राजर्षी शाहू स्मारक भवनचे प्रणेते

राजर्षी शाहू स्मारक भवनचे प्रणेते

दै. 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणजे सच्चा मित्र. निरलस आणि निःस्वार्थी व्यक्तिमत्त्व, खरा शाहूप्रेमी! सर्वसामान्यांविषयी कमालीची तळमळ असलेली समतावादी आणि प्रभावशाली व्यक्ती! त्यांची व माझी चांगली मैत्री जमली यामागे कारण त्यांचा निरलस आणि निःस्वार्थी स्वभाव. राजर्षी शाहू छत्रपतींची जन्मशताब्दी आणि शिवराज्याभिषेक त्रिशतसांवत्सरिक महोत्सव हे कोल्हापुरात अतिभव्य स्वरूपात साजरे झाले ते डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच! राजर्षी शाहू स्मारक भवन उभे राहिले त्यामागची मुख्य प्रेरणा डॉ. प्रतापसिंह जाधव यांचीच!

1972-73 साली प्रचंड दुष्काळ पडला होता. धान्याची मोठी चणचण होती. बंदरात अमेरिकेची बोट लागल्याखेरीज धान्याचा पुरवठा होत नव्हता, अशी परिस्थिती होती. या सर्व परिस्थितीला तोंड देतानाच 1974 साल उजाडले. हे वर्ष म्हणजे राजर्षी शाहू छत्रपतींचे जन्मशताब्दी वर्ष होय. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाहू सभागृहात सर्वपक्षीय बैठक स्वतःच निमंत्रक म्हणून आयोजित केली. मला व डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ही जन्मशताब्दी कोल्हापुरात अपूर्व उत्साह आणि जल्लोषात साजरी झाली पाहिजे, असे वाटत होते. गट-तट आणि राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक आणि सहकारी संस्थांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम एकसंधपणे साजरा करावा, अशी इच्छा डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सर्वप्रथम महोत्सव समितीमध्ये जाहीरपणे बोलून दाखविली. त्याला सर्वांचाच दुजोरा मिळाला. जिल्ह्यात तेव्हा स्वयंभू नेते होते आणि या नेत्यांचे स्वतःचे प्रबळ असे गट होते.

राजर्षी शाहू छत्रपतींची जन्मशताब्दी एकत्रितपणे, एकसंधपणे आणि एकदिलाने सर्वांनी एकत्र येऊन साजरी करावी, यासाठी महापालिकेच्या सभागृहात एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तालीम मंडळे, सहकारी संस्था, सामाजिक संस्था तसेच साखर कारखाना प्रतिनिधींना बोलाविण्यात आले होते. या बैठकीत शाहू जन्मशताब्दीचे अध्यक्षपद डॉ. जाधव यांनी स्वीकारावे, असे सर्वांचे एकमत असताना शाहूंचे स्वप्न साकारताना समतेच्या विचाराने भारावलेल्या डॉ. जाधव यांनी त्या एकमेव भावनेने शाहू जन्मशताब्दी समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकारी या नात्याने माझ्याकडे सोपविले. दै. 'पुढारी'चा प्रभाव आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांची निःस्वार्थी भावना, यामुळे त्यांच्या या सूचनेला बैठकीत विरोध झाला नाही. त्यामुळे सर्व खासदार, आमदार, राजकीय पक्ष, जिल्हा परिषद, तालीम मंडळे, विद्यार्थी संघटना, सामाजिक व सहकारी संस्था, साखर कारखाने आणि त्यांच्या जोडीला जिल्ह्याचे प्रशासन या सर्वांना एकत्र आणण्याची ऐतिहासिक कामगिरी डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी केली. हे यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात कधीच घडले नव्हते. याच दरम्यान मी व बाळासाहेब जाधव तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भेटलो.

राजर्षी शाहू छत्रपती जन्मशताब्दी महोत्सवासंदर्भात शासनाशी पत्रव्यवहार सुरू होता. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने हा महोत्सव शासकीय पातळीवर राज्यभर साजरा करण्याचे आदेश काढले. कोल्हापुरात हा महोत्सव साजरा करण्याची धामधूम सुरू झाली. शाहू जन्मशताब्दीच्या पहिल्या बैठकीपासूनच राजर्षींच्या नावे काही ना काही भव्यदिव्य असे स्मारक उभारले गेले पाहिजे आणि त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा या स्मारकातून सातत्याने मिळाली पाहिजे, अशी भावना डॉ. प्रतापसिंह जाधव हे मांडत होते. राजर्षी शाहू छत्रपतींनी सर्व जाती-धर्मांसाठी विद्यार्थी वसतिगृहे उभारली त्या परिसरातच म्हणजे दसरा चौकात हे स्मारक उभे राहावे, असा विचार आमच्या दोघांच्या मनात आला. स्मारकासाठी जागा पाहताना दसरा चौकात जागा उपलब्ध असल्याचे जाणवले. अधिक चौकशी केली असता ही जागा आरोग्य खात्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करून या जागेवर त्यांचे काही नियोजन आहे का? याची विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे नियोजन नव्हते आणि निधी नव्हता. या जागेचा कसलाही वापर होत नव्हता. तेव्हा स्मारकासाठी हीच जागा योग्य वाटल्याने ती ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केली. राजर्षी शाहू जन्मशताब्दी महोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने या जागेची रीतसर मागणी करण्यात आली आणि जिल्हाधिकारी या नात्याने ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश आपण करवीरच्या प्रांताधिकार्‍यांना दिले. त्यासाठी बोलाविलेल्या पहिल्या बैठकीतच मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्मारकासाठी मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा केल्या. या निधीतून कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंशी सुसंगत आणि राजर्षी शाहू छत्रपतींच्या विचार आणि कार्याला चालना देणारे स्मारक उभे राहावे, अशी कल्पना होती. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी जमा झाला, त्याचे संपूर्ण श्रेय डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडे जाते.

शाहूप्रेम या समानधाग्याने डॉ. प्रतापसिंह जाधव आणि आपण एकत्र आलो. पुढेही ऋणानुबंध घट्ट झाले. शाहू स्मारक भवनसाठी जेव्हा जागा ताब्यात घेतली तेव्हा कोल्हापूरच्या ऐतिहासिक वास्तूंशी सुसंगत असे स्मारक उभे करण्याची डॉ. प्रतापसिंह जाधव यांची मूळ कल्पना होती. त्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृह हे एकमेव नाट्यगृह होते आणि त्याचाच हॉल म्हणूनही वापर होत होता. सभा-समारंभ, व्याख्याने यासाठी वेगळे सभागृह नव्हते. कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी असे सभागृह असणे ही गरज होती. त्या द़ृष्टीने कोल्हापूरच्या वास्तूंशी सुसंगत असे प्रवेशद्वार आणि इमारत उभी करून दसरा चौक हा संपूर्ण परिसर तिन्ही बाजूंनी शोभिवंत करावा, त्याची सर्व जबाबदारी राजर्षी शाहू स्मारक भवनच्या ट्रस्टने घ्यावी आणि परदेशात ज्याप्रमाणे मोठ्या व्यक्तीचे स्मारक त्यांच्या लौकिकाला साजेल, असे उभे केले जाते तसे उभे करावे, असा उद्देश होता.

राजर्षी शाहू जन्मशताब्दी महोत्सव समितीतर्फे जे स्मारक उभारले जाईल व ज्या योजना राबवायच्या त्याचे नियोजन केले गेले. त्याद़ृष्टीने एका ट्रस्टची स्थापना करावी, असे ठरले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असा ट्रस्ट स्थापन करावा, त्यामध्ये चार ते पाच ट्रस्टी असावेत, असे माझ्या डोळ्यासमोर होते. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्र, व्यापारी प्रतिनिधी अशा व्यक्तींची ट्रस्टी म्हणून निवड करावी, असा आपला हेतू होता. अर्थातच, डॉ. प्रतापसिंह जाधव आणि दलितमित्र बापूसाहेब पाटील यांची नावे ट्रस्टी म्हणून आपल्या डोळ्यासमोर होती. मात्र, ट्रस्टची रचना करण्यापूर्वीच आपली बदली झाल्यामुळे ट्रस्टची पूर्ण स्थापना माझ्या कारकिर्दीत होऊ शकली नाही. आपल्यानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जर ट्रस्टी म्हणून राजर्षी शाहू स्मारक भवनच्या ट्रस्टवर सन्मानाने निमंत्रित केले असते, तर महोत्सव समितीच्या संकल्पनेतील राजर्षी शाहू स्मारक भवन आणि इतर योजना कार्यान्वित होऊ शकल्या असत्या. राजर्षी शाहू जन्मशताब्दी समारंभातील एकंदरीत कामगिरी पाहता डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ट्रस्टवर सन्मानाने आमंत्रित करणे योग्य ठरले असते, असे मला वाटते.

शाहू जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजनात डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांचे अप्रतिम संयोजन कौशल्य पाहता आणि शाहूंचे स्मारक उभे केल्याबद्दल त्यांना खर्‍या अर्थाने शाहूप्रेमी व शाहू महाराजांच्या कार्याचे खरे वारस म्हटले पाहिजे. आज फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करणार्‍या कोणत्याही राजकीय पुढार्‍यांनी त्यावेळी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याप्रमाणे पुढाकार घेऊन प्रामाणिकपणे शाहूप्रेम दाखविले नाही, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. त्यांनी तरुण वयातच शाहूंच्या कार्याचा वारसा हाती घेतला व वडिलांच्या पश्चातही समतेच्या चळवळीत मोठे योगदान दिले. शाहू स्मारकाच्या रूपाने त्यांनीच राजर्षी शाहूंचे खरे स्मारक उभे केले, हे आजच्या तरुण पिढीला कदाचित ठाऊकही नसेल; पण कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणे हा डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

शशिकांत दैठणकर
निवृत्त प्रधान सचिव व माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news