच्या पश्चात हा दादा आमदारकीची उमेदवारी मिळवतो आणि तहहयात त्याची दादागिरी आपल्याला सहन करावी लागते. जर उमेदवार कमी वयाचा असेल म्हणजे समजा पस्तिशीचा असेल, तर त्याची मुलेबाळे आठ- दहा वर्षांची म्हणजे तशा अर्थाने निरूपद्रवी असतात. म्हणजे तेही उपद्रव करतीलच पण त्यांची 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. म्हणजे हा उमेदवार निवडून आला, तर किमान याच्या मुलाबाळांचा, जावयांचा त्रास मतदाराला होणार नाही, याची खात्री असते.

म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मतदान करायचे, तर तरुण उमेदवाराला केले पाहिजे म्हणजे त्याच्या मुलाबाळांचा त्रास जनतेला होत नाही. बरोबर आहे. नाही तर उमेदवारांनी केलेले घोटाळे वेगळे आणि त्याच्या वारसदारांनी केलेले घोटाळे वेगळे हे भोगण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते.

त्यामुळेच काही राज्यांमध्ये ब्रह्मचारी व्यक्ती आणि प्रौढ कुमारिका यांना लोकांनी निवडून दिले आहे, असे तुझ्या लक्षात येईल. ब्रह्मचार्‍यांचे एक बरे असते, त्यांच्या मागे संसार नावाचे झेंगट नसते. तो सकाळपासून ते थेट रात्रीपर्यंत जनतेच्या सेवेचेच काम करत असतो. शिवाय, मुलबाळ नसल्यामुळे ते येऊन आगाऊ कारभार करतील, अशी शक्यता अजिबात नसते. अशा उमेदवारांची जनतेला पण खात्री वाटते. शिवाय, अखंड ब्रह्मचारी आणि आजन्म प्रौढ कुमारिका यांना भ्रष्टाचार करून किंवा गैर मार्गाने प्रचंड संपत्ती गोळा करण्याची हाव नसते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news