वैशाख पौर्णिमा : मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान | पुढारी

वैशाख पौर्णिमा : मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान

विश्वात चारही दिशांना अज्ञानाचा अंधकार पसरला होता. मिथ्या द़ृष्टीने अंध झालेला मानव अनैसर्गिक, दैविक शक्तीला आपले सर्वस्व मानत होता. अंधश्रद्धेने असत्याला सत्य समजून त्यांच्याद्वारे दु:ख मुक्त होण्याचा प्रयत्न करू लागला. अशा वातावरणातच वैशाख पौर्णिमेला महामाया देवीच्या पोटी पुत्र जन्मला आणि त्या क्षणापासून वातावरणात बदल दिसू लागला. हा बदल त्या बालकाच्या 35 व्या वर्षी सार्‍या जगाने प्रत्यक्ष अनुभवला. हा बदल म्हणजे, तथागत गौतम बुद्धांनी दु:ख मुक्तीचा मार्ग शोधला होता. या दिनापासूनच मानवतेला मंगलमय दिनाची प्रचिती आली.

अशाच वैशाख पौर्णिमा वर्षानुवर्षे येत होत्या. सिद्धार्थाच्या जन्माची, गुणांची स्मृती सर्वांना देऊन जात होत्या. अशीच एक मानवाच्या कल्याणार्थ पोषक ठरणारी, बुद्धत्वाचा दिव्य संदेश घेऊन येणारी, सिद्धार्थाच्या वयाच्या 35 व्या वर्षी वैशाख पौर्णिमा आली. या पौर्णिमेच्या शीतल चंद्र प्रकाशात सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झाले. म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. त्यांनी दु:ख मुक्तीचा मार्ग शोधला. त्यांनी आर्य, सत्य, अष्टांगिक मार्ग, प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत जाणून घेतले. लोक अनेक जन्मांपासून कामवासनेच्या आहारी जाऊन पुनर्जन्माच्या चक्रामध्ये पडत होते. मात्र, वैशाख पौर्णिमेच्या पवित्रदिनी बोधी वृक्षाखाली बुद्धत्वाला प्राप्त करून कामवासनेला मारले व त्यांच्या सैन्याला पराभूत केले आणि अर्हतपदाला पोहोचले, म्हणजेच जीवनमुक्त झाले. सिद्धार्थ गौतमांनी कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा यांच्या निर्मूलनाचा मार्ग शोधून काढला. जगाला ती वैशाख पौर्णिमा या आर्य सत्याने ज्ञान देत राहील. मलीन मलरहित बनवण्याकरिता ही वैशाख पौर्णिमा शील, समाधी व प्रज्ञा या त्रितत्त्वाचे स्मरण करून देत जाईल.

वैशाख पौर्णिमेला जन्म, याच दिवशी बुद्धत्व प्राप्त व याच दिवशी निर्वाण, अशा दिव्य संयोगाचे मिश्रण असलेल्या, बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून 45 वर्षांपर्यंत रात्रंदिवस समता, स्वातंत्र्य बंधुत्व, शील, समाधी, प्रज्ञा, अनित्य, अनात्मा, दु:ख व निर्वाण यांचा उपदेश करून शेवटी वयाच्या 80 व्या वर्षी महाकारुणिक, मनुष्य प्राण्यांसहित देवतांचे शास्ते, भगवान बुद्ध आपल्या काषाय वस्त्रधारी शिष्य, संघात, कुशीनगर येथील शाळवनातील शाळा जोड वृक्षांमध्ये सिंहशय्या करून, आपल्या शिष्य गणांना अंतिम उपदेश देत महानिर्वाणास प्राप्त झाले.

अनेक शतकांपासून गौतम बुद्ध हे आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. आजही बुद्ध आशियासाठी स्वाभिमान आणि अखिल विश्वासाठी विवेकाचा प्रेरणास्रोत ठरले आहेत. त्यांचे जीवनदर्शन आणि त्यांचे नैतिक उपदेश विज्ञानप्रेमी, आधुनिक विचारांच्या जाणकारांनाही आकर्षित करतात. कारण, त्यांचा द़ृष्टिकोन तर्कनिष्ठ आणि अनुभवाधारित आहे.

धन्य ते तथागत ज्यांनी मानवप्राण्याच्या कल्याणार्थ जन्म घेतला होता. मानवाच्या मांगलिकाकरिताच हातामध्ये मातीचे भिक्षापात्र घेऊन अंगावर पांसुकुलिक (जीर्ण चमड्यांच्या तुकड्यांनी शिवून बनवलेले वस्त्र) चिवर परिधान करून वृक्ष, वन, पहाड यांचे निवासस्थान बनवून मानवला धम्मदान करण्याकरिता चारिका (प्रवास) करीत तिन्ही लोकांतील अज्ञानरूपी अंधकाराला नष्ट करण्याकरिता स्वयंज्ञानदीप बनून विचरत असत. जेथे तथागत जन्मले, त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले व जेथे ते महापरिनिर्वाणास पोहोचले त्या त्या पावन भूमीला पुन्हा बुद्धांचा संदेश घेऊन बौद्धमय बनविण्याची या मानवतेच्या मंगलमय दिनाप्रीत्यर्थ तथागतांच्या चरणकमली आदरांजली!

– भदन्त धम्मसेवक महाथेरो 

Back to top button