लवंगी मिरची : आता काही कामच उरले नाही! | पुढारी

लवंगी मिरची : आता काही कामच उरले नाही!

काय रे मित्रा, बरेच दिवस झाले तुझी एखादी कविता ऐकवली नाहीस. कविता लिहिणे बंद केले आहे की काय? अरे हो ना, आता कवींना कविता करण्याचे कामच उरलेले नाही. तशी याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बदलणारे ऋतू. शिशिर ऋतू, ग्रीष्म ऋतू आणि वैशाख वणवा या तापलेल्या ऋतूंमध्ये शीतल गारवा देणारी कविता करावी, असा सकाळी विचार केला तर संध्याकाळी पाऊस पडतो आणि रात्री थंडी वाजते. पावसाळा म्हणजे आम्हा कवींचा बहरण्याचा काळ असतो. पावसाळा अजून लांब आहे; पण पाऊस रोज पडत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या प्रकारच्या कविता पाडाव्यात याचा माझा निर्णय होत नाहीये रे.

अरे हो, हे झाले ऋतूंचे पण दुसरी काय कारणे आहेत, सांगशील तर कळेल. कारण, तुझ्या कवितांचा मी चाहता आहे हे तुला माहीत आहे. तुझ्या घरी तुझी बायको तुझ्या कविता ऐकत नसेल; पण तू पाजलेल्या कटिंग चहाला साक्षी ठेवून तुझ्या कविता मी वर्षानुवर्ष ऐकतोच आहे.

हे बघ, दुसरे कारण म्हणजे कवींना कविता करण्याचे किंवा लेखकांना लिहिण्याचे कामच उरलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेने हे सर्व सोपे करून टाकले आहे. म्हणजे समज तुझा वाढदिवस आहे आणि तुझ्या वाढदिवसानिमित्त मला तुझ्यावर एक कविता करायची आहे, तर मी डोके शिणवण्याचे किंवा आपली प्रतिभाशक्ती पणाला लावण्याचे कामच उरलेले नाही. संगणकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला, जेट प्याटला फक्त आदेश द्यायचा. त्या आदेशाप्रमाणे हे तंत्रज्ञान अवघ्या काही सेकंदात तुझ्यापुढे कविता करून दाखवेल. एवढी सुविधा झाल्यानंतर मी लिहिलेल्या कविता ऐकणार कोण आणि मी तरी कशाला कविता करण्याच्या भानगडीत पडू. म्हणजे बघ तुझे नाव जगन आहे. मी संगणकाला आदेश दिला की जगनच्या वाढदिवसाची कविता करून दे. साधारण अशा प्रकारची कविता लगेच मिळू शकते

संबंधित बातम्या

तुझे नाव जगन
मी तुझा भाऊ मगन
कामात असू दे लगन
करू नकोस जास्त जागरण.

म्हणजे यात तुझेही नाव आले, माझेही नाव आले तू खुश, मी खुश आणि शिवाय यमक पण साधले गेले.

अरे काय सांगतोस काय? म्हणजे इथून पुढे कथा, कादंबर्‍या, ललित लिखाण, कविता हे सर्व वांङ्मय प्रकार कृत्रिम बुद्धिमत्ताच लिहिणार आहे की काय? आणि मग कवी संमेलनांना गर्दी करत कविता ऐकणे बंद होणार की काय? नव्याने कवयित्री झालेल्या महिलांनी मग काय करायचे? त्यांच्या काव्य प्रतिभेचा बहर अकाली करपून गेला, तर कसे होणार? काही होणार नाही. सोपे आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी आदेश दिला की, कविवर्य केशवसुतांच्या शैलीची कविता मला तयार करून दे की लगेच कविता येईल. ‘एक पिपाणी द्या मजा आणुनी फुंकीन मी ती जमेल तशी’ किंवा ‘एक चिलीम द्या मज जाणूनी तापविन मी जी स्वश्वासाने.’ किंवा तू म्हणालास की, सुरेश भट टाईप कविता द्या की, लगेच कविता येईल. ‘माळरानाच्या छाताडावर पाय ठेवून उभा असलेला झंजावात मी.’

– झटका

Back to top button