लवंगी मिरची : फिरवाफिरवी! | पुढारी

लवंगी मिरची : फिरवाफिरवी!

अगं मी काय म्हणतोय, सगळीकडे भाकरीची फिरवाफिरवी सुरू आहे. आपणही आपल्या संसारात फिरवूया का भाकरी? फिरवली म्हणजे भाकरी करपत नाही. तुला माहिती आहे की, करपलेली भाकरी मग टाकून द्यावी लागते.

आधी मी सांगितलेली कामे पूर्ण करा. फरशी पुसून झाली असेल, तर भांडे घासून घ्या. आलेत मोठे भाकरी फिरवणारे आणि भाकरी फिरवायची म्हणजे काय हो? इनमिन चार लोकांचा संसार. तुम्ही, मी आणि आपली दोन मुले. चारजणांत काय फिरवा फिरवी करणार तुम्ही?

अगं म्हणजे इथून पुढे मी कुटुंबप्रमुख असणार नाही. माझ्या जागेवर तूच कुटुंब प्रमुख असशील. म्हणजे आपण नाही का घरच्या कार्यक्रमाचे पाहुणेरावळ्यांना निमंत्रण देतो, ते निमंत्रण तुझ्या नावाने दिले जाईल आणि मी आपल्या घरामध्ये दुसर्‍या क्रमांकावर असेल. म्हणजे भाकरी फिरवल्यासारखेच आहे की नाही? म्हणजे माझी जागा तू घ्यायची आणि तुझी जागा मी घ्यायची. एरव्ही तरी काय कुटुंब प्रमुख म्हणून तुमचे नाव असते. बाकी आपल्या घरचा सगळा कारभार मीच पाहते ना? मुलांचे शिक्षण, त्यांनी कोणते क्लासेस लावावेत, कोणते विषय घ्यावेत, कसे राहावे, कसे बोलावे, तुम्ही कोणता ड्रेस घालावा हे सर्व निर्णय माझेच असतात ना? तुम्ही नामधारी कुटुंब प्रमुख आहात.

संबंधित बातम्या

अगं, त्या अर्थाने म्हणत नाही मी. आज सगळीकडे भाकरी फिरवली जाते आहे. मग मी विचार केला की, आपल्या घरातही भाकरी फिरवूयात म्हणजे माझी जागा तू घेशील आणि तुझी जागा मी घेईन.

बरे आहे. ठीक आहे. मला मान्य आहे. आतापर्यंत घरातील कामे मी करत होते आता इथून पुढे झाडलोट, धुणी-भांडी तुम्ही करायची. फरशी पुसणे तर तुम्ही करत आहातच पण स्वयंपाक पण तुम्हीच करायचा. मुलांना तयार करून शाळेत पाठवणे, त्यांचे डबे तयार करून भरून देणे ही सर्व कामे पण तुम्ही करायची. लाईट बिल भरणे, इन्शुरन्सचे हप्ते भरणे, पैसे काढणे, आपल्या दोन चाकी गाडीची सव्हिर्र्सिंग, इस्त्रीला कपडे टाकणे आणि घेऊन येणे ही सर्व कामे मी करत जाईन. झाले तुमचे समाधान? फिरली ना तुमच्या मनाप्रमाणे भाकरी?

म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे घरातली कामे मी करत असताना तू काय करणार आहेस?

काही नाही. तुम्ही काम व्यवस्थित करता की नाही याच्यावर लक्ष ठेवणार आहे. माझ्याकडे फक्त तुमच्या चुका काढण्याचे काम असेल. तुम्ही भांडी घासत असताना मी बाजूला खुर्ची टाकून बसेन आणि एखाद्या भांड्यामध्ये स्वच्छता दिसली नाही, तर मग ती भांडी तुम्हाला पुन्हा घासायला सांगेन. कपडे धुताना तर किती जीव जातो माझा. वॉशिंग मशिनमध्ये कपडे टाकणे आणि काढणे हेसुद्धा अवघड झाले आहे. थकून जाते बाई मी. इथून पुढे ही सगळी कामे तुम्ही करायची.

मी काय म्हणतो, भाकरी फिरवायचे आपण कॅन्सल करूयात का? नाही म्हणजे जे चालले आहे ते बरेच आहे ना? तू तुझी कामे कर मी माझी कामे करतो. एरव्ही तरी आपल्या घरात आपली दोघांची सत्ता आहे. तू म्हणजे केंद्र सरकार आणि मी म्हणजे राज्य सरकार असे समजूयात. केंद्राचे आदेश राज्याला मानावेच लागतात त्याप्रमाणे आपल्या घराची मुख्य सूत्रधार तू आणि तू सांगशील ते निमूटपणे करणारा तुझा एकमेव सेवक म्हणजे मी. चल मग जेवण करूयात. काय केले आहे आज जेवायला?

– झटका

Back to top button